विवेकवादी शिक्षक : अर्जुन परब

पेडणे तालुक्यातील विर्नोडासारख्या ग्रामीण भागात सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेले असताना, एखादी व्यक्ती आपल्या विचारांची निष्ठा आणि जीवन जगण्याची वृत्ती सुदृढ, निरोगी असेल तर कशारितीने उत्तुंग भरारी घेऊ शकते, हे अर्जुन परब सर म्हणजे मूर्तिमंत उदाहरण होते.

Story: विचारचक्र |
08th May, 01:21 am
विवेकवादी शिक्षक : अर्जुन परब

शिक्षकी पेशा जगभरातल्या नानाविविध समाज घटकांना विचारदर्शक, जगण्याचा योग्य मार्ग दाखवणारा, अंधश्रद्धा, बुवाबाजी या जहरी विळख्यातून समाजाला विमुक्त करणारा महत्त्वाचा ठरलेला आहे. आपल्या विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रमानुसार शिक्षण देत असताना, त्यांना जीवन कौशल्य विषयाची जाणीव करून देत, माणूसपण जागवण्यात शिक्षकाचे योगदान उल्लेखनीय ठरलेले आहे. पेडणे तालुक्यातील विर्नोडा येथील अर्जुन जयराम परब या व्यक्तिमत्वाने शिक्षकी पेशा पत्करून आपल्या विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रमातले शिक्षण देण्याबरोबर जीवन कसे जगावे? आपणासमोर कोणते आदर्श असावे? समाज किडत असताना, शिक्षकाची भूमिका काय असते? धार्मिकता, जातीयता, अस्पृश्यता समाजाला भेदाभेद निर्माण करून, कलहात कशारितीने गुंतवून टाकत असते आणि त्यासाठी विवेकवादाची कास धरून, समाजात बुद्धिवाद, सारासार विचार करण्याचा वारसा रुजवण्याचे कार्य शिक्षकाने प्रामाणिकपणे केले तरच समाज कार्यप्रवण, उत्साही आणि मानवतावादी मूल्यांचा स्वीकार करू शकतो, हा वारसा परब सरांनी प्रभावीपणे शिक्षक, मुख्याध्यापक, लेखक, विचारवंत, समाज कार्यकर्ता, संशोधक या नात्याने वावरताना रुजवण्याचा आटोकाट प्रयत्न केला.

मुरगाव शहरातील माता सेकंडरी हायस्कूलमध्ये शिक्षक आणि त्यानंतर मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असताना त्यांनी विद्यार्थ्यांना मराठी भाषा आणि संस्कृतीचे बाळकडू देण्याबरोबर त्यांच्यातला माणूस जागा व्हावा आणि आपल्या सभोवतालच्या समाजात वावरताना त्याने माणुसकीचे अवलंबन करून, जीवन जगावे ही शिकवण रुजवण्याचा प्रयत्न केला. शालेय अभ्यासक्रमाबरोबर विद्यार्थ्यांत सामाजिक संवेदना निर्माण व्हावी, त्यांच्यासमोर निर्माण करण्यात आलेल्या आदर्शांची खरी शिकवण काय? त्यांचे जीवन चरित्र कसे होते? त्यांनी आपल्या जीवनात कोणत्या तत्वांचा स्वीकार करून समाजमन सुसंस्कारित करण्याचा प्रयत्न केला? ते त्यांनी आपल्या वाणीने आणि लेखणीने मांडण्यासाठी सातत्याने पराकाष्टा केली, त्याला तोड नाही. मूग गिळून गप्प राहण्यात धन्यता मानणाऱ्यांपैकी ते नव्हते आणि त्यासाठी त्यांनी ज्या थोर महात्म्यांविषयी पुस्तके लिहिली, त्यात त्यांच्या वास्तववादी जीवन आणि कार्याचा आढावा घेताना, आयुष्यभर त्यांनी ज्या तत्वांचा पुरस्कार केला आणि विवेकवादाचा वारसा रुजवण्यासाठी प्रयत्न केला, त्याचा निर्भिडपणे उहापोह करण्यास ते मागेपुढे झाले नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज या युगप्रवर्तक महापुरुषांचा वारसा गोमंतकीय समाजात रुजवण्यासाठी त्यांनी जी पुस्तके लिहिली ती क्रांतदर्शी आणि विवेकवाद यांचा पुरस्कार करणारी आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य कोणत्या तत्वांवर आधारित होते? त्यांनी युद्धे छेडताना आणि शत्रूचे निर्दालन करताना कोणती भूमिका स्वीकारली होती, याचा अगदी तटस्थपणे विचार करून भावविवशतेच्या किंचितही मोहात गुरफटून घेण्याऐवजी वास्तवाचे भान समाजात निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

पेडणे तालुक्यातील विर्नोडासारख्या ग्रामीण भागात सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेले असताना, एखादी व्यक्ती आपल्या विचारांची निष्ठा आणि जीवन जगण्याची वृत्ती सुदृढ, निरोगी असेल तर कशारितीने उत्तुंग भरारी घेऊ शकते, हे परब सर म्हणजे मूर्तिमंत उदाहरण होते. भारतीय राज्य घटना आणि त्यातली सर्वधर्मसमभावाची वृत्ती त्याचप्रमाणे रंजलेल्या, गांजलेल्या समाजाला दिशा लाभावी आणि त्यांचे जगणे समृद्ध व्हावे यासाठी त्यांनी आपल्या उक्तीप्रमाणे कृतीलाही प्राधान्य दिले होते. त्यांच्या शिक्षकी पेशाविषयी आणि मराठी भाषा अध्यापन कौशल्याच्या सुखद स्मृती त्यांच्या विद्यार्थ्यांच्या अंतःकरणात आहेत. त्यामुळे गोव्याच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, आर्थिक चळवळीत सक्रिय असणारे प्राचार्य डॉ. मनोज कामत यांच्यासारखे त्यांचे विद्यार्थी आपल्या कृतिशील शिक्षकाविषयी कृतज्ञता अभिव्यक्त करण्यासाठी उत्स्फूर्तपणे आपल्या लेखणीचा आधार घेतात. आपले व्यक्तिमत्व घडविण्यासाठी जर शिक्षक उत्साही, विवेकवादी आणि समाजभान रुजवणारा असेल, तर तो एखाद्या सामान्य विद्यार्थ्याच्या जीवनात विलक्षण बदल घडवताना, त्याला तेजस्वी विचारांची शलाका कशी सुपूर्द करतो, त्याचे उदाहरण परब सरांचे अखंड जीवन आणि कार्य आहे. शिक्षक, मुख्याध्यापक म्हणून एखाद्या शालेय आस्थापनाची जबाबदारी स्वीकारताना त्यांनी धर्मनिरपेक्षता, माणुसकी, विवेकवादाचा सातत्याने पुरस्कार करत असताना त्याच्यासाठी विरोधकांचे जहरी प्रहार स्वीकारण्याची सतत मानसिकता स्वीकारली होती.

गोमंतकाच्या जडणघडणीत इथल्या मराठी भाषा आणि संस्कृतीचे कोणते योगदान होते आणि आजच्या प्रतिकूल कालखंडात मराठीचा नंदादीप प्रज्वलित ठेवण्याची काय गरज आहे? या विषयीची भूमिका त्यांनी निर्भिडपणे मांडलेली आहे. धार्मिकता, अंधश्रद्धा, बुवाबाजी यांच्या विळख्यामुळे आपला समाज कशा रितीने दुभंगत चालला आणि धार्मिक कलह, भेदाभेदाची कशी शिकार ठरलेला आहे याविषयीची भूमिका त्यांनी वेळोवेळी स्पष्ट केलेली आहे आणि त्यासाठी त्यांना टीका, अवहेलना सोसावी लागली, त्यामुळे सर कधी डगमगले नाही आणि मूग गिळून गप्प राहिले नाही. शालेय आस्थापनातून निवृत्ती पत्करल्यावर मिळणाऱ्या वेतनाद्वारे ऐषआराम करण्याऐवजी त्यांनी पायतळी अंगारे स्वीकारून समाजासमोर विवेकवादाचा तारा प्रज्वलित कसा राहील, याचा प्रयत्न आरंभला. त्यांनी मराठी भाषा आणि संस्कृतीचा सार्थ अभिमान बाळगत असताना कधी दूराभिमानाची आपणास शिकार होऊ दिले नाही. 

गोवा आणि कोणकात पोर्तुगीजपूर्व काळापासून जी दशावतारी लोकनाट्याची समृद्ध परंपरा आहे त्याचा वेध घेताना, त्यांच्यातला लोकसंस्कृतीचा संशोधक तहान-भूक विसरून आपल्या प्रबंधाशी एकरूप झाला होता, त्याचे पदोपदी दर्शन त्यांच्या दशावताराविषयीच्या पुस्तकातून घडते. वार्धक्यामुळे किंचितही थकून न जाता आपल्या जीवनावरच्या श्रद्धेला आणि आत्मसन्मानाला जपणारी खूप कमी व्यक्तिमत्वे समाजात पहायला मिळतात. त्यात अर्जुन जयराम परब हे गोवा मुक्तीनंतर सुरू झालेल्या पुरोगामी चळवळीतील बुलंद आवाज होता. आपल्या वाणी, लेखणी आणि कृतीद्वारे सातत्याने वैचारिक आणि बौद्धिक निष्ठेवर अपरिमित श्रद्धा ठेवून मानवी मूल्यांची पखरण विमुक्तपणे करण्याचा प्रयत्न केला होता. भाषा, धर्म, संस्कृती यांचा वास्तववादी आणि सार्थ अभिमान बाळगत असताना, त्यांनी आपल्यातला माणूस कायम सजीव ठेवला आणि त्यामुळे आजही त्यांची भूमिका समजून घेण्यासाठी त्यांनी निर्माण केलेल्या पुस्तकांचे वाचन, मनन आणि चिंतन होणे अत्यंत गरजेचे आहे आणि ती खऱ्या रितीने या व्यक्तिमत्वाला श्रद्धांजली ठरेल.


प्रा. राजेंद्र केरकर

(लेखक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते 

असून पर्यावरणप्रेमी आहेत.)

मो. ९४२१२४८५४५