कासावलीत बोटाची शाई पुसल्याची तक्रार

अपवाद वगळता मुरगाव तालुक्यातील चारही मतदारसंघांत सुरळीत मतदान

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
08th May, 01:17 am
कासावलीत बोटाची शाई पुसल्याची तक्रार

पहिल्यांदाच मतदान करणारे युवक आणि युवती. (अक्षंदा राणे)

वास्को : काही अपवाद वगळता मुरगाव तालुक्यातील चारही मतदारसंघांमध्ये मतदान शांततेत पार पडले. उन्हाची झळ बसू नये म्हणून काही ठिकाणी मतदारांनी सकाळपासूनच मतदानासाठी मोठ्या रांगा लावल्याचे दिसून आले. मतदारांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी योग्य ती खबरदारी निवडणूक आयोग तसेच स्थानिक निवडणूक अधिकाऱ्यांमार्फत घेण्यात आली होती. कासावली येथील सेंट थॉमस हायस्कूलमधील बूथ क्रमांक ३६ मध्ये बोटाला लावण्यात आलेली शाई साध्या पाण्याने पुसली गेल्याची तक्रार माजी मंत्री एलिना साल्ढाणा यांनी केल्यावर तेथील शाई बदलण्यात आली. यादरम्यान सदर प्रश्न निकाली निघेपर्यंत सुमारे बारा मिनिटे मतदान थांबविण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर, वास्कोचे आमदार दाजी साळकर, दाबोळीचे आमदार तथा मंत्री मॉवीन गुदिन्हो, तर काँग्रेसचे उमेदवार कॅप्टन विरियतो फर्नांडिस यांनी सकाळी मतदान केले.
यंदा लोकसभा निवडणुकीचे वातावरण विधानसभा निवडणुकीसारखे होते. ठिकठिकाणी मंडप घालून टेबल मांडून कार्यकर्ते मतदारांना त्यांची नावे शोधण्यासाठी मदत करीत असल्याचे तसेच मतदारांना मतदानासाठी घराबाहेर काढण्यासाठी धावपळ करीत असल्याचे चित्र दिसत होते. मुरगाव मतदारसंघात भाजपचे कार्यकर्ते सगळीकडे दिसत होते. त्यामुळे या मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराला एकूण मतदानापैकी ८० टक्के मते मिळतील, असा पुनरुच्चार मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी केला.

नवे वाडे येथे सोमवारी रात्री विरोधी पक्षाने मतदारांना पैसे वाटले. पैसे वाटण्यासाठी त्यांना पोलिसांचे सहकार्य मिळाले होते. यासंबंधी माझ्याकडे त्या पोलिसांचा व्हिडिओ आहे. निवडणूक आयोगाने मतदारांना लिंबू पाणी देण्याऐवजी पैसे वाटणाऱ्यांना पकडण्याची गरज होती. दाबोळी मतदारसंघात मला मोठे मताधिक्य मिळणार.
- कॅप्टन विरियातो फर्नांडिस, काँग्रेसचे उमेदवार
विरियातो फर्नांडिस यांचा दावा फुसका आहे. त्यांचेच समर्थक पैसे वाटत असताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. उत्तर व दक्षिण गोव्यात भाजपचे दोन्ही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होणार आहेत.
- मॉवीन गुदिन्हो, पंचायत मंत्री
मुरगाव मतदारसंघात ७४.१० टक्के मतदान
मुरगाव मतदारसंघात ७४.१० टक्के मतदान झाले. त्यात ७,४१४ पुरुषांनी तर ७,६५४ महिला मतदारांनी मतदान केले. कुठ्ठाळी मतदारसंघात ७२.१६ टक्के मतदान झाले. त्यात ११,१२८ पुरुष व ११,९७८ महिला मतदारांनी मतदान केले. दाबोळीत ७२.६६ मतदान झाले. त्यात ९,४७४ पुरुष तर ९,८२४ महिलांनी मतदान केले.

हेही वाचा