गब्बर सहानी खूनप्रकरणी चुलतभावाचा जामिनासाठी अर्ज

जमिनीच्या वादातून झाला होता खून

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
09th May, 12:13 am
गब्बर सहानी खूनप्रकरणी चुलतभावाचा जामिनासाठी अर्ज

पणजी : मिर्झापूर-उत्तर प्रदेश येथील जमिनीच्या वादातून चंद्रिका उर्फ गब्बर सहानी (३२, रा. उत्तर प्रदेश) याचा आॅगस्ट २०२३ मध्ये खून करण्यात आला होता. दरम्यान, गब्बर याचा चुलतभाऊ राजकुमार प्रसाद याने गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे.

जुने गोवा पोलीस स्थानकाच्या हद्दीत २७ ऑगस्ट २०२३ रोजी सायंकाळी दांडो-करमळी येथील मानशीत हातपाय बांधलेल्या अवस्थेत अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. त्यानंतर जुने गोवा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला होता. त्यावेळी पर्वरी पोलीस स्थानकात २३ ऑगस्ट २०२३ रोजी चंद्रिका उर्फ गब्बर सहानी बेपत्ता असल्याचे समोर आले. त्या तक्रारदाराला जुने गोवे पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी बोलावले असता, त्याने मृतदेह गब्बरचा असल्याचा सांगितले.

दरम्यान, गब्बरची मिर्झापूर (उत्तर प्रदेश) येथे जमिनीच्या वादावरून चुलत भावांसोबत वाद झाल्याची माहिती तक्रारदाराने दिली. त्यानुसार, पोलिसांनी त्याचे चुलत भाऊ राजेंद्र प्रसाद, रणजीत प्रसाद, राजकुमार प्रसाद या तिघांची चौकशी केली. त्यावेळी त्यांनी गब्बरला मारहाण केल्यानंतर गवंडाळी पुलावरून पाण्यात फेकून दिल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी गब्बरच्या मृत्यू प्रकरणी खुनाचा गुन्हा नोंद करून त्याचे चुलतभाऊ राजेंद्र प्रसाद, रणजीत प्रसाद, राजकुमार प्रसाद यांच्यासह अखिलेश कुमार साहनी या चाैघांना अटक केली. अटक केल्यानंतर न्यायालयाने चारही संशयितांना प्रथम पोलीस कोठडी ठोठावली. ती संपल्यानंतर त्या संशयितांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. याच दरम्यान संशयितांनी पणजी येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. तो फेटाळून लावल्यानंतर वरीलपैकी संशयित राजकुमार प्रसाद याने गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे.