माडेल थिवी येथे देय रकमेसाठी बांधकाम अभियंत्याचे अपहरण

कोलवाळ पोलिसांनी सावंतवाडीत आवळल्या तीन संशयितांच्या मुसक्या; अपहरणासाठी वापरलेली ब्रेझा कार जप्त

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
30th April, 04:31 pm
माडेल थिवी येथे देय रकमेसाठी बांधकाम अभियंत्याचे अपहरण

म्हापसा : माडेल-थिवी येथे देय रक्कमेसाठी एका बांधकाम अभियंत्याचे अपहरण करून त्याची लुबाडणूक करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कोलवाळ पोलिसांनी तिन्ही संशयितांना सावंतवाडी (महाराष्ट्र) येथून अटक केली असून अपहरणासाठी वापरलेली ब्रेझा कार जप्त केली आहे.

बलवीर सिंग शिशपाल गुर्जर (३३, रा. थिवी व  मूळ राजस्थान), राजकुमार गिरीधरलाला चौधरी (33, रा. थिवी व मूळ राजस्थान) आणि विरेंदर सुरजीतलाल कुमार (59, रा. थिवी व मूळ दिल्ली) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

अपहरणाचा हा प्रकार रविवार, २८ रोजी संध्याकाळी ४.३० ते रात्री ९.३० दरम्यान घडला. या प्रकरणी फिर्यादी हितेश बाबूलालजी जंगीड (रा. माडेल थिवी व मूळ राजस्थान) यांनी सोमवार, २९ रोजी सकाळी कोलवाल पोलिसांत तक्रार दिली. संशयित आरोपी बलवीर सिंग व राजकुमार यांचा टाईल्स फिटींगचा व्यवसाय असून सुरजीतकुमार हा त्यांच्याकडे कामाला होता. फिर्यादी हितेश जंगीड हे बांधकाम अभियंते असून ते राजस्थानमधीलच असल्याने त्यांची व्यवसायादरम्यान ओळख झाली. फिर्यादी व्यावसायातील काही रक्कम संशयितांना द्यायचे होते.

ही रक्कम वसूल करण्याच्या हेतूने संशयितांनी फिर्यादींनी आपल्या ब्रेझा कारमध्ये बसवले व त्यांना मारहाण करीत त्यांच्याकडे पैसे मागितले. नंतर एका निर्जनस्थळी असलेल्या खोलीमध्ये नेऊन तिथेही मारहाण केली. फिर्यादी हितेश याच्याकडे पैसे नसल्याचे पाहून त्यांच्या हातातील अंगठी, खिशातील ५ हजार रुपये व मोबाईल फोन घेऊन रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास फिर्यादींच्या दुचाकीकडे त्यांना आणून संशयितांनी सोडले.

ही तक्रार दाखल होताच कोलवाळ पोलिसांनी संशयितांची शोधाशोध केली. संशयित सावंतवाडी येथे असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी तिथे जाऊन तिन्ही संशयितांना कारसमवेत ताब्यात घेतले व पोलीस स्थानकात आणून रितसर अटक केली.

संशयितांविरुद्ध भा.दं.सं.च्या ३९२, ३६५, ५०६(२) व १२० ब कलमांतर्गत अपहरण व लुबाडणुकीचा गुन्हा नोंद केला आहे. पोलीस अधीक्षक अक्षत कौशल, उपअधीक्षक संदेश चोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक विजय राणे यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक सुभाष गावकर, कॉन्सटेबल प्रवीण पाटील व निखिल नाईक या पथकाने ही कामगिरी केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.