स्मार्ट सिटीच्या खोदकामावेळी पणजीत आढळली प्राचीन मूर्ती

तज्ज्ञांची समिती नेमून होणार संशोधन

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
01st May, 12:31 am
स्मार्ट सिटीच्या खोदकामावेळी पणजीत आढळली प्राचीन मूर्ती

पणजी येथे स्मार्ट सिटीचे खोदकाम करताना सापडलेली प्राचीन मूर्ती. (नारायण पिसुर्लेकर)       

पणजी : पणजीत स्मार्ट सिटीच्या कामासाठी खाेदाई करीत असताना जुन्या काळातील एक मूर्ती सापडली. ही मूर्ती राज्य पुरातत्त्व खात्याकडे देण्यात आली आहे. अशीच एक मूर्ती शिरदोणमध्येही यापूर्वी सापडली आहे. दरम्यान, अाचारसंहिता संपल्यानंतर तज्ज्ञांमार्फत या मूर्तीचे संशोधन करण्यासंदर्भातील पत्र सरकारला पाठवण्यात येईल, अशी माहिती पुरातत्त्व खात्याचे संचालक नीलेश फळदेसाई यांनी दिली.

पणजीत मिळालेली मूर्ती नेमकी किती वर्षांपूर्वीची किंवा कोणत्या कालखंडातील आहे, हे आताच सांगता येणार नाही. त्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करून अभ्यास, संशोधन करावे लागेल. सध्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्यामुळे समिती स्थापन करून संशोधन करणे शक्य नाही. आचारसंहिता संपल्यानंतर समिती स्थापून या मूर्तीचे संशोधन करण्याची मागणी सरकारकडे करण्यात येईल, असेही फळदेसाई यांनी नमूद केले. 

काहींनी ही मूर्ती कोणत्या कालखंडातील असेल, याबाबत तर्कवितर्क लढवण्यास सुरुवात केली. त्या संदर्भातील मेसेजही सोशल मीडियावर झळकले. परंतु तज्ज्ञांकडून संशोधन झाल्याशिवाय या मूर्तीबाबत ठोस असे काहीही सांगता येणार नाही, असे फळदेसाई यांनी स्पष्ट केले.


हेही वाचा