मालवाहू ट्रकला इकोची मागून जोरदार धडक

इको गाडीचा चक्काचूर : गाडी चालक, दोन महिला, लहान मुले जखमी

Story: वार्ताहर। गोवन वार्ता |
18th April, 12:33 am
मालवाहू ट्रकला इकोची मागून जोरदार धडक

कोरगाव : पत्रादेवी तपासणी नाक्यावर बुधवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात एक ठार तर, अन्य सहाजण जखमी झाले.

बुधवारी रात्री ८.१५ वा. गोवा राज्यातून महाराष्ट्रात जाणारी इको मारुती (एम. एच.१२ व्ही. झेड. ६६०८) गाडीने गेटवर बॅरिकेड्सला धडक दिल्यावर तपासणीसाठी असलेल्या मालवाहू ट्रकला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात इको मारुती चालक तसेच त्याच्या बाजूला बसलेला सहप्रवासी हे गाडीच्या दर्शनी भागात अडकून पडले. इको गाडीचा चक्काचूर झाला. अपघातातील सहप्रवाशाला बांदा येथील इस्पितळात उपचारासाठी नेत असताना त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली.

गाडीचा चालक व अन्य दोन महिला तसेच गाडीत असलेली दोन लहान मुलेही जखमी झाली. त्यांना स्थानिक नागरिक तसेच तोरसेचे माजी सरपंच बबन डिसोझा व अन्य पोलीस कर्मचारी यांनी तातडीने गाडीतून बाहेर काढून रुग्णवाहिकेने इस्पितळात उपचारासाठी पाठविले.

इको गाडीचा चालक व पुढे बसलेला सहप्रवाशी हे गाडीत अडकून पडले. पेडणे अग्निशामक दलाच्या जवानाने कट्टरद्वारे गाडीचा पत्रा कापून त्यांना बाहेर काढले.

हा अपघात झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात तपासणी नाक्यावर लोकांची गर्दी झाली. मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडीही झाली. बांदा येथील ग्रामस्थ व पत्रादेवी येथील लोक मदतीसाठी धावून आले. मारुती इकोचा दर्शनी भाग मालवाहू ट्रकला मागून धडक दिल्याने चक्काचूर झाला होता.

तपासणीसाठी असलेल्या ट्रकला धडक

मालवाहू ट्रक (जी. जे १२ व्हाय. ९७८६) महाराष्ट्रात जाण्यासाठी तपासणी नाक्यावर थांबला होता. यावेळी गोव्यावरुन महाराष्ट्रकडे जात असलेल्या मारुती इको गाडीने या ट्रकला मागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. अपघाताची माहिती मोपा पोलिसांना मिळताच मोपा पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला.