आतापासूनच उपाययोजना करायला हवी

Story: अंतरंग |
15th May, 11:22 pm
आतापासूनच उपाययोजना करायला हवी

नेमेची येतो पावसाळा, सृष्टीचे हे कौतुक जाण बाळा, ही म्हण बरीच प्रचलित आहे. नेमेची येणारा पावसाळा आता उंबरठ्यावर येऊन ठेपलेला आहे. औपचारिक पावसाळा (मान्सून आल्यानंतरचा) अजून सुरू झालेला नसला तरी बिगरमोसमी पावसाच्या सरींना सुरवात झालेली आहे. यंदा मान्सूनचे आगमन नियोजित वेळेपूर्वीच होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पाऊस सुरू झाला की, वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या रस्त्यांवर किंवा घरांवर कोसळणे, गटारे तुंबून रस्त्यावर पाणी साचणे, रस्त्यावर खड्डे पडणे, दरडी कोसळणे असे प्रकार सर्रास घडत असतात. दुचाकी घसरल्यामुळे अपघात होण्याचे प्रकार पावसाळ्यात सर्रास घडतात. या सर्व गोष्टी दरवर्षी घडत असल्या तरी सरकार वा प्रशासनाकडून प्रभावी उपाययोजना होताना दिसत नाहीत. 

येणारा पावसाळा विशेष करून पणजीवासीयांसाठी कसोटीचा ठरणार आहे. स्मार्ट सिटीची कामे सुरू आहेत. ही कामे पूर्ण करण्याची डेडलाईन ३१ मे असली तरी या वेळेत कामे पूर्ण होतीलच, असे छातीठोकपणे कोणीच सांगू शकत नाहीत. स्मार्ट सिटीच्या कामानिमित्त काकुलो मॉल ते टोंक येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्राजवळील पुलापर्यंतचा रस्ता १४ मे ते १० जून दरम्यान बंद करण्यात येणार आहे. यामुळे हे काम आता दिलेल्या डेडलाईनला पूर्ण होईल असे वाटत नाही.

पावसाचा सर्वाधिक फटका आमच्या राजधानीला बसतो. एक ते दोन तास सलग पाऊस पडला की राजधानीतील सर्व रस्ते पाण्याखाली जातात. मिरामार सर्कल, कला अकादमी, १८ जून रस्ता, कदंब बसस्थानकाजवलील आंबेडकर उद्यान येथील रस्त्यांवर पाणी साचते. पंपिंग स्टेशन उभारल्यामुळे मळा परिसरात पाणी साचण्याचे प्रमाण आता कमी झाले आहे. यापूर्वी मळा येथील अनेक घरात पावसाचे पाणी साचून राहायचे व तेथील नागरिकांचे हाल व्हायचे. मिरामार, १८ जून रस्ता, आंबेडकर उद्यान येथे मात्र पाणी साचण्याचे प्रमाण अद्याप कमी झालेले नाही. 

स्मार्ट सिटीच्या कामामुळे पणजीतील सर्व प्रमुख रस्ते खणलेले आहेत. मलनिस्सारण वाहिनी घालण्याची कामे सुरू आहेत. ही कामे होणे आवश्यक असले तरी या सुरू असलेल्या कामांमुळे काही प्रमाणात गैरसोय सुद्धा होत आहे. गेल्याच महिन्यात बिगरमोसमी पावसाच्या सरींमुळे पणजी जलमय झाली होती. स्मार्ट सिटीच्या कामांमुळे रस्ते चिखलमय झाले होते. अनेक ठिकाणी रस्त्यांवरील खड्ड्यात पाणी साचून राहिले होते. रस्त्याशेजारील दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरण्याचे प्रकार घडले होते. पणजी शहराबरोबर मडगाव, फोंडा, म्हापसा या शहरात सुद्धा पावसामुळे समस्या निर्माण होतात.

पावसाळा आता अगदी उंबरठ्यावर येऊन ठेपलेला आहे. रस्त्यांवर पाणी साचू नये, यासाठी मान्सूनपूर्व कामे केली जातात. वीज खात्यातर्फे वाहिन्यांवरील फांद्या छाटण्यासारखी कामे केली जातात. वीज खात्याची कामे सध्या विविध भागांत सुरू आहेत. लोकसभा निवडणूक आचारसंहितेचा फटका काही प्रमाणात मान्सूनपूर्व कामांना बसला आहे. पावसाळ्यात जनतेच्या तक्रारींची नोंद घेऊन त्या सोडविण्यासाठी आपत्ती नियंत्रण कक्ष स्थापन केला जातो. यंदाही तो केला जाईल. तरी सुद्धा तत्काळ समस्या सोडवण्यासाठी आपत्ती नियंत्रण कक्ष म्हणजे काही जादूची कांडी नव्हे. पावसाळा सुरू होण्यास जेमतेम पंधरा दिवस आहेत. नगरपालिका व प्रशासनाने योग्य नियोजन करून उपाययोजना करायला हव्यात. पूर्वीच्या चुकांपासून वा अनुभवापासून काही तरी बोध सर्वांनी घ्यायला हवा.

- गणेश जावडेकर