सरकारी नोकरभरती कर्मचारी भरती आयोगामार्फतच!

मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण : नोकरीसाठी पैसे मागणाऱ्यांपासून सावध राहण्याचा जनतेला सल्ला


30th October 2024, 09:46 pm
सरकारी नोकरभरती कर्मचारी भरती आयोगामार्फतच!

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : सरकारी नोकरीची पदे यापुढे कर्मचारी भरती आयोगामार्फतच भरली जातील. पुढील काही दिवसांत त्यासंदर्भातील जाहिरातीही प्रसिद्ध होतील. त्यामुळे सरकारी नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून पैसे मागणाऱ्यांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बुधवारी स्पष्ट केले.
राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. सरकारी नोकरभरतीसाठी स्थापन करण्यात आलेला कर्मचारी भरती आयोग सरकारकडून गुंडाळण्यात येणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांत सुरू होत्या. अखेर सरकारी नोकरभरती यापुढेही कर्मचारी भरती आयोगामार्फतच केली जाईल असे स्पष्ट करत, मुख्यमंत्र्यांनी या चर्चांवर पडदा टाकला.
सरकारी नोकऱ्या देण्याच्या बहाण्याने लोकांकडून पैसे उकळलेल्या संशयितांना गेल्या काही दिवसांत अटक करण्यात आली असून, पोलिसांकडून तपासही सुरू आहे. यात अन्य कोणी सापडतील, त्यांच्यावरही निश्चित कारवाई होईल. राज्यात सरकारी नोकऱ्या पैसे देऊन नव्हे, तर कर्मचारी भरती आयोगामार्फत भरल्या जात असल्याचे माहिती असतानाही सुशिक्षित लोकच सरकारी नोकऱ्यांसाठी पैसे देत आहेत, हे चिंताजनक आहे. नागरिकांनी यापुढे अशा भामट्यांवर विश्वास ठेवू नये, असे मुख्यमंत्री म्हणाले.
यापुढेही राज्यात सरकारी नोकऱ्या गुणवत्तेवरच दिल्या जातील. कर्मचारी भरती आयोगाकडून आतापर्यंत काही परीक्षा घेऊन सरकारी नोकरीची पदे भरण्यात आली आहेत. पुढील काही महिन्यांत आणखी पदांच्या भरतीसाठी जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत, असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, गेल्या काही दिवसांत सरकारी​ नोकऱ्यांचे आमिष दाखवून फसवणूक केल्याची वेगवेगळी प्रकरणे समोर आली आहेत. यात पूजा नाईक व अजित सतरकर, निवृत्त पशुवैद्यकीय डॉक्टर प्रकाश मुकुंद राणे आणि सागर नाईक, सुनीता पाऊसकर व दीपाश्री सावंत गावस यांचा समावेश आहे. यातील पूजा नाईकला फोंडा न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर ​डिचोली पोलिसांनी अटक केली आहे. इतर सर्वांची जामिनावर मुक्तता झाली आहे.
बारा हजार विद्यार्थ्यांना मोफत चष्मे
राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘स्वयंपूर्ण गोवा’ मोहिमेअंतर्गत इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या ३३ हजार विद्यार्थ्यांच्या डोळ्यांची मोफत तपासणी करण्यात आली होती. त्या खर्चाला बुधवारी मंत्रिमंडळाने मान्यता दिली. तपासणी करण्यात आलेल्या ३३ हजारांपैकी १२ हजार विद्यार्थ्यांन‍ा सरकारकडून मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले आहे. आठ ते दहा विद्यार्थ्यांच्या डोळ्यांवर किरकोळ शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहितीही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.