सडा येथील कचरा डंपिंग यार्डमधील प्लास्टिक कचऱ्याला आग

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
04th May, 11:27 pm
सडा येथील कचरा डंपिंग यार्डमधील प्लास्टिक कचऱ्याला आग

वास्को : सडा येथील कचरा डंपिंग यार्डातील बाहेर असलेल्या प्लास्टिक कचऱ्याला शनिवारी सायंकाळी आग लागली. अग्निशमन दलाने आग विझविल्याने ती संपूर्ण प्रकल्पामध्ये पसरली नाही. आगीने पुन्हा पेट घेऊ नये यासाठी तेथे माती टाकण्यात आली. आग कशी लागली हे स्पष्ट होऊ शकले नाही. तथापी कोणीतरी तेथील सुक्या गवताला आग लावल्याने, आग जवळच्या प्लास्टिक कचऱ्यापर्यंत पोहोचली.

मुरगाव पालिकेतर्फे गोळा करण्यात येणाऱ्या कचऱ्याचे सडा येथील प्रकल्पात विभक्तीकरण केले जाते. प्लास्टिक कचरा व सुका कचरा वेगळे करण्यासाठी तेथे यंत्रणा उभारण्यात आली आहे. वेगळा झालेल्या प्लास्टिक कचऱ्याचे लहान आकारात तुकडे केले जातात. तर वेगळा झालेला सुका कचरा ट्रकाद्वारा वास्कोबाहेरील कचरा प्रक्रिया प्रकल्पामध्ये नेण्यात येतो. त्यासाठी घनकचरा व्यवस्थापनाने दोन ट्रकांची व्यवस्था केली आहे. सदर काम पावसाळ्यापर्यंत चालणार आहे. सदर कचरा उघड्यावरच टाकण्यात येतो. या जागेवर गवत आहे. कोणीतरी त्या सुक्या गवताला सायंकाळी आग लावल्याने ती आग प्लास्टिक ठेवलेल्या भागापर्यंत पोहोचली. आग लागल्यावर अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझविली. तथापी आगीने पुन्हा पेट घेऊ नये यासाठी त्या कचऱ्यावर माती टाकण्यात आली आहे. गतवर्षीही सडा येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याला आग लागली होती. सदर आग बरेच दिवस धुमसत होती. त्यावर मोठ्या प्रमाणात माती टाकण्यातआली होती. तथापी धूर सगळीकडे पसरण्याचे थांबले नव्हते. येथे अधूनमधून कचऱ्याला लागणाऱ्या आगीसंबंधी सामाजिक कार्यकर्ते शंकर पोळजी यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत.


हेही वाचा