महाराष्ट्रात २८८ मतदारसंघात ७९९५ उमेदवार

भाजपचे १४८ तर काँग्रेसचे १०३ उमेदवार रिंंगणात

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
30th October 2024, 05:56 pm
महाराष्ट्रात २८८ मतदारसंघात ७९९५ उमेदवार

मुंबई : महाराष्ट्रातील २८८ विधानसभा मतदारसंघात सुमारे ८ हजार उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. मंगळवारी (२९ ऑक्टोबर) उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती. २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी ७,९९५ उमेदवारांनी निवडणूक आयोगाकडे १०,९०५ उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे राज्य मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

२२ ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली, ती २९ ऑक्टोबरला संपली. भाजप महाराष्ट्रात १४८ जागांवर निवडणूक लढवत आहे.तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने ८० जागांवर उमेदवार उभे केले आहेत. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने ५३ उमेदवारांना तिकीट दिले आहे. महायुतीच्या इतर मित्रपक्षांना पाच जागा देण्यात आल्या आहेत, तर दोन जागांवर निर्णय झाला नाही. तर विरोधी महाविकास आघाडीत काँग्रेस १०३ जागांवर निवडणूक लढवत आहे.तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उबाठा) ८९ जागांवर आणि राष्ट्रवादी (एसपी) ८७ जागांवर निवडणूक लढवत आहे. सहा जागा इतर एमव्हीए मित्रपक्षांना देण्यात आल्या आहेत, तर तीन विधानसभा जागांवर स्पष्टता नाही. यासह असदुद्दीन ओवेसी यांच्या पक्ष ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन (एआयएमआयएम) ने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी एकूण १४ उमेदवारांना तिकीट दिले आहे.

भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी विद्यमान आमदारांची तिकिटे रद्द कापली आहेत. सत्ताधारी भाजपने आपल्या आठ विद्यमान आमदारांना तिकीट दिले नाही. त्याचवेळी काँग्रेसने पाच विद्यमान आमदारांना तिकिटे ​दिली नाहीत.अजित पवार आणि शरद पवार यांनी यावेळी त्यांच्या पक्षाच्या दोन विद्यमान आमदारांना उमेदवारी दिली नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने दोन वगळता जवळपास सर्वच आमदारांना पुन्हा रिंगणात उतरवले आहे.
पिंपरी मतदारसंघातून सर्वाधिक ९९ अर्ज दाखल

पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघासाठी १२७२ उमेदवारांनी २५०६ अर्ज दाखल करण्यात आले आहेत. दौंड आणि कसबा मतदारसंघातून सर्वांत कमी ४२ उमेदवारी अर्ज प्राप्त झाले. तर पिंपरी विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक ९९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.