तिसऱ्या टप्प्यात मतदानाचा टक्का वाढेल?

निवडणूक आयोग किमान ८० टक्के मतदान व्हावे अशी अपेक्षा करत असताना पहिल्या टप्प्यात काही ठिकाणी पन्नास ते साठ टक्के एवढे कमी मतदान व्हावे यावरूनच आयोगाला अजून या आघाडीवर काही करता येईल का, याचा विचार करावा लागेल. तिसऱ्या टप्प्यात मतदानाचा टक्का वाढेल अशी आयोगाला अपेक्षा आहे.

Story: विचारचक्र |
07th May, 06:25 am
तिसऱ्या टप्प्यात मतदानाचा टक्का वाढेल?

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात एकूण दहा राज्यात मिळून ९४ मतदारसंघांत आज (मंगळवारी) मतदान होत असून आपल्या गोव्यातील दोन मतदारसंघांचाही यात समावेश आहे. गोव्यातील केवळ दोन जागांचे महत्व विरोधी काँग्रेस वा त्यांच्या इंडी आघाडीला किती आहे, हे काँग्रेस नेतृत्वाने ज्याप्रकारे प्रचाराच्या आघाडीवर पूर्ण दुर्लक्ष केले त्यावरून कळून येते. भारतीय जनता पक्षाने मात्र या दोन जागा जिंकण्यासाठी दीड दोन महिन्यांपासून केलेली मेहनत मतदारांनाही दुर्लक्षित करता येणार नाही. निर्णायक ठरू शकणाऱ्या तिसऱ्या टप्प्यात या दोन जागांचे महत्व तेवढेच वाढले असून भाजपने त्यासाठी घेतलेली मेहनत वाया जाणार नाही, असा अंदाज वर्तवता येईल. पहिल्या दोन टप्प्यात एकूण १९१ मतदारसंघांतील उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंदिस्त झाले असून आजच्या टप्प्यानंतर लोकसभेच्या एकूण जागांपैकी निम्म्याहून अधिक मतदारसंघांत मतदान प्रक्रिया पूर्ण झालेली असेल. आज गुजरातमध्ये २६ पैकी २५ तर कर्नाटकात चौदा मतदारसंघातही मतदान होत आहे आणि एकूण पार्श्र्वभूमीवर हाच टप्पा निर्णायक असल्याचे मानता येईल. गुजरातेत एक जागा भाजपने बिनविरोध जिंकली आहे, हे विशेष. माजी पंतप्रधान देवगौडा यांचा नातू प्रज्वल रेवाण्णाच्या वासनाकांडाचा विस्फोट झाल्यानंतर प्रथमच कर्नाटकात मतदान होत असून भाजप आण विरोधकांसाठीही निवडणुकीचा हा तिसरा टप्पा खूपच निर्णायक ठरावा. या टप्प्यात एकूण १३५२ उमेदवार रिंगणात असून यामध्ये १२३ महिलांचाही समावेश आहे आणि आपल्या पल्लवी धेंपो याही त्यापैकीच एक आहेत.

मागील दोन टप्प्यात घटलेली मतदानाची टक्केवारी हा भाजपसह सगळ्याच राजकीय पक्षांसाठी चर्चेचा विषय ठरला असून त्याचा आपापल्या सोयीनुसार अन्वयार्थ काढून समाधान करून घेणे, हाच सध्या त्यांच्याकडे पर्याय आहे. भाजप शिस्तबद्ध संघटन कार्यासाठी माहीर असल्याने आपले मतदार घराबाहेर पडले आणि त्यांनी मतदानही केल्याने कमी मतदानाचा कोणताही फरक अपेक्षित निकालात पडणार नाही, असा दावा भाजपचे नेते करताना दिसतात तर मतदानाची कमी टक्केवारी ही भाजपच्या विरोधात जाणारी आहे, असे विरोधकांना वाटते. आता मतदानाचा घटलेला टक्का आणि त्यावर कोणी जय पराजयाचे समीकरण मांडणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविकच आहे. घटलेले मतदान हे परिवर्तन घडवून आणण्यासाठी दिलेला कौल आहे असे ज्यांना वाटते तो त्यांचा समज असेल, पण असा संबंध जोडणे हेच आधी मूर्खपणाचे ठरेल. परिवर्तन घडवून आणायचे लोकांनी ठरवलेच तर मतदार मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडतात, हाही तसाच एक जुना समज असून कमी मतदानातूनही परिवर्तन घडून आल्याचे इतिहास सांगतो. अशा परिस्थितीत आताच घटलेल्या मतदानाचा आधार घेत कोणी निष्कर्षाप्रत यायचे धाडस करू नये. अजूनही जवळपास निम्म्या जागांसाठी पुढील तीन सप्तकात मतदान व्हायचे आहे. आजच्या टप्प्यात मतदार मोठ्या संख्येत बाहेर पडतील, अशी अपेक्षा असली तरी मे महिन्यातील कडाक्याच्या उष्म्यात होत असलेल्या निवडणुकांमुळे त्याचाही परिणाम मतदानाची टक्केवारी घटण्यात होऊ शकतो, हेही मान्य करावेच लागेल.

मतदान हे आता मतदारांसाठी आधीसारखे किचकटीचे वा त्रासदायक असे राहिले नाही याचा विचार केल्यास मतदानाचा टक्का वाढत का नाही, या प्रश्नाचेही उत्तर मिळत नाही. दहा पंधरा वर्षांआधीची परिस्थिती आता राहिलेली नाही, तर मतदाराना मतदान करताना किमान त्रास व्हावा यासाठी निवडणूक आयोगाकडून प्रयत्न केले जातात. आताशा तर मतदान हा मतदारांसाठी एक प्रकारचा उत्सवच ठरावा याकरिता आयोग खूप काही करताना दिसत आहे. पण याउप्परही मतदार मतदान केंद्रावर का फिरकत नाही, उलट मतदानासाठी मिळालेल्या सुटीचा वेगळ्याच कारणासाठी फायदा उठवतो असे दिसून येते. निवडणूक आयोग किमान ८० टक्के मतदान व्हावे अशी अपेक्षा करत असताना पहिल्या टप्प्यात काही ठिकाणी पन्नास ते साठ टक्के एवढे कमी मतदान व्हावे यावरूनच आयोगाला अजून या आघाडीवर काही करता येईल का, याचा विचार करावा लागेल. तिसऱ्या टप्प्यात मतदानाचा टक्का वाढेल अशी आयोगाला अपेक्षा आहे. भाजपचा मतदार आज मतदानासाठी जो बाहेर पडत आहे त्याचे सारे श्रेय पक्ष संघटनेला आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडे जाते. अन्य कोणत्याही पक्षाकडे आज ही ताकद नाही आणि ती त्यांच्याकडे असती तर निश्चितच मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी आयोगाला अधिक काही करावे लागले नसते. गोव्यात आज दोन जागांसाठी होणाऱ्या मतदानात किमान ८० टक्के मतदार घरातून बाहेर पडावा, अशी अपेक्षा आयोग बाळगून आहे आणि मतदारांसाठी जी व्यवस्था केली आहे ती पाहता तेवढे ते होईल अशी आशा बाळगता येईल. लोकसभेच्या मागील दोन निवडणुकीत गोव्यात किमान ७४ तर कमाल ७८ टक्के मतदान झाले असल्याने यावेळेस ते ८० टक्क्यांच्यावरती जाऊ शकेल, असाही विश्वास व्यक्त केला जातो. 

मतदारांची अनेक कारणांसाठीची उदासीनता हे मतदानाची एकूण टक्केवारी घटण्यामागील एक कारण असले तरी आपल्या पसंतीचे उमेदवार रिंगणात असणे हीही मतदारांसाठी एक प्रकारची ऊर्जा ठरू शकते. गोव्यात उत्तरेत भाजपचे श्रीपाद नाईक, काँग्रेस आघाडीचे रमाकांत खलप आणि आरजीचे मनोज परब आपल्या मतदारांना बाहेर काढू शकले तर मतदानाचा टक्का वाढणे कठीण नाही. उत्तर गोव्यात लोकसभा निवडणुकीत सरासरी मतदान ७४ ते ७६ टक्के तर दक्षिण गोव्यात ते ७७ ते ७८ टक्क्यांवर जाते. दक्षिण गोव्यात यावेळी उद्योजिका पल्लवी धेंपो यांच्या रूपाने प्रथमच एक महिला उमेदवार रिंगणात आहेत तर काँग्रेस पक्षातर्फे कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांच्यावर मतदारांना बाहेर काढण्याची जबाबदारी आहे आणि त्यात त्यांना यश आल्यास निवडणूकही दोन्ही मतदारसंघात चुरशीची ठरू शकेल. भाजपने आपल्या दोघाही उमेदवारांसाठी प्रचाराच्या आघाडीवर करता येईल ते सर्व काही केले आणि बत्तीस तेहतीस आमदारही त्यांच्या पाठीशी असल्याने दोघाही उमेदवारांनी फार मोठी आघाडी घेतल्याचे चित्र आजच्या घडीला दिसते. मतदानाचा टक्का वाढला तर तो त्यांच्याच फायद्याचा ठरू शकेल. माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप आणि कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांच्यासाठी राहुल गांधी, प्रियांका गांधी वा निदान मल्लिकार्जुन खर्गे यांनी एखादी प्रचार सभा येथे घेतली असती तर निश्चितच काही फरक पडला असता, पण अशी सभा आयोजित करण्याची कुवत आज गोव्यात आपल्या पक्ष संघटनेकडे नाही याची कल्पना असल्याने ती आयोजित करण्याचे पक्षाने टाळले. गोव्यात मतदानाचा टक्का वाढलाच तर तो आपल्यासाठी अनुकूल असेल, असे मात्र काँग्रेसला म्हणता येणार नाही.


वामन प्रभू,  (लेखक ज्येष्ठ पत्रकार असून, राजकीय तसेच क्रीडा विश्लेषक आहेत)            

मो. ९८२३१९६३५९