गोव्यात सोमवारी २,३१२ जणांनी केले पोस्टल बॅलेट मतदान

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
30th April, 03:22 pm
गोव्यात सोमवारी २,३१२ जणांनी केले पोस्टल बॅलेट मतदान

पणजी : गोव्यातील दोन्ही मतदरसंघांत सोमवारी एकूण २,३१२ जणांनी पोस्टल बॅलेट पद्धतीने मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये उत्तर गोव्यात १,०४१ तर दक्षिण गोव्यातील १२७१ मतदारांचा समावेश आहे. निवडणूक आयोगाने ८५ वर्षांवरील मतदार, दिव्यांग मतदार तसेच अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या मतदारांसाठी पोस्टल बॅलेट मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

गोव्यात सोमवारी झालेल्या एकूण २,३१२ मतदारांनी पोस्टल मतदानामध्ये ८५ वर्षांवरील १,५४८ तर ७६४ दिव्यांग मतदारांचा समावेश आहे. मतदारसंघनिहाय पाहता उत्तर गोव्यात ८५ वर्षांवरील ७४१ मतदारांनी तर दक्षिण गोव्यात ८०७ मतदारांनी मतदान केले. निवडणूक आयोगाचे कर्मचाऱ्यांनी या मतदारांच्या घरी जाऊन त्यांचे मत घेतले. याशिवाय उत्तर गोव्यातील ३०० व दक्षिणेतील ४६४ दिव्यांग मतदारांनी पोस्टल बॅलेट पद्धतीने मतदान केले.

निवडणूक आयोगाने दिव्यांग, ८५ वर्षांवरील, अत्यावश्यक सेवा देणारे कर्मचारी तसेच निवडणूक ड्युटीवर असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी २९ एप्रिल ते ३ मे दरम्यान पोस्टल बॅलेट मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यानुसार उत्तर आणि दक्षिण गोव्यात विशेष केंद्र उभारण्यात आली आहेत. तर ८५ वर्षांवरील मतदारांच्या घरी जाऊन मत घेण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. येत्या चार दिवसांत पोस्टल बॅलेट मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे.