पीडित मुलीने जबाब फिरविल्याने युवकाची निर्दोष मुक्तता

लैंगिक अत्याचारानंतर राहिली होती गर्भवती : कालांतराने आरोपीशीच झाले लग्न

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
27th April, 12:14 am
पीडित मुलीने जबाब फिरविल्याने युवकाची निर्दोष मुक्तता

पणजी : लग्नाचे आमिष दाखवून १७ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी वैद्यकीय पुरावे नसल्यामुळे तसेच पीडित मुलीने जबाब फिरविल्यामुळे संशयिताची पुराव्याअभावी निर्दोष सुटका करण्यात आली. याबाबतचा निवाडा पणजी येथील जलदगती व पोक्सो न्यायालयाचे न्या. दुर्गा मडकईकर यांनी दिला.

म्हापसा पोलिसांनी या प्रकरणी २ मे २०२३ रोजी गुन्हा दाखल केला होता. १७ वर्षीय पीडित मुलगी आणि संशयिताचे कुटुंबीय कर्नाटकातील अाहे. त्यांची ओळख असल्यामुळे दोन्ही कुटुंबीयांनी त्यांच्या लग्नाला होकार दिला होता. दरम्यान, कुटुंबीयांनी पीडित मुलगी १८ वर्षांची झाल्यानंतर तिचे संशयिताशी लग्न करण्याचे ठरविले होते.

पीडित मुलगी अल्पवयीन असताना २ मे २०२३ रोजी तिच्या पोटात त्रास होऊ लागल्यामुळे तिला इस्पितळात नेण्यात आले होते. तिथे डॉक्टरांनी तिची तपासणी केली असता, तिच्यावर संशयित युवकाने जानेवारी २०२३ मध्ये लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले. त्यानंतर तेथील डॉक्टरांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी पीडित मुलीचा जबाब नोंद करून गुन्हा दाखल केला. त्यानुसार पोलिसांनी संशयिताविरोधात भादंसंच्या ३७६ आणि बाल लैंगिक शोषणविरोधी कायदा २०१२ (पॉक्सो) कायद्याच्या ४ कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. दरम्यान, पीडित मुलीने वैद्यकीय चाचणी करण्यास नकार दिला. त्यानंतर पोलिसांनी २ मे २०२३ रोजी संशयित युवकाला अटक केली. १२ मे २०२३ रोजी न्यायालयाने संशयिताला सशर्त जामीन मंजूर केला. त्यानंतर पोलिसांनी तपास पूर्ण करून २३ जून २०२३ रोजी न्यायालयात संशयित युवकाविरोधात आरोपपत्र दाखल केले. याच दरम्यान पीडित मुलगी आणि संशयितांनी ठरल्याप्रमाणे लग्न केले. त्यानंतर संशयित युवकाविरोधात आरोप निश्चित करून खटला सुरू केला. पीडित मुलीची न्यायालयात उलटतपासणी केली असता, तिने जबाब फिरविला. मुलीने वैद्यकीय तपासणी करण्यास नकार दिल्यामुळे वैद्यकीय अहवाल नसल्याचे निरीक्षण नोंदवून न्यायालयाने संशयित युवकाची तथा पीडित मुलीच्या पतीची पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली आहे. 

हेही वाचा