ग्रामीण मतदारांचा आदर्श घ्या

पणजी, वास्को, मडगाव अशा काही भागात कमी मतदान झाले आहे. ग्रामीण भाग असलेल्या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मतदान झाले. सत्तरी, पेडणे, काणकोण, सांगे, केपे, धारबांदोडा या परिसरात मोठ्या प्रमाणात मतदान झाल्याची नोंद आहे. याचा अर्थ शहरी भागातील मतदारांनी मतदान गांभीर्याने घेतलेले नाही.

Story: संपादकीय |
08th May, 01:23 am
ग्रामीण मतदारांचा आदर्श घ्या

मतदान करण्यासाठी होणारी जागृती फायद्याची ठरत आहे. लोकसभा निवडणुकीत झालेले मतदान अपेक्षेएवढे नसले तरीही चांगलेच म्हणावे लागेल. गोव्यात लोकसभेसाठी ७५ टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले आहे. जास्त मतदान होण्यासाठी मतदान प्रक्रियेत काही सुधारणा होण्याची गरज आहे. पोस्टल बॅलेट दिलेले असतानाही मत न देणाऱ्यांची संख्या अकराशेपेक्षा जास्त असू शकते, तर मतदानाच्या दिवशी सुट्टी काढून मतदानासाठी विदेशातून किंवा राज्याबाहेरून मुद्दाम कोणी गोव्यात येऊन मतदान करेल, अशी अपेक्षा करणेही चुकीचे ठरेल. गोव्यात असूनही अनेकांना वेगवेगळ्या कारणांमुळे मतदान करता आलेले नाही. गोव्याबाहेर इतर राज्यांमध्ये असलेले किंवा विदेशात असलेल्या गोमंतकीयांनीही मतदानाकडे पाठ फिरवली. ते नेहमीचेच आहे. तरीही यावेळी असलेला उत्साह आणि नवमतदारांची वाढत असलेली संख्या यामुळे मतदान ७५ टक्क्यांपेक्षा जास्त झाले आहे. अर्थात सुमारे २४.८० टक्के मतदारांनी मतदान केलेले नाही. सकाळपासून मतदान केंद्रांवर उत्साहाने मतदार आले. दुपारनंतर हा उत्साह मावळत गेला. संध्याकाळी अनेक मतदान केंद्रांवर प्रतिसाद कमी होता. यात दखल घेण्यासारखी एक बाब म्हणजे सांगे तालुक्यातील नेत्रावाळीच्या परिसरातील दुर्गम अशा साळजिणी गावातील लोकांनी शंभर टक्के मतदान केले. त्या प्रभागात १०९ मतदार आहेत. तिथे अनेकजण हे मजुरीवर काम करणारे. असे असतानाही शंभर टक्के मतदान करण्यासाठी सर्वांनी सहभाग घेतला. या गावाचा सर्वांनी आदर्श घ्यावा, अशीच इथल्या मतदारांनी कामगिरी केली आहे. लोकसभेच्या या मतदानात साळजिणीतील शंभर टक्के मतदान, हे मतदान प्रक्रियेला प्रोत्साहन देणारे ठरणार आहे. ग्रामीण भागातील मतदारांनी बजावलेल्या या कर्तव्यातून राज्यातील शहरी भागांतील मतदारांनी शिकण्याची गरज आहे. राज्यातील अनेक शहरी भागांतील मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवल्याचे मतदानाच्या आकडेवारीतून दिसून आले. पणजी, वास्को, मडगाव अशा काही भागात कमी मतदान झाले आहे. ग्रामीण भाग असलेल्या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मतदान झाले. सत्तरी, पेडणे, काणकोण, सांगे, केपे, धारबांदोडा या परिसरात मोठ्या प्रमाणात मतदान झाल्याची नोंद आहे. याचा अर्थ शहरी भागातील मतदारांनी मतदान गांभीर्याने घेतलेले नाही. यावेळी मतदारांना उष्णतेच्या कारणामुळे त्रास होऊ नये म्हणून प्रत्येक मतदान केंद्रावर पाणी, शीतपेयाची व्यवस्था करण्यात आली होती. निवडणूक आयोगाने राबवलेल्या चांगल्या अशा उपक्रमांचेही मतदारांनी स्वागत केले.

भाजप, काँग्रेस आणि आरजीपी हे तीन महत्त्वाचे पक्ष एकमेकांच्या विरोधात निवडणुकीत होते. उत्तर गोव्यात भाजपचे श्रीपाद नाईक, काँग्रेसचे रमाकांत खलप आणि रिव्हॉल्युशनरी गोवन्सचे मनोज परब निवडणुकीच्या रिंगणात होते. भाजपने आपली सर्व यंत्रणा कामाला लावली. पंच सदस्यांपासून ते आमदार, मंत्र्यांपर्यंत सर्वजण मतदान व्हावे यासाठी सक्रियपणे काम करत होते. काँग्रेसकडे राज्यातील अनेक मतदान केंद्रांवर एजंट नेमण्यासाठीही माणसे नव्हती. यापूर्वीही २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसची हीच स्थिती होती. काँग्रेसने बुथ स्तरावर पक्षाची बांधणी करण्याकडे लक्ष दिलेले नाही, त्याचा परिणाम या निवडणुकीत दिसून आला. आरजीपीचीही अनेक केंद्रांवर हीच स्थिती होती. आरजीपीला इंडिया गटात समाविष्ट करून उत्तर गोव्यात सर्वसंमतीने चांगला उमेदवार दिला असता तर भाजप विरोधी पक्षांना किमान एकमेकांचे कार्यकर्ते मिळाले असते. काँग्रेससाठी चांगली स्थिती असतानाही काँग्रेसने बुथ स्तरावरील प्रचारावर भर दिला नाही, त्याचा फायदा भाजपने उठवला. सत्तरी, डिचोली, पेडणे, बार्देशमधील मतदान भाजपला फायद्याचे ठरू शकते. काँग्रेसकडे कार्यकर्ते नसले आणि बुथ स्तरावर प्रचारात काँग्रेस कमी पडत असली तरीही विद्यमान खासदाराविरोधात असलेल्या रोषामुळे काही मतदारसंघांमध्ये काँग्रेसला चांगली मते मिळतील. आरजीपीलाही काही ठिकाणी फायदा होणार आहे. या निवडणुकीचा निकाल हा भाजपच्या विरोधातील सर्व पक्षांना विचार करायला लावणारा असेल. त्यांनी एकत्र रहायचे की, स्वतंत्रपणे लढायचे ते या निकालानंतर गांभीर्याने ठरवावे लागेल.

दक्षिण गोव्यात भाजपने पल्लवी धेंपो, काँग्रेसने विरियातो फर्नांडिस आणि आरजीपीने रुबर्ट परेरा यांना उमेदवारी दिली. काँग्रेससाठी तिथेही चांगले वातावरण होते. काँग्रेसकडे कार्यकर्त्यांची असलेली उणीव, संघटनेतील मतभेद याचा फटका काँग्रेस उमेदवाराला बसू शकतो. दुसरीकडे भाजपने ज्या इच्छुकांना डावलले, त्यांनी पल्लवी धेंपो यांना मतांची आघाडी देण्यासाठी काम केले. बाबू कवळेकर यांनी केपेतून भाजपला आघाडी मिळेल यासाठी प्रयत्न केले. काँग्रेसला सासष्टीतील आठ मतदारसंघांतील मतांचा फायदा होईल, असे मानले जायचे. पण सासष्टीत मतदानही कमी झाले. भाजपकडे असलेली कार्यकर्त्यांची फौज तिथे मतदान संपेपर्यंत सक्रिय होती. काँग्रेसकडे कार्यकर्तेच नसल्यामुळे दक्षिणेतही अनेक मतदान केंद्रांवर पोलिंग एजंट नव्हते. आरजीपीच्या उमेदवाराचा फटकाही काँग्रेसला बसू शकतो. असे असले तरी निवडणुकीचे नेमके चित्र ४ जूनला स्पष्ट होईल, तोपर्यंत सर्वांनाच वाट पहावी लागेल.