पोर्तुगालमधून निघालेल्या बोटीवरील बेपत्ता युवकाचा शोध सुरूच

कुंकळ्ळीतील युवकाचा कोस्टगार्डकडून शोध

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
05th May, 11:57 pm
पोर्तुगालमधून निघालेल्या बोटीवरील बेपत्ता युवकाचा शोध सुरूच

मडगाव : लिस्बन पोर्तुगाल येथून लंडनकडे निघालेल्या अॅम्बेसिडर क्रुझ लाइनच्या अॅम्बियन्स बोटीवरील गोमंतकीय युवक शुक्रवारपासून बेपत्ता झाला आहे. गोव्यातील कुंकळ्ळीतील रहिवासी असलेला हा युवक असिस्टंट इलेक्ट्रिशियन म्हणून बोटीवर कार्यरत होता. या गोमंतकीय युवकाचा शोध कोस्टगार्डकडून घेतला जात असून बोट पुढील प्रवासाला निघाल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

अॅम्बेसिडर क्रुझ लाइनच्या मालकीच्या अॅम्बियन्स या प्रवासी बोटीवर कुंकळ्ळी येथील रहिवासी असलेला युवक काम करत होता. गुरुवारी सहकाऱ्यांसोबत नाश्ता केल्यानंतर त्याने आपली तब्येत चांगली नसल्याचे सांगत तो खोलीत जाण्यासाठी बाहेर पडला. त्यानंतर सहकाऱ्यांना तो पुन्हा दिसला नाही. या बोटीवर आणखी काही गोमंतकीय नाविक कार्यरत आहेत. सदर युवक बोटीवर दिसून येत नसल्याचे व शुक्रवारी कामावर आला नसल्याचे लक्षात येताच त्यांनी बोटीवरील वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली. प्रवासाला पुढे निघालेली बोट ज्याठिकाणी युवक शेवटच्या क्षणी पाहण्यात आलला होता, त्याठिकाणापर्यंत पुन्हा आणण्यात आली. मात्र, शोधाशोध करुनही युवक सापडला नाही. अॅम्बियन्स नावाचे हे जहाज जगभरातील दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यावर होते. बेपत्ता युवकाचा कोस्टगार्डकडून शोध घेण्यात येत असून जहाज पुढील मार्गावर निघाल्याचे सांगण्यात आले. काही माहिती मिळाल्यास जहाजावरील सहकारी व प्रवाशांना याची माहिती देण्यात येणार आहे. ही माहिती समजताच जगभरातील अनेकांनी सदर युवकाच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना केली.

गोवन सीमन असोसिएशन ऑफ इंडिया या खलाशी संघटनेचे अध्यक्ष फँक व्हिएगस यांनी सांगितले की, कुंकळ्ळीतील युवक अँम्बियन्स या बोटीवर कामाला होता. क्रुझ कंपनी व तटरक्षक दलाकडून शोध मोहीम सुरू आहे. कंपनीच्या विनंतीवरुन सदर युवकाचे नाव जाहीर करण्यात आले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.