होंडा, गुळेली पंचायत क्षेत्रात बिघडली मतदान यंत्रे

मतदारांची तारांबळ : सत्तरी तालुक्यात सरासरी ८५ टक्के मतदान

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
08th May, 01:13 am
होंडा, गुळेली पंचायत क्षेत्रात बिघडली मतदान यंत्रे

वाळपई : लोकसभेच्या उत्तर गोवा मतदारसंघासाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत मंगळवारी सत्तरी तालुक्यात सरासरी ८५ टक्के मतदान झाले. दरम्यान, होंडा पंचायत क्षेत्रातील बूथ क्रमांक ४९ व गुळेली पंचायत क्षेत्रातील मुरमुणे येथील बूथमधील मतदान यंत्र काही काळासाठी बिघडल्याने मतदारांची तारांबळ उडाली.

सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. नऊ वाजेपर्यंत मतदारांचा अल्प प्रतिसाद लाभल्याचे चित्र पाहावयास मिळाले. अवघे १३ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर दुपारी १ वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी वाढली. १ वाजेपर्यंत सरासरी ५० टक्के तर, दुपारी ३ वाजेपर्यंत जवळपास ७० टक्के मतदान झाले. काही मतदान केंद्रावर सकाळी नऊ वाजेपर्यंत मतदानच झाले नाही.

सत्तरी तालुक्याचे उपजिल्हाधिकारी नीलेश धायमोडकर मतदार केंद्राशी सातत्याने संपर्कात होते.

होंडा येथे मतदान यंत्र बिघडले

होंडा पंचायत क्षेत्रातील बूथ क्रमांक ४९ यावर मतदान यंत्र काही काळासाठी बिघडले. यामुळे केंद्रावर धावपळ सुरू झाली. शेवटी तालुका उपजिल्हाधिकाऱ्यांनी सदर ठिकाणी लक्ष देत एका तासामध्ये मतदान यंत्र दुरुस्ती करण्याची प्रक्रिया राबविली.

मुरमुणे मतदान केंद्रावर मशीन बिघडले

गुळेली पंचायत क्षेत्रातील मुरमुणे या ठिकाणी मतदान यंत्र बिघडल्यामुळे मतदारांची तारांबळ उडाली. दोन तासानंतर दुसरे मशीन बसविण्यात आल्यानंतर त्या ठिकाणी मतदान पुन्हा एकदा सुरू करण्यात आले.

मतदान केंद्रामधून काँग्रेस कार्यकर्ते गायब

वाळपई व पर्ये या दोन्ही मतदारसंघातील जवळपास सर्वच मतदान केंद्रांवर काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते गायब असल्याचे चित्र पाहावयास मिळाले. तर, भाजपचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात मतदान केंद्रावर वावरताना दिसत होते.

कुठे आहेत थंडपेये?

सध्या उष्णतेचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढले आहे. याचा मतदानावर परिणाम होऊ नये म्हणून निवडणूक आयोगाने मतदान केंद्रांवर येणाऱ्या मतदारांना थंडपेये व पाण्याच्या बाटलीची व्यवस्था केली होती. मात्र, सत्तरी तालुक्यातील अनेक मतदान केंद्रांवर ही सुविधा उपलब्ध नसल्याचे पहावयास मिळाले. अनेक मतदारांनी याबाबत मागणी केली. तरीसुद्धा त्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यात आली नसल्याचे समजते.