कला अकादमीचे काम वेळेत पूर्ण न झाल्यास... काय म्हणाले मंत्री गावडे, वाचा सविस्तर

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
30th April, 04:38 pm
कला अकादमीचे काम वेळेत पूर्ण न झाल्यास... काय म्हणाले मंत्री गावडे, वाचा सविस्तर

पणजी : कला अकादमीच्या नूतनीकरणाचे काम वेळेत पूर्ण न झाल्यास कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकायचे की नाही, याचा निर्णय पीडब्ल्यूडीचे मुख्य अभियंते घेतील. आम्हाला दर्जेदार काम हवे आहे. ते करून घेण्याचे आमचे प्रयत्न आहेत, अशी माहिती कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी दिली.

मंत्री गावडे यांनी आज पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांसोबत कला अकादमीच्या नूतनीकरणाच्या कामाचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांना त्याची माहिती दिली. अभियंत्यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे काम चालू आहे. आणि येत्या ८ ते १० दिवसांमध्ये काम पूर्ण होईल, असे आम्हाला कळवण्यात आले आहे, असे मंत्री गावडे यांनी पत्रकारांना सांगितले.

सध्या कला अकादमीचा पूर्ण ताबा कला आणि सांस्कृतिक खात्याकडे पीडब्ल्यूडीने दिलेला नाही. केवळ ९५ टक्के अकादमीचा वापर करता येईल, असे पत्र पीडब्ल्यूडीने आम्हाला दिले आहे. त्यानुसार सभागृहासाठी अकादमीत नोंदणी सुरू आहे. पण, सगळे काम पूर्ण झाल्यानंतरच अकादमीचा ताबा आम्हाला द्यावा, असे पत्र आम्ही पीडब्ल्यूडीला पाठवले आहे, असे मंत्री गावडे यावेळी म्हणाले.

पावसाच्या पाण्याचा निचरा व्हावा, यासाठी छतावर वाहिन्या बसवण्यात आल्या आहेत. त्यावर पाने पडली. हा पालापाचोळा वाहिन्यांमध्ये अडकल्याने मुसळधार पावसावेळी पाणी छतावरच तुंबून राहिले. परिणामी ते झिरपून खाली पडले. याच कारणाने अकादमीच्या छताचा काही भाग कोसळला. आता पुढच्या पावसात असा प्रकार होऊ नये, यासाठी छताला वॉटरप्रूफ केले आहे, असेही गावडे यांनी म्हटले आहे.

कला अकादमीतील ध्वनियंत्रणा चांगली नसल्याचा आरोप नाटककार आणि तियात्रिस्टांनी केला आहे. त्याची नोंद आम्ही घेतली आहे. ही नवीन यंत्रणा अतिशय अत्याधुनिक आहे. त्याचे प्रशिक्षण येथील कर्मचाऱ्यांना दिले जाईल. तसेच काही यंत्रणा विदेशांतून आणली जाणार आहे. पण सध्या आचार‌संहिता लागू असल्याने ते काम रखडले आहे. हे काम येत्या २ ते ३ महिन्यांत पूर्ण होईल, असेही मंत्री गावडे यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा