‘या’ कारणासाठीच देशात पुन्हा एनडीएचे सरकार हवे!.. काय म्हणाले मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत? वाचा...

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
30th April, 03:43 pm
‘या’ कारणासाठीच देशात पुन्हा एनडीएचे सरकार हवे!.. काय म्हणाले मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत? वाचा...

पणजी : ‘वन नेशन वन इलेक्शन’, महिला राजकीय आरक्षण, सीएए असे देशपातळीवरील महत्त्वाचे निर्णय पुढे​ नेण्यासाठी देशात पुन्हा एनडीएचे सरकार हवे. त्यासाठीच गोमंतकीय जनतेने लोकसभा निवडणुकीत गोव्यातील भाजपच्या दोन्ही उमेदवारांना निवडून द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

एनडीएतील घटक पक्ष आणि अपक्षांनी मंगळवारी पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत भाजप प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, माजी खासदार विनय तेंडुलकर, मंत्री सुदिन ढवळीकर, रवी नाईक, मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर, अपक्ष आमदार आलेक्स रेजिनाल्ड, आंतोन वाझ, डॉ. चंद्रकांत शेट्ये व आमदार जीत आरोलकर उपस्थित होते.


केंद्रात सत्तेवर आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारने गोव्याच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी दिला. काँग्रेसने ५० वर्षांच्या कार्यकाळात गोव्याच्या विकासासाठी जितका निधी दिलेला नव्हता, त्यापेक्षा अधिक निधी एनडीए सरकारने दिलेला आहे. यापुढील काळातही गोव्याच्या विकासाचा रथ कायम सुरू ठेवण्यासाठी केंद्रात पुन्हा एनडीए सरकार येण्याची गरज आहे. त्यामुळे गोव्यातील जनतेने लोकसभा निवडणुकीत भाजपच्या दोन्ही उमेदवारांना विजयी करून मोदींचे हात बळकट करण्याची गरज आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले.

एनडीए आघाडीमध्ये सहभागी असलेल्या राज्यातील मगो पक्ष तसेच अपक्ष आमदारांची मंगळवारी बैठक झाली. या बैठकीत दोन्ही मतदारसंघांतील उमेदवारांच्या पुढील काळातील प्रचारावर चर्चा करण्यात आली. यावेळी दोन्ही​ मतदारसंघांत एनडीएचे उमेदवार श्रीपाद नाईक आणि पल्लवी धेंपो यांना निवडून आणण्याचा निर्धार मगो पक्ष आणि अपक्ष उमेदवारांनी केलेला आहे. त्यात निश्चित यश मिळेल, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले.

मंत्री तथा मगोचे ज्येष्ठ नेते सुदिन ढवळीकर म्हणाले, काँग्रेस पक्ष विविध प्रश्नांवरून गोमंतकीय जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहे. म्हादई, रेल्वे मार्ग दुपदरीकरण, कोळसा यांसारखे अनेक प्रश्न राज्यात काँग्रेसच्याच काळात सुरू झालेले होते. आता काँग्रेसने त्याच प्रश्नांचा समावेश आपल्या जाहीरनाम्यात केला आहे. परंतु, गोमंतकीय जनतेला खरी परिस्थिती माहीत आहे. त्यामुळे गोमंतकीय मतदार एनडीएच्या उमेदवारांनाच निवडून देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

विरोधकांचे आरोप बिनबुडाचे!

उघड्यावरील शौचमुक्त (ओडीएफ) तसेच वीज, नळ जोडण्या शंभर टक्के करण्यात यशस्वी ठरलेले गोवा देशातील पहिले राज्य असल्याचा सरकारचा दावा खोटा असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. विरोधकांच्या या आरोपांत तथ्य आहे का असे मुख्यमंत्र्यांना विचारले असता, राज्यातील सर्व पंचायतींनी ओडीएफसह नळ, वीज जोडण्या शंभर टक्के असल्याचे प्रमाणपत्र सरकारला दिल्यानंतरच तशा घोषणा करण्यात आल्या आहेत. विरोधक यावरून बिनबुडाचे आरोप करीत आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.