पवित्र कर्तव्य

जबाबदारीने मतदान करा आणि मतदान हे पवित्र कर्तव्य आहे, असे कार्डिनल फिलिप नेरी फेर्राव म्हणतात त्याचे स्वागत व्हायला हवे. लोकशाहीच्या उत्सवात मतदानाचे पवित्र कर्तव्य बजावण्यासाठी सर्वांनीच पुढाकार घ्यायला हवा.

Story: संपादकीय |
17th April, 10:42 pm
पवित्र कर्तव्य

लोकसभा निवडणुकीसाठी गोव्यात ७ मे रोजी मतदान होणार आहे. राजकीय पक्षांचा प्रचार जोरात सुरू आहे. भाजप आणि काँग्रेस हे दोन राष्ट्रीय पक्ष मुख्य प्रतिस्पर्धी म्हणून पाहिले जात असले तरी रिव्हॉल्युशनरी गोवन्स या प्रादेशिक पक्षानेही निवडणुकीत उडी घेतल्यामुळे उत्तर आणि दक्षिण गोव्यातील निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. असे असले तरी सध्याच्या घडीला एखाद्या उमेदवाराला चांगले वातावरण आहे असे कोणी स्पष्टपणे सांगू शकत नाही, अशी गोव्यातील स्थिती आहे. भाजप विरोधात इंडिया गट तसेच आरजीपी ही तिसरी प्रादेशिक शक्तीही निवडणुकीत आपले भविष्य आजमावत आहे. भाजपकडे मोठी संघटनशक्ती आहे. काँग्रेसचे कॅडर पक्ष सोडून गेलेल्यांनी जवळजवळ उद्ध्वस्त केले आहे. आरजीपी आपली बांधणी करत आहे. पण या निवडणुकीत आतापर्यंत मतदारांनी कमालीची गोपनीयता बाळगली आहे. एका बाजूने समाजाचे राजकारण सुरू झाले. दुसऱ्या बाजूने एकमेकांवर आरोप - प्रत्यारोपही सुरू आहेत. उमेदवारांवर वैयक्तिक आरोप करण्यातही राजकीय नेते मागे नाहीत. अशा वेळी गोवा आणि दमण दीवचे कार्डिनल फिलिप नेरी फेर्राव यांनी ख्रिस्ती मतदारांना धर्मनिरपेक्ष, संविधानाची मूल्ये जपणाऱ्यांना मतदान करण्याचे आवाहन केले. त्यांच्या या आवाहनानंतर राजकीय क्षेत्रात उलट सुलट चर्चा सुरू झाली. निवडणुकीला सुमारे वीस दिवस असताना त्यांचे निवेदन समोर आले. त्यांनी निवडणुकीपूर्वी चर्चमध्ये ३ किंवा ५ मे रोजी विशेष प्रार्थनासभा घ्या, असेही सुचवले आहे. त्यांच्या या विधानापूर्वीच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे विधान आले. संविधानावर घाला घालण्याचे प्रयत्न असल्याचे आरोप जरी काँग्रेस आणि इतर विरोधकांकडून होत असले तरी, ते आरोप निरर्थक असल्याचे तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान चंद्र सूर्य असेपर्यंत कायम राहील, असे स्पष्टीकरण दिले. काँग्रेसने त्यापूर्वीच संविधानाच्या अनुषंगाने भाजवर आरोप केले होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांचे विधान येणे आणि चर्चने निवेदन जारी करणे, हा योगायोग असला तरी भाजपला अडचणीत आणण्याचे प्रयत्न सर्व बाजूंनी होत असल्याचे दिसत आहे. भाजपने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी राजकीय पक्षांची अपेक्षा असते आणि त्याच अपेक्षेला मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले आहे. त्यांच्या या भूमिकेनंतर संविधानाविषयी असलेले काहींचे गैरसमज किती दूर होतात, ते पहावे लागेल.

कार्डिनल फिलिप नेरी फेर्राव यांनी आपल्या निवेदनात मतदारांना जागृत करण्याचे काम निश्चितच केले आहे, पण संविधानविषयक भाष्य केल्यामुळे त्यांनी काँग्रेसच्याच आरोपांचा सूर आळवला की काय, अशी चलबिचल भाजपमध्ये निर्माण झाली तर आश्चर्य वाटायला नको. फेर्राव यांनी ख्रिस्ती धर्मियांना त्यांनी जबाबदार नागरिक होण्याचा सद्गुण दाखवावा, असे म्हणत मतदानाच्या काळात गोव्याबाहेर देवदर्शनासाठी जाऊ नका, त्यापूर्वी किंवा त्यानंतर जा. देवदर्शनासाठी तिकिटे काढलेली असतील, तर ती रद्द केल्यास थोडा भुर्दंड पडेल. पण लोकशाहीत मतदान करण्याचे कर्तव्य बजावणे फार महत्त्वाचे आहे, असे त्यांनी सुचवले आहे. त्यांच्या या मताची फार गरज आहे. मतदानाचे कर्तव्य पार पाडण्यासाठी खरे म्हणजे अशा प्रकारची भूमिका सर्वच धर्मातील धर्मगुरूंनी घ्यायला हवी. एखाद्या राजकीय शक्तींवर टीका करण्यापेक्षा मतदार म्हणून आपली भूमिका प्रत्येकाने तटस्थपणे बजावणे कसे गरजेचे आहे, ते लोकांना समजावून सांगण्याची गरज आहे. राजकीय पक्षांविषयी तुमच्या भूमिका काहीही असोत, मतदानाविषयी जागृती करणे आणि मतदानासाठी घराबाहेर पडणे, जबाबदारीपूर्वक मतदान करणे यासाठी मतदारांना जागृत करण्याची गरज आहे. दरवेळी वीस ते तीस टक्के किंबहुना काहीवेळा त्यापेक्षा जास्त लोक मतदान करत नाहीत. मतदान करायचे नाही पण राजकीय पक्षांविरोधात कायम तक्रारी करायच्या, असे प्रकार सुरू असतात. सर्वांनी मतदान केले तर कदाचित देशाचे, राज्याचे चित्रही वेगळे असू शकते. दरवेळी मतदानाकडे पाठ फिरवणाऱ्यांमुळेच काही ठिकाणी चुकीचे लोकही कदाचित निवडून येत असावेत. त्यामुळेच सर्वांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी धर्मगुरूंनीही लोकांना आवाहन करायला हवे. फक्त अशा वेळी आपली विशिष्ट पक्षांविषयी असलेली ओढ किंवा विरोध मात्र दूर ठेवावा. जबाबदारीने मतदान करा आणि मतदान हे पवित्र कर्तव्य आहे, असे कार्डिनल फिलिप नेरी फेर्राव म्हणतात त्याचे स्वागत व्हायला हवे. लोकशाहीच्या उत्सवात मतदानाचे पवित्र कर्तव्य बजावण्यासाठी सर्वांनीच पुढाकार घ्यायला हवा.