मतदानानंतर लावलेली बोटावरची शाई हात धुताच उडाली!

राज्यात कुठे घडले प्रकार? काय आहे मतदारांचा आरोप? वाचा...

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
07th May, 11:06 am
मतदानानंतर लावलेली बोटावरची शाई हात धुताच उडाली!

पणजी : मतदान केल्यानंतर बोटाला लावलेली शाई हात धुतल्यानंतर गेली, असा आरोप पणजीतील मतदार पॅट्रेशिया पिंटो यांनी मतदानानंतर केला. यासंदर्भात निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारणार असल्याचे तसेच सुकूर-पर्वरी येथेही अशा प्रकारच्या तक्रारी प्राप्त झाल्याचे ​पिंटो यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

लोकसभा निवडणुकीत मी आज सकाळी पणजीतील जुने वाचनालय मतदार केंद्रात मतदान केले. त्यानंतर घरी जाऊन नाष्टा केल्यानंतर हात धुताच मतदान केल्याची खूण म्हणून बोटाला लावलेली शाई निघून गेली. हा प्रकार अतिशय धक्कादायक आहे. असे प्रकार सुकूर भागातही घडल्याच्या तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत, असे पिंटो म्हणाल्या. याबाबत मी निवडणूक अधिकाऱ्यांना जाब विचारणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पर्वरीत सालयमध्ये ९ संशयितांनी पुन्हा मतदान केल्याची तक्रार


दरम्यान, पर्वरीच्या साल्वादोर-द-मुंद (सालय) मतदान केंद्रावरही मतदान केल्याची खूण म्हणून लावलेली शाई लगेच पुसली जात असल्याची लेखी तक्रार देण्यात आली आहे. अशाप्रकारे एकदा मतदान करून बाहेर आल्यानंतर ९ संशयितांनी पुन्हा मतदान केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.


असे आहे शाईचे महत्त्व...

निवडणुकीत मतदान केल्यावर मतदाराच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावली जाते. तुम्ही मतदान केले आहे, याचा पुरावा म्हणजे बोटावर लावलेली ही शाई. यामुळे एका व्यक्तीने एकदाच मतदान केल्याचे सुनिश्चित होते. म्हणजेच एक व्यक्ती दुसऱ्यांदा मत देऊ शकत नाही. कारण ही शाई अशी असते, जिचा डाग लगेचच पुसता येत नाही. सुरुवातीला ही जांभळी असते आणि नंतर काळी पडते. ही शाई ‘इंडेलिबल इंक’ म्हणून ओळखली जाते. पण, पणजी आणि पर्वरीतील काही मतदान केंद्रांवर ही शाई पुसली गेल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे येथील मतदानावर प्रश्न उपस्थित केला जात आहे.

हेही वाचा