गाझा पट्टीतील युद्ध थांबवण्याची चिन्हे मावळली

Story: विश्वरंग |
08th May, 01:18 am
गाझा पट्टीतील युद्ध थांबवण्याची चिन्हे मावळली

इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धबंदीचा प्रस्ताव फिस्कटल्यानंतर इस्रायली लष्कराने गाझा पट्टीतील रफाह शहरात कारवाई सुरू केली आहे. इस्रायली सैन्याने आता रफाह सीमेपलीकडील गाझा परिसराचा ताबा घेतला आहे. त्यामुळे हे युद्ध आणखी संहारक होणार हे जवळजवळ स्पष्ट झाले आहे.

वास्तविक, सात महिन्यांपासून सुरू असलेले हे युद्ध संपवण्याच्या उद्देशाने इजिप्त आणि कतारच्या मध्यस्थीने मांडलेला युद्धविराम प्रस्ताव हमासने मान्य केला होता. त्यात इस्रायली संरक्षण दलांनी अचानक घोषणा केली की, ‘पूर्व रफाहमधील हमासच्या दहशतवादी तळांवर हल्ला करणार आहे.’ त्यामुळे हे युद्ध थांबवण्याची चिन्हे मावळली आहेत.

आता इस्रायली रणगाडे गाझामधील हमासचा शेवटचा गड असलेल्या रफाहमध्ये घुसले आहेत. वास्तवात एका दिवसापूर्वी हमासचे प्रमुख इस्माइल हनीयेह यांनी युद्धबंदीचा प्रस्ताव स्वीकारल्याचे जाहीर केले होते. तथापि, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या कार्यालयाने हा करार देशाच्या मागण्यांशी सुसंगत नाही, असे स्पष्ट केले आहे.

इस्रायली संरक्षण दलाने (आयडीएफ) केरेम शालोम सीमा क्रॉसिंगवर हमासच्या रॉकेट हल्ल्याला उत्तर म्हणून शहरावर हल्ला केल्यानंतर पूर्व रफाहमधील अंदाजे १ दशलक्ष रहिवाशांना शहर रिकामे करण्याचे आदेश दिले आहेत. हमासच्या हल्ल्यात त्यांचे तीन सैनिक ठार झाले, तर पॅलेस्टिनी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रफाह येथे प्रत्युत्तरादाखल केलेल्या हल्ल्यात एका लहान मुलासह १९ जण ठार झाले आहेत.

दोन दिवसापासून इस्रायली सैन्याने पॅलेस्टिनींना रफाह शहरावर हल्ले सुरूच ठेवत शहर रिकामे करण्याचे आवाहन केले. आयडीएफचे प्रवक्ते रिअर अॅडमिरल डॅनियल हगारी यांनी याविषयी माहिती दिली आहे. ‘आम्ही विशिष्ट भागात राहणाऱ्या लोकांना देखील कॉल करत आहोत, ज्याबद्दल आम्हाला रेडिओ, मीडिया, इंटरनेट आणि फ्लायर्सद्वारे संदेश पाठवले गेले आहेत’, असे त्यांनी म्हटले आहे. इस्रायली हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून, पॅलेस्टिनी इस्लामिक जिहाद सशस्त्र विंगने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या सैनिकांनी गाझा येथून दक्षिण इस्रायलच्या दिशेने रॉकेट सोडले आहे. दरम्यान, सात महिन्यांच्या युद्धानंतर युद्धविराम स्वीकारायचा की तो खंडित करायचा, हे आता इस्रायलला ठरवावे लागेल, असे हमासने स्पष्ट केले आहे. थोडक्यात ७ ऑक्टोबर २०२३ च्या पहाटे कोणतीही पूर्वसूचना न देता हमासने इस्रायलवर दहशतवादी हल्ला चढवला होता. त्यानंतर लगेच दुपारी इस्रायलने युद्धाची घोषणा केली होती. या युद्धात आतापर्यंत गाझा पट्टी पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तेथील लोकांचे जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा योग्य प्रकारे होत नसल्याने हाल होत आहेत. आता हमासने युद्ध थांबवण्याची जबाबदारी इस्रालयवर टाकली आहे.


संतोष गरुड, गोवन वार्ता