ताकार-दावकोण येथील बंधाऱ्यावर पर्यटकांची दारूच्या नशेत दंगामस्ती

आंघोळीसाठी गर्दी : दुर्घटना घडण्याची शक्यता

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
05th May, 11:42 pm
ताकार-दावकोण येथील बंधाऱ्यावर पर्यटकांची दारूच्या नशेत दंगामस्ती

फोंडा : धारबांदोडा पंचायत क्षेत्रातील ताकार - दावकोण येथील दूधसागर नदीवरील बंधाऱ्यावर आंघोळीसाठी पर्यटकाची गर्दी उसळत आहे. धोकादायक स्पॉटवर पर्यटक दारुच्या नशेत दंगामस्ती करीत असल्याने दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. रविवारी ३०० पेक्षा अधिक पर्यटकांच्या गर्दीमुळे परिसराला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले. धोकादायक स्पॉटवर पोलिसांनी गस्त घालण्याची मागणी परिसरातील लोक करीत आहेत.


धोकादायक स्पॉटवर गेल्या कित्येक वर्षांपासून बुडून मृत्यू होण्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत. त्यामुळे स्थानिक पंचायतीतर्फे पर्यटकांना सूचना देणारे फलक शोभेच्या वस्ती बनल्या आहे. पर्यटक फलकाकडे लक्ष न देता नदीवर बिनधास्तपणे आंघोळीसाठी गर्दी करीत आहेत. रविवारी दुपारी परिसरात पाहणी केली असता ३०० पेक्षा अधिक पर्यटकांची गर्दी दिसून आली. त्याचप्रमाणे खासगी बसेस घेऊन सुद्धा मडगाव, वास्को व अन्य परिसरात आंघोळीसाठी आल्याचे दिसून आले. संगीताच्या तालावर आणि दारूच्या नशेत पर्यटक बंधाऱ्यावर धिंगाणा घालत असल्याने दुर्घटना घडण्याची शक्यता स्थानिक लोक व्यक्त करीत आहेत. गेल्या वर्षी एक युवतीचा त्या ठिकाणी बुडून मृत्यू झाला होता. दुर्घटना टाळण्यासाठी पोलिसांनी गस्त घालण्याची मागणी लोक करीत आहेत.

वाद होण्याचे प्रकार वाढले

ताकार-दावकोण येथील दूधसागर नदीवर उभारलेल्या बंधाऱ्यावर आंघोळीसाठी येणाऱ्या पर्यटकांची गर्दी वाढू लागल्याने परिसरात वाद होण्याचे प्रकार घडत आहेत. यापूर्वी अनेक पर्यटकांचा बुडून मृत्यू झाल्यानंतर स्थानिक लोकांचा आधार घ्यावा लागतो. त्यावेळी मात्र पर्यटक बघ्याची भूमिका घेत असतात. सध्या बेतोडा पंचायत क्षेत्रातील कोडार येथील नदीवर आंघोळीसाठी बंदी केल्याने ताकार - दावकोण तसेच ओकांब येथील नदीवर गर्दी दिसून येत आहे. 

हेही वाचा