पत्नीच्या खूनप्रकरणी पती दोषी, पाच वर्षाच्या मुलीनेही दिली साक्ष

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
27th April, 12:20 am
पत्नीच्या खूनप्रकरणी पती दोषी, पाच वर्षाच्या मुलीनेही दिली साक्ष

मडगाव : पत्नीचा खून केल्याप्रकरणी संशयित अशोक कुमार याला दक्षिण गोवा अतिरिक्त सत्र न्यायालयाकडून खूनप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. याप्रकरणी २९ एप्रिल रोजी पुढील सुनावणी होणार असून शिक्षा सुनावली जाणार आहे.

दि. २५ मार्च २०१९ रोजी रात्री दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास झुआरीनगर येथील अशोक कुमार याने घरगुती भांडणातून पत्नी बिंदू (३९) हिचा गळा दाबून खून केला होता. यानंतर संशयिताने सांकवाळ पोलीस आऊट पोस्टवर जात पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. न्यायालयाकडून सुनावणीवेळी १५ साक्षीदारांच्या साक्ष नोंद करण्यात आल्या. यात संशयिताच्या पाचवर्षीय मुलीचाही समावेश आहे. तिने न्यायालयासमोर वडिलांना आईचा गळा दाबताना पाहिल्याचे सांगितले. या खूनप्रकरणी वेर्णाचे तत्कालिन पोलीस निरीक्षक संदेश चोडणकर यांनी तपास अधिकारी म्हणून काम पाहिले. सरकारी वकिल म्हणून उत्कर्ष आवडे यांनी काम पाहिले. अतिरिक्त सत्र न्यायाधीश पूजा कवळेकर यांच्या न्यायालयात ही सुनावणी झाली. न्यायालयासमोरील पुराव्यांच्या आधारे अशोक कुमार याला दोषी ठरवण्यात आले. 

हेही वाचा