पाडेली सत्तरी येथील तरुणाने स्वयंअपघातात गमावला जीव

चालू वर्षी सत्तरीतील अपघातांमध्ये पाच जणांनी गमावला प्राण

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
05th May, 11:37 pm
पाडेली सत्तरी येथील तरुणाने स्वयंअपघातात गमावला जीव

वाळपई : गावडेवाडा पाडेली सत्तरी येथील ऋषिकेश राजेश गावडे (२२) या तरुणाचा रविवारी रात्री ८.४५ वा. सुमारास स्वयं अपघातात मृत्यू झाला.

सत्तरीत अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली असून चालू वर्षी पाच जणांनी प्राण गमावला आहे. गावडेवाडा पाडेली सत्तरी येथील ऋषिकेश राजेश गावडे याला रविवारी अपघातात जीव गमवावा लागला आहे.

वाळपई पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ऋषिकेश गावडे आपली दुचाकी जी. ए. ०४ एन ३२८३ घेऊन गुळेलीच्या दिशेने जात होता. गाडीवरील त्याचे नियंत्रण सुटून रस्त्याच्या बाजूला असलेल्या दगडी चिऱ्यांना गाडीने धडक दिली‌‌. डोक्यावर हेल्मेट नसल्यामुळे डोक्याला गंभीर दुखापत झाली.

याबाबतची माहिती मिळताच शेखर लक्ष्मण सावईकर यांनी तत्काळ त्याला वाळपईच्या सरकारी सामाजिक रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.

अपघातात गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ऋषिकेश याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे भागामध्ये खळबळ निर्माण झाली आहे. वाळपई पोलीस स्थानकाचे सहाय्यक उपनिरीक्षक नवनाथ गावस यांनी घटनास्थळी जात घटनेचा पंचनामा केला. सध्या मृतदेह वाळपई सरकारी सामाजिक रुग्णालयाच्या शवागारामध्ये ठेवण्यात आला आहे. सोमवारी सकाळी गोवा मेडिकल कॉलेज येथे उत्तरीय तपासणी करण्यात आल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.

ऋषिकेश दुचाकी घेऊन कुठे जात होता याची माहिती मिळू शकली नाही. मात्र, गावडेवाडा पाडेली येथे हे कुटुंब राहते. त्याचे वडील राजेश हे गुळेली याठिकाणी गाडा चालवितात. घरची परिस्थिती अत्यंत गरीबीची असल्यामुळे जगण्यासाठी त्यांचे कुटुंब बराच संघर्ष करीत आहे.

वाळपई पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक अल्लाउद्दीन यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नवनाथ गावस अधिक तपास करीत आहेत. वाळपई पोलीस स्थानकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.