एप्रिल महिन्यात अग्निशमन दलाने हाताळल्या ६३ घटना

४१ आगीच्या तर २२ आपत्कालीन परिस्थितीच्या घटनांचा समावेश

Story: गोवन वार्ता । प्रतिनिधी |
05th May, 11:49 pm
एप्रिल महिन्यात अग्निशमन दलाने हाताळल्या ६३ घटना

पणजी : गेल्या एप्रिलमध्ये अग्निशमन दलाने ४१ आगीच्या घटनांसह ६३ घटना हाताळल्या तसेच २२ आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यात आल्या. या घटनांमध्ये सुमारे ३ लाख ५ हजार रुपयांचे नुकसान झाले तर १३ लाख ९ हजार रु. ची मालमत्ता वाचविण्यात दलाला यश आले.

अग्निशामक दलाच्या म्हणण्यानुसार ६३ घटनांपैकी ३२ घटना उत्तर गोव्यात घडल्या. त्यापैकी २१ आगीच्या आणि ११ आपत्कालीन घटना होत्या. तर दक्षिणेत ३१ घटनांची नोंद झाली. त्यातील २० आगीच्या घटना व ११ आपत्कालीन घटनांचा समावेश आहे. बार्देशमध्ये सर्वाधिक ११ घटना घडल्या. त्यामध्ये ७ आगीच्या आणि ४ आपत्कालीन परिस्थितीच्या घटना घडल्या. सासष्टी तालुक्यात ७ आगीच्या आणि २ आपत्कालीन घटनांसह ९ घटना घडल्या.

या घटनांमध्ये आठ प्राणी आणि एका व्यक्तीला वाचविण्यात अग्निशामक दलाला यश आले.

डिचोली आणि तिसवाडी तालुक्यांत प्रत्येकी २ प्राणी तर पेडणे, सत्तरी, काणकोण, फोंडा तालुक्यात प्रत्येकी १ प्राणी वाचविण्यात अग्निशामक दलाला यश आले आहे. सासष्टी तालुक्यात एका व्यक्तीला वाचविले तर तिसवाडी तालुक्यात एका प्राण्याचा मृत्यू झाला, असे अग्निशामक दलातर्फे सांगण्यात आले.