भारत - एक वेगळ्या प्रकारची महासत्ता

भारताला महासत्ता असण्याची गरज नाही. कोणत्याही देशाला महासत्ता असण्याची गरज नाही. त्याऐवजी, प्रत्येक देश तेथे राहणाऱ्या प्रत्येकासाठी कल्याणाचा स्त्रोत बनले पाहिजे. प्रत्येक राष्ट्राने त्यांच्या कल्याणाची आकांक्षा बाळगली पाहिजे. संसाधने आणि इतर गोष्टी थोड्या कमी असल्यामुळे थोडी स्पर्धा असेल. थोडी चढाओढ होऊ शकेल, जे ठीक आहे. माणसांमध्ये ते घडेल. परंतु, तुम्हाला तुमची बंदूक बाहेर काढण्याची गरज नाही. तसे केल्याने फक्त दुसरा सुद्धा आणखी मोठी बंदूक बाहेर काढेल आणि महासत्ता बनेल.

Story: विचारचक्र |
28th April, 10:07 pm
भारत - एक वेगळ्या प्रकारची महासत्ता

सद्गुरू : जेआरडी टाटा, ज्यांच्या कुटुंबाने भारतीय उद्योगाचा पाया रचला आहे, त्यांना एकदा विचारण्यात आले होते की, भारत आर्थिक महासत्ता बनावा असे त्यांना वाटते का? त्यांनी उत्तर दिले, “नाही, मला भारत आर्थिक महासत्ता बनायला नको आहे. भारत एक सुखी देश असावा, अशी माझी इच्छा आहे.”

 तुमचे राष्ट्र महासत्ता व्हावी ही आकांक्षा अत्यंत मूर्ख आणि बालिश आहे आणि त्यामुळे पृथ्वीचे अतोनात नुकसान झाले आहे. आज लोक चक्क असा युक्तिवाद करत आहेत की जगात अण्वस्त्रांशिवाय शांती राहणारच नाही - जे दुर्दैवाने सध्या खरे आहे. मी तुमच्या डोक्यावर बंदूक धरली आहे, तुम्ही माझ्या डोक्यावर बंदूक धरली आहे आणि आपण दोघांनी गोळी झाडली नाही - ही शांती नाही, हा वेडेपणा आहे. सध्या, या पद्धतीने आपण या पृथ्वीवर शांती स्थापित करण्याचा प्रयत्न करत आहोत; आणि कधीतरी एखाद्या दिवशी, कोणीतरी गोळी झाडेल. जर त्यांना थोडी झोप आली आणि ट्रिगर दाबला गेला तर संपूर्ण जगाचा स्फोट होईल. हे हेतुपूर्वक घडण्याची गरज नाही, ते असेच घडू शकते.

१९६० च्या काळात, एकमेकांबद्दल प्रचंड प्रमाणात संशय असल्याने, युनायटेड स्टेट्स (अमेरिका) आणि यूएसएसआर (रशिया) यांचा प्रत्येकाचा असा विश्वास होता की ते एकमेकांविरुद्ध अण्वस्त्रे वापरणार आहेत. ते स्वतःची अण्वस्त्रे वापरण्याच्या अगदी जवळ आले. ते आज प्रसिद्ध करत असलेली गोपनीय माहिती वाचली, तर त्यांची विचारप्रक्रिया पूर्णपणे वेड्या लोकांची वाटते. केवळ त्यांच्या डोक्यातील या वेडेपणामुळे त्यांनी जगाला संपूर्ण विनाशाच्या किती जवळ आणले हे अविश्वसनीय आहे! काहीवेळा ते अण्वस्त्रे सोडण्याआधी फक्त काही मिनिटांच्या अंतरावर होते; ते तिथपर्यंत आले होते.

महासत्ता बनण्याची ही सारी आकांक्षा जायला हवी. भारताला महासत्ता असण्याची गरज नाही. कोणत्याही देशाला महासत्ता असण्याची गरज नाही. त्याऐवजी, प्रत्येक देश तेथे राहणाऱ्या प्रत्येकासाठी कल्याणाचा स्त्रोत बनले पाहिजे. प्रत्येक राष्ट्राने त्यांच्या कल्याणाची आकांक्षा बाळगली पाहिजे. संसाधने आणि इतर गोष्टी थोड्या कमी असल्यामुळे थोडी स्पर्धा असेल. थोडी चढाओढ होऊ शकेल, जे ठीक आहे. माणसांमध्ये ते घडेल. परंतु, तुम्हाला तुमची बंदूक बाहेर काढण्याची गरज नाही. तसे केल्याने फक्त दुसरा सुद्धा आणखी मोठी बंदूक बाहेर काढेल आणि महासत्ता बनेल.

दुर्दैवाने, सध्या जगाचे कार्य असेच चालू आहे. अमेरिकेकडे या पृथ्वीला एकाहून जास्त वेळा नष्ट करायला पुरतील इतकी अण्वस्त्रे आहेत. जर तुमच्याकडे इतर ग्रहांचा सुद्धा नाश करण्यासाठी पुरेशी अण्वस्त्रे असतील तर तुम्ही त्यांच्यापेक्षा मोठी महासत्ता आहात. कोणत्याही राष्ट्राने अशी आकांक्षा बाळगावी असे मला वाटत नाही. भारताने त्या मार्गाने जाऊ नये. मला आशा आहे की इतर देश देखील ते त्यांच्या डोक्यातून काढून टाकतील. माझी इच्छा आहे की सर्व महासत्तांचे थोडेसे दात काढून घेतले पाहिजे आणि त्यांना फक्त आपल्या लोकांच्या कल्याणासाठी आकांक्षा बाळगी पाहिजे. 

भारत हा एक कल्याणकारी देश असावा, जिथे आपले कल्याणाचे मानक हे केवळ संपत्ती आणि दुसऱ्या कुणावर विजय मिळवण्याबद्दल नसले पाहिजे. दुसऱ्यावर विजय मिळवणे आणि दरोडा घालणे या काही वेगळ्या गोष्टी नाहीत. जर ते एखाद्या व्यक्तीने केले असेल तर त्याला घरफोडी म्हणतात. टोळीने केली असेल तर त्याला दरोडा म्हणतात. जर ते एखाद्या राष्ट्राने केले तर त्याला विजय किंवा शासन बदल म्हणतात.

आपली आकांक्षा एक समजूतदार, सौम्य राष्ट्र बनण्याची असली पाहिजे, जे स्वतःसाठी आणि शक्य तितके, जगातील प्रत्येकासाठी कल्याण घडवून आणेल. आपण हजारो वर्षे या राष्ट्रात अध्यात्मिक विचार विकसित करण्यात घालवली आहेत. एक राष्ट्र म्हणून भारत अगदी खास आहे. इथे एक ठराविक गुण आहे जो तुम्हाला इतर कोठेही सापडणार नाही. ज्याला आपण सध्या भारत म्हणून संबोधतो, या जनसमुदायामध्ये अशी एक जागरूकता आणि एक प्रकारचे शहाणपण आहे, जे इतर कोठेही सापडणे फार कठीण आहे. तुम्हाला वैयक्तिक लोकांमध्ये ते आढळू शकते, परंतु जीवनाच्या अनेक पैलूंबद्दल नकळतपणे एक ठराविक जागरूकता असलेल्या लोकांचा एक मोठा समूह जगात कोठेही नाही. त्यामुळे प्रत्येक राष्ट्राला अण्वस्त्रे दाखवून “आम्ही महासत्ता आहोत,” असे म्हणणे भारताला शोभणारे नाही.

शक्ती म्हणजे जगातील सर्वात मोठे सैन्य असणे असा नाही. शक्तीचा अर्थ असा आहे की जगातील प्रत्येकजण त्यांना चांगले जगायचे असेल तर मार्गदर्शनासाठी तुमच्याकडे पाहतो. पूर्वीपासून जेव्हा लोक चांगले जगण्याचा विचार करत तेव्हा ते नेहमी पूर्वेकडे पहात. या संस्कृतीमध्ये कायमच ही ताकद आहे. त्यामुळे भारताने प्रत्येक राष्ट्राला ध्यानमय बनवण्याची आकांक्षा बाळगली पाहिजे.


सद् गुरू

ईशाफाऊंडेशन