पंतप्रधान मोदींनी केला श्रीपाद नाईकांच्या कार्याचा गौरव

बूथ जिंकण्यावर लक्ष केंद्रीत करण्याचे कार्यकर्त्यांना केले आवाहन

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
01st May, 12:42 am
पंतप्रधान मोदींनी केला श्रीपाद नाईकांच्या कार्याचा गौरव

पणजी : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांना त्यांच्या कार्याचा गौरव करणारे व त्यांना येत्या लोकसभा निवडणुकीबद्दल शुभेच्छा देणारे पत्र पाठविले आहे.

या पत्रात नरेंद्र मोदी म्हणतात, भाजपचे एक समर्पित कार्यकर्ता म्हणून नेहमी आपणाला अपार कष्ट घेताना मी पाहिले आहे. केंद्र सरकारमध्ये माझे एक महत्त्वाचे व एक अनुभवी सहयोगीच्या रुपात विविध योजनांव्दारे देशवासियांना जोडण्यात आणि गोवासहीत देशभरात पर्यटन क्षेत्राला मजबुती देण्यासाठी आपण केलेले काम उल्लेखनीय आहे. गोव्यात भाजप मजबूत करण्यात आपले मोठे योगदान आहे. उत्तर गोवा लोकसभा क्षेत्रात आपण केलेली विकामकामे आणि तिथल्या लोकांच्या सेवेप्रति आपण करीत असलेले प्रयत्न आपणास नवीन उंची प्राप्त करून देणारे आहेत.

नरेंद्र मोदी पुढे म्हणतात, आपण जनतेचे आशीर्वाद घेऊन संसदेत येणार आणि आम्ही सगळे मिळून देशवासियांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न करू. आपणासारखे ऊर्जावान साथी संसदेत मला बळ देतील.

आपल्या लोकसभा क्षेत्रातील मतदारांना आणि कार्यकर्त्यांना विनम्रपणे सांगू इच्छितो की, ही निवडणूक सामान्य निवडणूक नाही. ही निवडणूक, काँग्रेसच्या पाच-सहा दशकांच्या राजवटीत आमच्या कुटुंबांनी आणि कुटुंबातील बुजूर्गांनी जे कष्ट उपसले आहेत, त्यातून मुक्ती मिळवून देणारे महत्त्वपूर्ण क्षण आहेत.

भाजपला मिळणारे प्रत्येक मत एक मजबूत देश बनविण्यात आणि २०४७ पर्यंत भारताला एक विकसित देश बनविण्याच्या प्रयत्नांना गती देणारे आहे. निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यात उत्साहपूर्वक कल हे सांगत आहे की या निवडणुकीत जनतेने आमच्या ‘व्हिजन’ ला समर्थन देण्याचा ठाम निश्चय केलेला आहे.

या दिवसांत उकाडा प्रचंड वाढलेला असून लोकांच्या अडचणी मी पुरेपूर जाणून आहे. परंतु ही निवडणूक देशाच्या भविष्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे. यासाठी लोकांनी ऊन वाढण्याच्या आधी मतदान केंद्रावर जाऊन सकाळी-सकाळी मतदान करावे.

कार्यकर्त्यांना आवाहन

कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने लोकांना बाहेर काढून मतदान करायला प्रोत्साहित करत बूथ जिंकण्यावर आपले लक्ष केंद्रित करावे. लोकसभा क्षेत्रात यश मिळविण्यासाठी प्रत्येक बूथवर विजय निश्चित करण्यावर भर द्यावा.