भटवाडी-कोरगाव येथील धोंड ७० वर्षांपासून पाळतात लईराईचे व्रत

Story: वार्ताहर। गोवन वार्ता |
10th May, 06:33 pm
भटवाडी-कोरगाव येथील धोंड ७० वर्षांपासून पाळतात लईराईचे व्रत

कोरगाव : शिरगाव - डिचोली येथील श्री लईराई देवीची जत्रा रविवार, दि. १२ मे रोजी साजरी होणार आहे. यानिमित्त पेडणे तालुक्यातील विविध भागातील धोंडांनी एकत्रित येऊन व्रत करण्यास प्रारंभ केला आहे. भटवाडी कोरगाव येथे गेल्या ७० वर्षांपासून धोंड व्रत करीत आहेत.

कोरगाव भटवाडी येथील डोंगर भागात काही वर्षांपूर्वी एक लहान कौलारू मंडप होता. नंतर दरवर्षी धोंड वाढत गेल्यावर त्याठिकाणी प्रगती होत गेली. त्या ठिकाणी नैसर्गिक झरी असल्याने पाच ते सात दिवस व्रत करणाऱ्यांना पाणी उपलब्ध होते. गावातील लोकांचे सहकार्य असल्याने या ठिकाणी लईराई देवीचे धोंड मोठ्या उत्साहाने या ठिकाणी व्रत पाळतात. यात काही महिला देखील धोंड व्रत पाळतात.  


या ठिकाणी ४५ ते ५० धोंड व्रत पाळतात. यात अनेक व्यावसायिक, सरकारी कर्मचारी, सामान्य बांधव देखील पाच दिवस आपले सर्व कामे बाजूला ठेवून एकत्रित येऊन हे व्रत पाळून जत्रेचा दिवस उजाडण्याची वाट बघतात. जत्रेदिवशी शिरगावमध्ये जाऊन आपले व्रत पूर्ण करतात. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा कायम ठेवण्याचे कार्य आजचे युवा करीत आहेत. ज्येष्ठ नागरिक नारायण रेडकर, विजय रेडकर व नामदेव बली यांनी धोंड करीत असलेल्या व्रताविषयी माहिती दिली. 

गेल्या अनेक वर्षांपासून चालत आलेल्या या धोंड व्रतामध्ये मलादेखील व्रत पाळण्यासाठी सहभागी करून घेतले. आपल्या वाड्यावरील व ज्येष्ठांनी चालवलेले हे व्रत असेच पुढे नेण्यासाठी आज अनेक धोंड येथे येऊन व्रत स्वीकारत आहेत. आई लईराई देवीच्या आशीर्वादाने आम्ही येथे सगळे मिळून व्रत करतो, असे भटवाडी कोरगाव येथील विनिता मांद्रेकर यांनी सांगितले.