साखळीत काहींची नावे मतदार यादीतून गायब

Story: वार्ताहर। गोवन वार्ता |
08th May, 01:21 am
साखळीत काहींची नावे मतदार यादीतून गायब

साखळी : साखळी मतदारसंघात भरघोस मतदान झाले. संध्याकाळी ५ वा. नंतर मतदान केंद्रांवर मतदारांनी गर्दी केल्याचे दिसून आले. त्यामुळे मतदानाची अंतिम वेळ संपूनही काही मतदान केंद्रांवर मतदारांची उपस्थिती होती. मात्र, साखळीत काहींची नावे यादीतून गायब झाल्याने मतदारांनी नाराजी व्यक्त केली.

कडक ऊन आणि असह्य उकाडा लक्षात घेऊन विशेषतः ज्येष्ठ मतदारांनी सकाळी लवकरच मतदान करणे पसंत केले. कडक ऊन पडल्यावर सकाळी ११ वा. नंतर काही प्रमाणात मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी दिसत नव्हती.

साखळी मतदारसंघात एकूण ५० मतदान केंद्रांतून मतदान प्रक्रिया पार पडली. सर्व मतदान केंद्रांवर मतदारांनी बराच उत्साह दाखवला. दुपारी १ वा. पर्यंत साखळी मतदारसंघाचे मतदान ६१ टक्के इतके झाले होते. तर संध्याकाळी ५ वा. पर्यंत ७५ टक्के मतदान झाले.

साखळी शहरातील काही बूथमधील मतदारांची नावे गहाळ झाल्याची प्रकरणे मतदानाच्यावेळी समोर आली. शहरातील प्रभाग क्र. ४, ५, ६ मधील काही मतदारांची नावे गहाळ झाल्याने त्यांना मतदानाचा हक्कच बजावता आला नाही. तर काही मतदारांची नावे एका भागातून दुसऱ्या भागामध्ये समाविष्ट करण्यात आल्याने त्यांना आपले मतदान केंद्र शोधताना शिकस्त करावी लागली. या प्रकरणावरून सदर मतदारांनी बरीच नाराजी व्यक्त केली.

साखळी मतदारसंघातील अनेक नवीन मतदारांनी या निवडणुकीत उत्साहाने मतदान केले.

आरोग्यमंत्री विश्वजीत राणे व आमदार दिव्या राणे यांनी विठ्ठलापूर कारापूर येथील विठ्ठल रखुमाई सरकारी प्राथमिक शाळेत उपस्थित राहून मतदान केले.