सीआरझेडचे उल्लंघन केल्याप्रकरणी हणजुणेतील ११ आस्थापने पाडण्याचे आदेश

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
09th May, 12:20 am
सीआरझेडचे उल्लंघन केल्याप्रकरणी हणजुणेतील ११ आस्थापने पाडण्याचे आदेश

पणजी : हणजूण किनारी भागात सीआरझेड आणि एनडीझेड क्षेत्रात नियमांचे उल्लंघन करणारी ११ आस्थापने पाडण्याचे आदेश गोवा किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने दिले आहेत. परवानगी देताना घालून दिलेल्या अटी व शर्तींनुसार बांधकाम न केल्यामुळे तसेच आस्थापनाच्या कायदेशीरपणाचे दस्तऐवज न दिल्याने प्राधिकरणाने आस्थापने पाडण्याचे आदेश दिले.

उच्च न्यायालयाने गेल्या महिन्यात हणजूण किनारी भागातील सीआरझेड आणि एनडीझेड झोनमधील नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १७५ आस्थापनांना सील करण्याचे आदेश दिले होते. या आस्थापनांनी पंचायत राज कायदा आणि गोवा जमीन विकास आणि बांधकाम कायद्यांतर्गत बांधकामासाठी परवाने घेतले आहेत का, याची तपासणी केल्यानंतर न्यायालयाने हे आदेश दिले होते. त्यानुसार पंचायत व जीसीझेडएमने १७५ आस्थापनांची पाहणी करून सील केले व त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली.

नोटिसांना उत्तर देण्यासाठी ३५ आस्थापना मालकांना २ एप्रिल रोजी बैठकीत बोलावण्यात आले होते. त्यातील अकरा आस्थापने पाडण्याचे आदेश दिले आहेत. २२ आस्थापनांची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.