फोंडा, धारबांदोड्यात शांततेत मतदान

शिरोडा ७५.९०, फोंडा ७५.६४ , मडकई ७५.७३, प्रियोळ ७५.५०, सावर्डेत ७५.२९ टक्के मतदान

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
08th May, 01:19 am
फोंडा, धारबांदोड्यात शांततेत मतदानपालवाडा-उसगाव येथील केंद्रावर मतदानासाठी लागलेली रांग.


फोंडा : लोकसभा निवडणुकीत फोंडा आणि धारबांदोडा तालुक्यात सर्व ठिकाणी मतदान शांततेत पार पाडले. शिरोडा ७५.९० टक्के, फोंडा ७५.६४ टक्के, मडकई ७५.७३ टक्के, प्रियोळ ७५.५० टक्के व सावर्डे मतदारसंघात ७५.२९ टक्के अशी मतदानाची नोंद झाली आहे. शिरोडा येथे ईव्हीएम मशीन बंद पडल्याने सुमारे अर्धा तासानंतर मतदानाला सुरुवात झाली, तर फोंडा येथील काँग्रेस नेत्याने भाजपला पाठिंबा दिल्याचा संदेश वायरल केल्याप्रकरणी प्रीतम हरमलकर याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
फोंडा व धारबांदोडा तालुक्यात मंगळवारी सकाळपासून मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागलेल्या दिसून आल्या. अनेक मतदान केंद्रांवर सुरळीत मतदान झाले, तर पाडलवाडा - बेतोडा येथील मतदान केंद्रावर सकाळपासून गर्दी झाली होती. सर्व ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
वाजे - शिरोडा येथील २३ क्रमांकाच्या मतदान केंद्रावर सकाळी ईव्हीएम मशीन सुरू झाले नसल्याने मतदारांवर सुमारे अर्धा तास रांगेत उभे राहण्याची वेळ आली. अधिकाऱ्यांनी ईव्हीएम मशीनची दुरुस्ती केल्यानंतर सकाळी ७.३० वाजता मतदानाला सुरुवात झाली. त्यामुळे सकाळी अर्धा तास मतदान सुरू कारण्यात उशीर झाला. त्यानंतर मतदान केंद्रावर मतदान सुरळीत पार पडले.

खोटा संदेश वायरल केल्याप्रकरणी तक्रार दाखल
फोंडा येथील काँग्रेस नेते म्हणून कार्यरत असलेले युवा उद्योजक राजेश वेरेकर यांनी भाजपला पाठिंबा दिल्याचा खोटा संदेश वायरल केल्याप्रकरणी प्रीतम हरमलकर याच्याविरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी फोंडा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. फोंडा पोलीस या प्रकरणी चौकशी करीत असून गुन्हा नोंद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मगो व भाजप युतीचा लाभ भाजपच्या उमेदवार पल्लवी धेंपो यांना होणार आहे. मडकई मतदारसंघातून अधिक प्रमाणात मते देण्याचा प्रयत्न केला आहे.
- सुदिन ढवळीकर, वीज मंत्री

भाजप उमेदवार पल्लवी धेंपो यांचा विजय निश्चित आहे. फोंडा मतदारसंघातून भाजपला मोठी आघाडी मिळणार आहे.
- रवी नाईक, कृषीमंत्री          

हेही वाचा