आसगावमध्ये नाईट क्लबला परवानगी नाहीच!

पंचायत मंडळाकडून खुलासा

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
27th April, 11:39 pm
आसगावमध्ये नाईट क्लबला परवानगी नाहीच!

म्हापसा : आसगाव पंचायत क्षेत्रात कोणत्याही प्रकारच्या डान्सबार किंवा क्लबला परवानगी दिलेली नाही. कोणाला याबाबत संशय असल्यास माहिती हक्काच्या माध्यमातून खात्री करून घ्यावी, असे आवाहन पंचायत मंडळाने पत्रकार परिषदेतून केले आहे.

सरपंच हनुमंत नाईक, सोनिया नाईक, राघोबा कांबळे, व्यंकटेश गोवेकर, वर्ल्डर ब्रिटो, अश्विनी पोखरे व तनया गावकर हे पंचायत कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत उपस्थित होते.

सरपंच हनुमान नाईक म्हणाले, गावात नाईट क्लबला परवानगी दिली असल्याचा दावा काही लोकांकडून होत आहे. याबाबत विविध ठिकाणी बैठका घेऊन अपप्रचारही सुरू आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात मुणांगवाडा येथे बार व रेस्टॉरंट बांधकामासाठी परवानगी देण्याची मागणी व्यावसायिकांनी केली होती. त्यानुसार पंचायत मंडळाने केवळ बार व रेस्टॉरंट बांधकामालाच परवानगी दिली होती.

या बांधकामाला ३१ मार्च २०२४ पर्यंतच परवानगी दिली होती. या दरम्यान पंचायतीने दिलेली परवानगी मागे घ्यावी अशी लेखी विनंती सदर बार व रेस्टॉरंट मालकानेच केली होती. त्यामुळे पंचायतीकडून पुढील कोणतीही कार्यवाही झाली नाही. याबाबतची सर्व कागदपत्रे पंचायत कार्यालयात उपलब्ध आहेत. कोणाला याची स्वत: खात्री करायची असल्यास माहिती हक्क कायद्याखाली अर्ज करून ती करावी, असे आवाहन सरपंच नाईक यांनी केले.

स्वत:च्या मालकीच्या बार व रेस्टॉरंट बांधकामाला दिलेली परवानगी रद्द करण्यासाठी पंचायतीकडे मागणी करणे आश्चर्यकारक आहे. भाटकारांनी आपल्या जमिनी परप्रांतीयांना विकू नये, असे आवाहन पंच सदस्य व्यंकटेश गोवेकर यांनी केले.

भाटकारांनी जमिनी विकू नये : कांबळे

गावात विविध सामाजिक विषय घेऊन जागृती घडविणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी भाटकारांची भेट घ्यावी. गावातील जमिनी विकण्यापासून त्यांना रोखावे, असे घडल्यास गावात कोणत्याही प्रकारचे अवैध व्यवसाय येणार नाहीत, असा दावा पंच सदस्य राघोबा कांबळे यांनी केला. 

हेही वाचा