सासष्टीत मतदानासाठी रांगा, जाणून घ्या आमदार काय म्हणाले...

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
07th May, 01:36 pm
सासष्टीत मतदानासाठी रांगा, जाणून घ्या आमदार काय म्हणाले...

मडगाव : नावेली मतदारसंघातील विविध मतदान केंद्रांवर मतदानासाठी लोकांच्या रांगा दिसून येत आहेत. लोक स्वत:हून घराबाहेर पडलेले आहेत. लोकांनी राज्यात व देशातील पायाभूत सुविधा व इतर विकासकामे पाहिलेली असून पुन्हा एकदा भाजपचे सरकार आणण्यासाठी लोक मतदान करत आहेत. नावेली मतदारसंघातील लोकांकडून या लोकसभा निवडणुकीतही इतिहास घडवण्यात येईल, असे मत आमदार उल्हास तुयेकर यांनी व्यक्त केले.


बाणावली मतदारसंघातील सातही गावांतून लोकांकडून विधानसभा निवडणुकीत बदल घडवण्यात आला. पुन्हा एकदा बदल घडवण्यासाठी मतदार सज्ज आहेत. देशासाठी, गोव्याच्या विकासासाठी लोक पुढे येत आहेत. हेच मतदान लोकांचे हक्क अबाधित ठेवणार, असे मत आमदार व्हेंझी व्हिएगस यांनी व्यक्त केले.

नुवे मतदारसंघातील प्रचारावेळी काही चांगले अनुभव आले व काही वाईटही अनुभव आले. नुवेतील लोक ‘कमळ’ हे चिन्ह स्वीकारणार का, हे निकालावेळी दिसून येईल. काहीजणांकडून चुकीची माहिती देत लोकांची दिशाभूल करण्यात आली याबाबत खंत वाटते. साधारणत: सहा हजार मते मिळाली तरी आपण समाधानी आहोत, असे मंत्री आलेक्स सिक्वेरा य‍ांनी म्हणाले.


सरदेसाईंच्या मताला किंमत देत नाही : कामत

लोकसभेला जास्त मतदान होत नाही. पण मडगावात यावेळी जास्तीत जास्त ७० टक्के मतदान व्हावे, यासाठी प्रयत्न केलेले आहेत. यापूर्वी तीन निवडणुका भाजपच्या चिन्हावर लढलेल्या असल्याने आपणास कोणतीही अडचण नाही. सर्व जातीधर्माचे मतदार आपल्यासोबत कायम आहेत. दहा हजारांच्या मताधिक्क्याचे लक्ष्य ठेवलेले आहे. सरदेसाईंच्या मताला आपण किंमत देत नाही. त्यांच्यासोबत मोतीडोंगरावर गेलेल्यांकडून आपणास भेटत आपले चुकल्याचे सांगितले. मडगावात कुणाला पाहिजे त्याला उभे राहू देत आपणास फरक पडणार नाही. लोक माझे भवितव्य ठरवतात, असे आमदार दिगंबर कामत यांनी सांगितले.


प्रक्रिया योग्य झाल्यास कामत यांना राजकारण काय ते कळेल : सरदेसाई

आपण पुढील पिढीसाठी, भविष्यासाठी मतदान केलेले आहे. भाजपकडून पक्षांतराचे चुकीचे राजकारण करण्यात आलेले आहे. लोकांकडून मनातील राग या मतदानातून दिसून येईल. फातोर्ड्यातील काहीजणांनी पल्लवी धेंपोंना मतदान करणार असल्याचे सांगितले. त्यांना आपण निर्भयपणे मतदान करण्यास सांगितले. पण मडगावात झोपडपट्टी परिसरातील लोकांवर दबाव आहे. ईव्हीएम मशिन व सर्व प्रक्रिया योग्य झाल्यास राजकारण काय, हे कामत यांनी दिसून येईल. काँग्रेसकडे संघटन नाही, हे उघड झाले असले तरी त्यांच्या बाजूने लोक आहेत. लोकसभेतील विजय हा लोकांचा विजय असेल, असे आमदार विजय सरदेसाई यांनी सांगितले.

हेही वाचा