ब्रिजभूषण यांचा लोकसभा निवडणुकीतून पत्ता कट

उत्तर प्रदेश

Story: राज्यरंग |
07th May, 07:27 am
ब्रिजभूषण यांचा लोकसभा निवडणुकीतून पत्ता कट

भारतीय कुस्ती संघाचे माजी अध्यक्ष व भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांचा निवडणुकीतून पत्ता कट झाला आहे. ब्रिजभूषण यांना उमेदवारी नाकारल्यामुळे महिला कुस्तीपटूंचे प्रकरण भोवले असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. उत्तर प्रदेशातील कैसरगंज लोकसभा मतदारसंघात ब्रिजभूषण यांचा धाकटा मुलगा करण भूषण सिंह यांना भाजपने तिकीट दिले आहे. त्यांना तिकीट नाकारले असले तरी किंगमेकर ब्रिजभूषण हेच राहणार आहेत.

ब्रिजभूषण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी लैंगिक अत्याचाराचा आरोप केला आहे. त्यांना पुन्हा उमेदवारी दिली असती, तर अशा गंभीर आरोप असलेल्या व्यक्तीला मैदानात उतरवल्याबद्दल विरोधकांच्या टीकेला सामोरे जावे लागले असते. पक्षाच्या कर्नाटक सहयोगी जनता दल (धर्मनिरपेक्ष)चे हासन येथील खासदार प्रज्वल रेवण्णा यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप झाला आहे. या आरोपानंतर ते देशाबाहेर पळून गेले आहेत. यामुळे भाजप आधीच बॅकफुटवर आला आहे. त्यामुळे ब्रिजभूषण यांना उमेदवारी दिल्यास परिस्थिती आणखी भाजपच्या विरोधात जाऊ शकते, याचा विचार करून भाजपने हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे.

ब्रिजभूषण यांचा मुलगा करण भूषण सध्या उत्तर प्रदेश रेसलिंग असोसिएशनचा अध्यक्ष आहे. ते राष्ट्रीय स्तरावरील ट्रॅप शूटरदेखील आहेत. तसेच करण भूषण हे नवाबगंजमधील सहकारी ग्राम विकास बँकेचेही अध्यक्ष आहेत. अनेक पदांवर ते असले तरी त्यांची पहिलीच निवडणूक असणार आहे. कैसरगंज परिसरात ब्रिजभूषण शरण सिंह यांचा चांगलाच प्रभाव आहे. त्यामुळे भाजपने इतरांना तिकीट न देता त्यांच्या मुलालाच उमेदवारी दिली आहे.

ब्रिजभूषण यांना तिकीट नाकारल्याचा परिणाम कैसरगंज, श्रावस्ती, बस्ती आणि अयोध्या या लोकसभेच्या किमान सहा जागांवर झाला असता. त्यामुळेच ब्रिजभूषण सिंह यांच्या मुलाला भाजपकडून निवडणूक रिंगणात उतरविण्यात आले आहे. ब्रिजभूषण सिंह यांनी भाजपच्या तिकिटावर पाच वेळा, तर सपाच्या तिकिटावर एकवेळा कैसरगंजची जागा जिंकली आहे. ते बहराइच, गोंडा, बलरामपूर, अयोध्या आणि श्रावस्ती जिल्ह्यात स्थापन केलेल्या अभियांत्रिकी, फार्मसी, शिक्षण, कायदा आणि इतर ५० हून अधिक शैक्षणिक संस्थांशी संबंधित आहेत. त्यांच्या महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या गरीब विद्यार्थ्यांना फी माफी देण्यासाठी सिंह ओळखले जातात. गरजू आणि गरिबांची मदत करणारे व्यक्तिमत्व अशी त्यांची या भागात प्रतिमा आहे. त्यामुळे त्यांना तिकीट न देणे धोक्याचेच होते. त्यामुळे भाजपने त्यांच्या मुलाला तिकीट देऊन त्यांचा प्रभाव कमी होणार नाही याची काळजी घेतली आहे. भाजपने त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्याला उमेदवारी नाकारली असती तर समाजवादी पक्षाने त्यांना मतदारसंघातून उमेदवारी दिली असती. भाजपच्या चिंतेत यामुळे अधिकच भर पडणार होती.

प्रसन्ना कोचरेकर, दै. गोवन वार्ताचे उपसंपादक आहेत.