पुरावा नसल्याने खुनी हल्ल्यातून दोघा संशयितांची निर्दोष मुक्तता

सडये येथे हरमलकर यांच्यावर झाला होता गोळीबार

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
27th April, 11:24 pm
पुरावा नसल्याने खुनी हल्ल्यातून दोघा संशयितांची निर्दोष मुक्तता

म्हापसा : तीन माड, मायना पाटो, सडये शिवोली येथे अमय हरमलकर यांच्यावर झालेल्या खुनी हल्ला खटल्यातून संशयित आरोपी सचिन शिवा कोरगावकर व तुकाराम उर्फ तुकी गंगाराम खोर्जुवेकर यांची पुराव्याअभावी म्हापसा अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.

फिर्यादी मनोहर हिरेनवाले यांचा मृत्यू झाला असून जखमी अमय हरमलकर हा २०१३ पासून बेपत्ता आहे. हे दोघेही हरमलकर यांच्या हत्येच्या केलेल्या प्रयत्नातील साक्षीदार होते. साक्षीदारांच्या उपस्थितीशिवाय या हत्येचा प्रयत्न केल्याबद्दल आरोपींना दोषी मानले जाऊ शकत नाही. तसेच फिर्यादींचे मित्र घटनास्थळी उपस्थित असूनही त्यांच्या सुरक्षेसाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. त्यांना आरोपींनी शिवीगाळ केली होती.

आरोपी तुकाराम खोर्जुवेकर याच्या वागाळी कामुर्ली येथील घराच्या आवारातून पिस्तूल आणि रिकामी काडतूस जप्त करण्यात आल्याची माहिती चौकशी अधिकाऱ्यांनीच साक्षीदाराला दिली होती. त्यामुळे ते कुठे होते याची माहिती चौकशी अधिकाऱ्यांना होती. त्यामुळे या भा.दं.सं.च्या ५०४, ३०७ व ३४ तसेच शस्त्रात्र कायदा कलम ३, ५, ७, २५ व २७ नुसार नोंदवलेल्या खटल्यातून दोन्ही आरोपींना निर्दोष ठरविले जात आहे, असा निवाडा न्यायाधीश बॉस्को रॉबर्टस् यांनी दिला.

दरम्यान, हा खुनी हल्ल्याचा प्रकार २६ नोव्हेंबर २०१२ रोजी उत्तररात्री १२.४५ वा. सुमारास घडला होता. तीन माड, मायना पाटो, सडये शिवोली येथील पूजा बार अॅण्ड रेस्टॉरन्टजवळ फिर्यादी मनोहर हिरेनवाले, अमय हरमलकर, राहुल सातार्डेकर व सुनील हरमलकर हे चौघे बसले होते. दुचाकीवरून जाणाऱ्या संशयित आरोपी सचिन कोरगावकर (बामणवाडा कामुर्ली) व तुकाराम अर्फ तुकी खोर्जुवेकर (वागाळी कामुर्ली) यांनी त्यांना शिवीगाळ केली होती. त्यामुळे फिर्यादी मनोहर व अमय यांनी त्यांचा मोटारसायकलवरून पाठलाग केला. सातेरी गॅरेजजवळ पोहोचताच तुकाराम याने अमय यांच्यावर गोळीबार केला होता.

तुकाराम याच्याकडून गोळीबार

तुकाराम खोर्जुवेकर याने आपल्याकडील पिस्तूल काढून गोळीबार केला होता. ही गोळी अमय हरमलकर यांच्या हाताच्या तळव्यातून आरपार झाली होती. याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी गुन्हा नोंदवून संशयित आरोपींना त्याच दिवशी अटक केली होती. 

हेही वाचा