'आयपीएल'चे नवे रूप तारक की मारक?

'आयपीएल'च्या यंदाच्या स्पर्धेतील नऊ फेऱ्या संपल्या आहेत आणि अजून महिनाभर निदान ही स्पर्धा खेळली जाईल. विश्वचषक स्पर्धेसाठी संघ निवडताना अनेक जुन्या आणि नव्या खेळाडूंच्या कामगिरीवर निवडकर्त्यांचे लक्ष असेल, हे मान्य असले तरी केवळ याच कामगिरीवर कोणत्याही खेळाडूंची निवड होऊ शकेल काय, या प्रश्नाचे उत्तरही नकारार्थीच असेल.

Story: विचारचक्र | |
30th April, 12:37 am
'आयपीएल'चे नवे रूप तारक की मारक?

लोकसभेच्या निवडणुकांमुळे देशात आज सर्वत्र प्रचाराची तप्त हवा निर्माण झाली असताना आयपीएल क्रिकेट स्पर्धेची दंगलही सगळीकडे पहायला मिळते. एका बाजूने भाजपचा 'अबकी बार चारसौ पार'चा नारा सातत्याने कानावर आदळत असताना 'आयपीएल'मध्ये खेळणाऱ्या सर्वच संघानीही प्रत्येक सामन्यात 'अबकी बार दोनशे पार'चेच लक्ष्य डोळ्यांसमोर ठेवून किमान दोनशे धावा फळ्यावर लागल्याच पाहिजेत असाच पवित्रा घेतलेला दिसतो. धावांचे टार्गेट सेट करताना किमान दोनशे धावा केल्याविना विजय अशक्य असल्याचे प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाना वाटू लागले आहे तर धावांचा पाठलाग करणाऱ्या संघांनाही आजकाल दोनशेच्या पुढे असलेले टार्गेटही अशक्य वाटेनासे झाले आहे हेच तर आयपीएलच्या या अध्यायात हे सामने पाहताना आपण अनुभवत आहोत. सोळावे वरीस धोक्याचे असे म्हटले जाते. 'आयपीएल'च्या बाबतीतही तेच म्हणता येईल. यंदा सोळाव्या वर्षांत पदार्पण करणारी 'आयपीएल' स्पर्धाही वयात आली आहे असे यंदा या स्पर्धेत जे काही पहायला मिळत आहे त्यावरून म्हणता येईल. 'आयपीएल'च्या सुरुवातीच्या काळात एकशे साठ ते एकशे सत्तर ही धावसंख्या हमखास विजय मिळवून देण्यास पुरेशी होती. प्रतिस्पर्धी संघ या धावसंख्येपर्यंत पोचताना अक्षरशः धापा टाकायचे. मागील काही वर्षांत हे टार्गेट १८० ते १८५ पर्यंत पोचले आणि चालू अध्यायात तर 'दोनशे पार'शिवाय कोणी बोलायलाच तयार नाही असेच चित्र आतापर्यंत दिसत आहे. 'अब की बार चारसो पार' नाऱ्याचा असर तर 'आयपीएल'वर पडला नसावा ना असेही गमतीने म्हटले जात असले  तरी या स्पर्धेचे एकूणच स्वरूप कसे बदलत चालले आहे हे आतापर्यंतच्या सामन्यांवरून स्पष्ट दिसून येते.

'आयपीएल'ने एकूण क्रिकेटचे स्वरूपच बदलून टाकले आहे, हे वास्तव कोणी नाकारण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही. दोनशे साठ, दोनशे पन्नास, दोनशे चाळीस अशा धावसंख्याही आता 'सेफ' राहिल्या नाहीत, याला काय म्हणावे? गुणतक्त्यात जवळपास तळाच्या तीन संघांमध्ये फेकल्या गेलेल्या पंजाब किंग्जने कोलकोता नाईट रायडर्सच्या २६१ धावांचा पाठलाग तब्बल आठ चेंडू राखून करताना जो जागतिक विक्रम साध्य केला त्याला तर तोडच नाही. एखाद्या दुसऱ्या सामन्यात अपवादाने असे चमत्कार क्रिकेटमध्ये घडू शकतात हे मान्य असले तरी यंदाची 'आयपीएल' त्यास अपवाद ठरली आहे आणि बहुतेक सामन्यात यावेळी प्रेक्षकांना दोनशेच्या वरतीच धावांचे आव्हान देताना वा स्वीकारतानाचे चित्र प्रामुख्याने दिसले. अवघेच काही सामने यास अपवाद ठरले. फलंदाजांना गोलंदाजांवर निर्घृण म्हणता येईल असा हल्ला चढवतानाचे चित्र आतापर्यंत अधूनमधून पहायला मिळायचे पण यावेळी आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकणाऱ्या गोलंदाजांसह कोणाचीही फलंदाजांच्या टोलेबाजीतून सुटका झाली नाही ते पहाता नवख्या गोलंदाजांचा या प्रांतात करियर करायचा असलेला निग्रह कितपत टिकून राहील, याची शंकाच आहे. आतापर्यंत साधारण दहा चौकारांमागे एखाद दुसरा षटकार असे समीकरण मांडले जायचे, पण यंदा हे समीकरणही कोलमडून पडले आणि चौकारांच्या तुलनेत षटकार अधिक अशा खेळी अनेक फलंदाजांनी यावेळी साकारल्या. क्रिकेटचे बॅजबॉल खेळामध्ये रूपांतर होऊ लागल्याचे सॅम करन याच्यासारखा क्रिकेटपटू म्हणू लागला तर बदलत गेलेल्या झटपट क्रिकेटचे नवे रूप डोळ्यांसमोर यावे.

'इम्पॅक्ट' खेळाडूच्या नव्या नियमामुळेच हा बदल घडून आल्याचे अनेकांना वाटते आणि ते चुकीचेही नाही. क्रिकेट अधिकच रंगतदार व्हावे या हेतूनेच 'इम्पॅक्ट' खेळाडूचा नवा नियम यंदा लागू करण्यात आला. सहा फलंदाज आणि सहा गोलंदाजांसह खेळण्याची लॉटरी सगळ्याच संघांना लागली, पण या नियमाचा दूरगामी परिणाम झटपट क्रिकेटवर कसा होईल याचा विचार मात्र कोणी केलेला दिसत नाही. टी-२०ची विश्वचषक स्पर्धा आता काही महिन्यांवर येऊन ठेपली असताना हा प्रयोग करणे कितपत उचित होते, हे प्रत्यक्ष स्पर्धेच्या दरम्यानच कळून येणार असले तरी संघातील अष्टपैलू खेळाडूंच्या जीवावर हा नियम बेतला जाऊ शकतो, असा निष्कर्ष काढला जातो. 'इम्पॅक्ट' खेळाडूच्या नियमामुळे एक फलंदाज आणि एक गोलंदाज जादा मिळत असेल तर अष्टपैलू खेळाडूवर का भर द्यावा, असे कोणाही कर्णधाराला वाटणे साहजिकच आहे. आता विश्वचषक स्पर्धेसाठी अष्टपैलू खेळाडूची निवड कोणत्या निकषावर निवड समिती करेल, हा खरा प्रश्न आहे आणि त्याचे उत्तर आज तरी मिळत नाही. उदाहरणच द्यायचे झाल्यास शिवम दुबेचे देता येईल आणि आतापर्यंतच्या सामन्यांत चेन्नई कर्णधाराने त्याला गोलंदाज म्हणून क्वचितच संधी दिली. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत इम्पॅक्ट खेळाडूचा नियम असण्याची कोणतीही संधी आजच्या घडीला दिसत नाही अशावेळी हा नियम आज या संघांसाठी तारक ठरला असला तरी विश्वचषक स्पर्धेत खेळताना तो मारक अधिक ठरू शकतो, यात मात्र संदेह नाही.

'आयपीएल'च्या यंदाच्या स्पर्धेतील नऊ फेऱ्या संपल्या आहेत आणि अजून महिनाभर निदान ही स्पर्धा खेळली जाईल. विश्वचषक स्पर्धेसाठी संघ निवडताना अनेक जुन्या आणि नव्या खेळाडूंच्या कामगिरीवर निवडकर्त्यांचे लक्ष असेल, हे मान्य असले तरी केवळ याच कामगिरीवर कोणत्याही खेळाडूंची निवड होऊ शकेल काय, या प्रश्नाचे उत्तरही नकारार्थीच असेल. अभिषेक शर्मा, शशांक, साई सुदर्शन, आशुतोष शर्मा अशा तीन चार खेळाडूंनी निवडकर्त्यांचे आपल्याकडे लक्ष वेधून घेतले आहे. अभिषेक आणि शशांकची तुफान फटकेबाजी कदाचित सार्थकीही लागेल. आपल्याकडे गुणवत्ता कमी नाही, हे अनेकांनी दाखवून दिले. पस्तीस चाळीस चेंडूत शतक ठोकताना गोलंदाजांचा पुरता सफाया करणारे फलंदाज यावेळी आम्ही सगळ्यांनीच पाहिले. मागील स्पर्धेत एकूण बारा शतकांची नोंद झाली होती तर यंदा ही संख्या वीसच्या वरती जाऊ शकते. आतापर्यंत नऊ दहा शतकांची नोंद झालेली आहे. षटकारांच्या बाबतीतही तेच आहे. मागच्या अध्यायात जेथे १,१२४ षटकारांची नोंद झाली होती, तेथे आताच हजाराच्या जवळपास आकडा पोचला आहे. एखाद्या सामन्यात तब्बल बेचाळीस षटकार पाहण्याची चैनही आम्ही यावेळी केली आहे. आयपीएलमध्ये आतापर्यंत केवळ दोनवेळाच २५० प्लस धावसंख्या रचली गेली होती, पण चालू हंगामात एकूण आठ वेळा २५० प्लस धावांची नोंद व्हावी याचे मूळ अर्थातच 'इम्पॅक्ट'मध्येच आहे आणि 'दोनशे पार'चा नारा त्यामुळेच प्रत्येक कर्णधार देताना दिसतो. पाच पाचवेळा या स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावणाऱ्या चेन्नई आणि मुंबई या संघांसमोर राजस्थान, केकेआर यांनी जबरदस्त आव्हान निर्माण केले असून यंदा राजस्थानकडून चमत्कार होण्याची शक्यता अनेकांना वाटते. बदलत्या आयपीएल क्रिकेटमधील चुरस अजून तशी संपलेली नाही, हेही तेवढेच खरे आहे.

वामन प्रभू
(लेखक ज्येष्ठ पत्रकार असून, राजकीय तसेच क्रीडा विश्लेषक आहेत)           
मो. ९८२३१९६३५९