हक्क म्हणून मतदान करा

मतदान न करणाऱ्यांवर कारवाईची तरतूद नाही किंवा देशात अद्याप सक्तीचे मतदान नाही, पण प्रत्येकाने सक्तीने मतदान करण्याची तयारी ठेवायला हवी. लोकप्रतिनिधी निवडण्याचा सर्वोच्च अधिकार आपल्याला दिला आहे, याचे भान ठेवून प्रत्येक मतदाराने मंगळवारी ७ मे रोजी मतदान करावे.

Story: अग्रलेख |
07th May, 06:28 am
हक्क म्हणून मतदान करा

.लोकसभेच्या दोन जागांसाठी गोव्यात आज मतदान होत आहे. सकाळी सात वाजल्यापासून सुरू होणारे मतदान संध्याकाळी ६ वाजेपर्यंत चालणार आहे. गोव्यातील सुमारे ११.८० लाख मतदारांना या लोकशाहीच्या सर्वांत मोठ्या उत्सवात सहभागी होता येईल. मागील तीन लोकसभा निवडणुकीतील मतदान पाहिले तर गोव्यात ७७ टक्के इतके सर्वाधिक मतदान झाले आहे. २००९ मध्ये फक्त ५५ टक्के मतदारांनीच हक्क बजावला होता. गेल्या पंधरा वर्षांत गोव्यातील मतदारांमध्ये झालेली वाढ ही १ लाख ६० हजार इतकी आहे. २०१९ च्या तुलनेत यावेळी ६२ हजार मतदार जास्त आहेत. जेवढे मतदार वाढत आहेत तेवढेच मतदानही वाढते. त्यामुळे यावेळी ७७ टक्क्यांचा आकडा पार होण्याची अपेक्षा आहे. निवडणूक आयोगाने तर गोव्यातील मतदान ८० टक्क्यांपेक्षा जास्त होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. जेवढे नवमतदार मोठ्या प्रमाणात तयार होतात, तेवढे मतदान वाढते असे गेल्या तीन चार वेळच्या मतदानावरून दिसते. लोकसभेच्या २००९ मधील निवडणुकीत गोव्यात १०,२०,७९४ मतदार होते. आज ती संख्या ११,७९,६४४ इतकी झाली आहे. पण पंचवीस ते तीस टक्के मतदार मतदानाकडे पाठ फिरवतात, त्यामुळे गोव्यात लोकसभेसाठी झालेल्या गेल्या तीन वेळच्या मतदानात कधीच ८० टक्क्यांच्या पार मतदान गेलेले नाही. जास्तीत जास्त मतदान होणे, हे बहुसंख्य लोकांना हवा असलेला उमेदवार निवडून येण्याची चिन्हे असतात. राजकीय गणितामध्ये ते मतदान प्रस्थापितांविरोधात म्हटले जात असले तरी दुसऱ्या अर्थाने जास्त लोकांना हवा असलेलाच उमेदवार निवडून देण्याची तिथे एक संधी असते. त्यामुळेच जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीच्या देशातील मतदानाच्या उत्सवात सर्वांनी स्वेच्छेन सहभागी व्हायला हवे, तेव्हात चित्र बदलू शकते.

भाजपने उत्तर गोव्यातून पाचवेळा निवडून आलेले श्रीपाद नाईक यांना उमेदवारी दिली आहे, तर काँग्रेसने माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप यांना निवडणुकीत उतरवले आहे. आरजीपीचे प्रमुख मनोज परब हे उत्तरेतून निवडणूक लढत आहेत. दक्षिण गोव्यात भाजपने पल्लवी धेंपो यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसने विरियातो फर्नांडिस यांना तर आरजीपीने रुबर्ट परेरा यांना उमेदवारी दिली आहे. बसपा, करप्शन एबॉलिश पार्टी तसेच काही अपक्ष उमेदवार यावेळी रिंगणात आहेत. भाजप, काँग्रेस, आरजीपी यांच्यात तिहेरी लढत होईल असे चित्र आहे. तिन्ही पक्षांनी आपला उमेदवार विजयी होईल असा दावा केला असला तरी मतदार कोणाच्या बाजूने कौल देतात ते ४ जून रोजी स्पष्ट होणार आहे. उत्तर गोव्यात ५.८० लाख तर दक्षिण गोव्यात ५.९८ लाख मतदार आहेत. सासष्टी, बार्देश, मुरगाव, फोंडा अशा तालुक्यांमध्ये जास्त मतदार असल्यामुळे मुख्य प्रतिस्पर्धी असलेल्या उमेदवारांनी आणि राजकीय पक्षांनी या तालुक्यांतील मतदारसंघांवर जास्त लक्ष केंद्रित केले आहे. उत्तर गोव्यात गेल्या पाच लोकसभा निवडणुकीत भाजपचे श्रीपाद नाईक सतत निवडून येत आहेत. दक्षिण गोव्यात विद्यमान खासदार काँग्रेसचा आहे. आतापर्यंत दक्षिण गोव्यात भाजपने दोनवेळा आपला उमेदवार निवडून आणण्यात यश मिळवले. रमाकांत आंगले आणि नरेंद्र सावईकर. यावेळी भाजपने महिला उमेदवार दिला आहे. मंगळवारी मतदान आहे. बहुतांश मतदार यावेळी शांत असल्यामुळे अशा मौन बाळगून असलेल्या मतदारांमुळे राजकीय पक्षांचा गोंधळही वाढला आहे. मतदारांनी नेमके काय ठरवले आहे, ते ४ जून रोजी स्पष्ट होईल. गोव्यात तसे शांततापूर्ण मतदान होत असते. काही अतिसंवेदनशील मतदान केंद्रे असली तर गोव्यात गंभीर हिंसक स्थिती कधी निर्माण झालेली नाही. मतदान शांततेत पार पडेल, यासाठी सर्वांनीच प्रयत्न करण्याची गरज आहे.

गोव्यातील मतदारांसाठी राज्यात १७२५ मतदान केंद्रे उभारली आहेत, ज्यात सुमारे २२९ केंद्रे ही मॉडेल मतदान केंद्रे आहेत. यावेळी मतदारांना शीतपेय देण्याचा तसेच वृक्षारोपणाचा उपक्रमही निवडणूक आयोगाने हाती घेतला आहे. मतदान न करणाऱ्यांवर कारवाईची तरतूद नाही किंवा देशात अद्याप सक्तीचे मतदान नाही, पण प्रत्येकाने सक्तीने मतदान करण्याची तयारी ठेवायला हवी. लोकप्रतिनिधी निवडण्याचा सर्वोच्च अधिकार आपल्याला दिला आहे, याचे भान ठेवून प्रत्येक मतदाराने मंगळवारी ७ मे रोजी मतदान करावे.