मुलांना सरकारी शाळेत शिकवा - मुख्यमंत्र्यांचे पालकांना आवाहन

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
16th May, 02:40 pm
मुलांना सरकारी शाळेत शिकवा - मुख्यमंत्र्यांचे पालकांना आवाहन

पणजी :  यंदा दहावीचा निकाल १०० टक्के देण्यात सरकारी शाळा अघाडीवर आहेत.  येथे असणाऱ्या अत्याधुनिक सुविधा याचा विचार करून राज्यातील पालकांनी आपल्या मुलांना सरकारी शाळेतच शिकवावे असे आवाहन मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी केले. गुरुवारी मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शिक्षण खात्याचे सचिव प्रसाद लोलयेकर, संचालक शैलेश झिंगडे , मेघना शेटगावकर , शंभू घाडी, सिंधू प्रभुदेसाई , पॉल फर्नांडिस व अन्य अधिकारी उपस्थित होते. 

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की , यंदा दहावीच्या परीक्षेत ७८ पैकी ४१ सरकारी शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. यासाठी मी सर्व विद्यार्थी तसेच शिक्षकांचे अभिनंदन करतो. एक शिक्षण मंत्री म्हणून ही नक्कीच अभिमानास्पद बाब आहे. गेल्या काही वर्षात सरकारी शाळांमध्ये चांगल्या दर्जाच्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याशिवाय अत्याधुनिक तांत्रिक सुविधा देण्याचाही आमचा प्रयत्न आहे. 

ते म्हणाले, सरकारी शाळेतील बहुतेक विद्यार्थी हे मध्यम वर्गातील असतात. अनेकदा त्यांना एकच पालक असतात. सरकारी शाळेतील विद्यार्थी अन्य खासगी शिकवण्या लावत नाहीत. काही अनुदानित शाळा मुलांना नववीत अनुत्तीर्ण करतात. त्यांना नववीत दोन वेळा बसायला लावतात. असे अनुदानित शाळातून अनुत्तीर्ण झालेले विद्यार्थी सरकारी शाळेत प्रवेश घेतात.
सरकारी शाळेत विद्यार्थ्यांना एकाच इयत्तेत दोन वर्षे बसवत नाहीत. अशा विद्यार्थ्यांवर विशेष कष्ट घेऊन ते उत्तीर्ण होतील असा आमचा प्रयत्न असतो. सरकारी शाळेतील शिक्षकांनी देखील मोठे कष्ट घेऊन या विद्यार्थ्यांना शिकवले आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी शिक्षक प्रयत्न करत आहेत. यासाठी ते विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती सोबत क्रीडा आणि सांस्कृतिक प्रगतीकडेही लक्ष देतात. म्हणूनच पालकांनी आपल्या मुलांना सरकारी शाळेतच शिकवावे, असे आवाहन मी करत आहे.


सरकारी शिक्षकांना अधिक प्रशिक्षण देणार

लोलयेकर यांनी सांगितले की, केवळ गोव्यतील नव्हे तर संपूर्ण देशातील पालक त्यांच्या मुलांसाठी खाजगी किंवा अनुदानित शाळेला प्राधान्य देतात. त्याचा विचार करून आम्ही गेल्या काही वर्षापासून सरकारी शाळांचे इन्फ्रास्ट्रक्चर सुधारत आहोत. शाळेतील शिक्षकांचा विकास व्हावा यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येते. यापुढेही त्यांना देशातील नामांकित शिक्षण संस्थांकडून प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

निकाल वाढण्याची शक्यता 

झिंगडे यांनी सांगितले की , राज्यातील १३ सरकारी शाळांत प्रत्येकी एका विद्यार्थ्याला एटीकेटी मिळाल्याने या शाळांचा शंभर टक्के निकाल लागला नाही. कदाचित पुढील परीक्षेत ते उत्तीर्ण होऊ शकतात. यामुळे १०० टक्के निकाल देणाऱ्या सरकारी शाळांचे  प्रमाण वाढू शकते.

सहावीच्या पुस्तकात बदल नाही 

मेघना शेटगावकर यांनी सांगितले की, यंदा इयत्ता सहावीच्या पुस्तकात अभ्यासक्रम बदलण्यात येणार होता. मात्र, पुस्तके तयार नसल्याने यंदा जुनीच पुस्तके वापरण्यात येतील. इयत्ता तिसरीची तीन पुस्तके बदलण्यात आली आहेत. यावर्षीपासून ती लागू करण्यात येतील.

नववीच्या एनईपीसाठी आज बैठक 

यंदा इयत्ता नववीपासून राष्ट्रीय शिक्षण धोरणाची (एनईपी) अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आम्हाला घाई गडबडीत कोणताही निर्णय घ्यायचा नाही. यासाठी शुक्रवारी आढावा बैठक बोलवण्यात आली आहे. बैठकीत एनईपी यावर्षी सुरू करायचे की पुढील वर्षी सुरू करायचे याबाबत निर्णय घेऊन तो मुख्यमंत्र्यांना कळविणार असल्याचे लोलयेकर यांनी सांगितले.

शिक्षक भरती प्रक्रिया लवकरच पूर्ण 

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, सरकारी शाळेतील तासिका आधारित शिक्षकांना भरती प्रक्रियेद्वारे पूर्ण वेळ शिक्षक म्हणून घेण्यात आले आहेत. उरलेल्या जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. पुढील काही काळात सर्व सरकारी शाळा आणि उच्च माध्यमिक शाळांना पूर्ण वेळ शिक्षक मिळणार आहेत.