प. बंगालला वादळी पावसाचा तडाखा; ६ ठार, विमान सेवेवर परिणाम

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
07th May, 12:40 pm
प. बंगालला वादळी पावसाचा तडाखा; ६ ठार, विमान सेवेवर परिणाम

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये काल संध्याकाळी मुसळधार पाऊस आणि वादळामुळे सहा जणांचा मृत्यू झाला. राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण बंगालमध्ये जोरदार पाऊस झाला. यावेळी वादळाच्या तडाख्यात सहा जणांना आपला जीव गमवावा लागला.

नादिया, पुरुलिया आणि पूर्वा वर्धमान जिल्ह्यासह दक्षिण बंगालमधील विविध जिल्ह्यांमध्ये एका विवाहित जोडप्यासह सहा जणांचा मृत्यू झाला, असे आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले आहे. पूर्व रेल्वेच्या सियालदाह विभागातील सियालदह-कॅनिंग मार्गावरील उपनगरीय रेल्वे सेवा वादळाच्या वेळी ओव्हरहेड इलेक्ट्रिक ट्रॅक्शन वायरवर केळीची पाने पडल्याने तासाहून अधिक काळ या भागातील वीजपुरवठा खंडीत होता, असेही या अधिकाऱ्याने म्हटले आहे. रात्री ८ ते ९.१५ वाजेपर्यंत रेल्वे सेवा प्रभावित झाल्याचेही त्यांनी सांगितले.

खराब हवामानामुळे कोलकाताहून जाणारी काही विमाण उड्डाणे इतरत्र वळवावी लागली, अशी माहिती भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या (एएआय) सूत्रांनी दिली आहे. दिल्लीहून आणि बागडोगरा येथील येणारी विमाने खराब हवामानामुळे इतर विमानतळांवर वळवण्यात आली, असे सूत्रांनी म्हटले आहे.

कोलकाता ते रांचीला जाणारे विमान वादळामुळे उड्डाण करू शकले नसल्याने पार्किंग बेमध्ये परतावे लागले. दरम्यान, १० मे पर्यंत या भागात वादळाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

हेही वाचा