मनोरंजन, पैशासाठी क्रिकेटचा बळी!

Story: क्रीडारंग | |
30th April, 12:38 am
मनोरंजन, पैशासाठी क्रिकेटचा बळी!

सध्या आयपीएलमध्ये गोलंदाजांचा सर्वांत कठीण काळ जात आहे. चेंडू आणि बॅटच्या खेळामध्ये बॅट चेंडूपेक्षा वरचढ ठरत आहे. ४६ सामन्यांमध्ये २९ वेळा संघांनी २०० किंवा त्यापेक्षा अधिक धावा कुटल्या आहेत. फलंदाज एखाद्या व्हिडिओ गेमप्रमाणे षटकार आणि चौकार मारताना दिसत आहेत. स्टेडियममध्ये बसलेले प्रेक्षक याचा पुरेपूर आनंद लुटत आहेत. मात्र खऱ्या क्रिकेटप्रेमीला हा प्रश्न नक्कीच सतावत असणार की केवळ मनोरंजनासाठी गोलंदाजांना बळीचा बकरा तर बनवला जात नाही ना?

सध्या आयपीएलचे निम्म्याहून अधिक सामने खेळविले गेले आहेत. या सामन्यांतील काही अपवादात्मक सामने वगळता मैदानावर केवळ फलंदाजांचे वर्चस्व राहिले आहे. टी-२० मध्ये २५० धावांचा पाठलाग करणे म्हणजे यापूर्वी अशक्यप्राय गोष्ट होती. पण आयपीएलमध्ये ही गोष्ट सहज साध्य होताना दिसत आहे. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध पंजाब किंग्जने २६२ धावांचे लक्ष्य केवळ ११२ चेंडूत पूर्ण केले. हे पाहिल्यावर मात्र आपल्याला नक्कीच शंका येते. या हंगामापूर्वी, आयपीएलमध्ये केवळ दोनदा संघाने एका डावात २५० पेक्षा जास्त धावा केल्या होत्या. यावेळी आयपीएलमधील सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम या दोनदा मोडला गेला आहे. हैदराबादने प्रथम २७७ धावा केल्या आणि नंतर २८७ धावा करत विक्रम मोडला. एवढी मोठी धावसंख्या करूनही सनरायझर्स हैदराबादने केवळ २५ धावांनी विजय मिळवला. 

या मोसमात तीन वेळा एका सामन्यात ५०० हून अधिक धावा झाल्या आहेत. याआधी आयपीएल सामन्यातील सर्वोच्च धावसंख्या ४६९ धावा होती. आयपीएलच्या या मोसमात पहिल्या चेंडूपासून षटकार आणि चौकारांचा पाऊस सुरू होतो. क्रिकेटमध्ये जेव्हा चेंडू नवीन असतो तेव्हा तो स्विंग होतो. अशा स्थितीत फलंदाजांना संघर्ष करावा लागतो. सेट झाल्यानंतरच तो मोठे फटके मारू शकतो. चेंडू जुना झाल्यावर फिरकीपटू खेळात येतात. यावेळी मात्र तसे काही नाही. फलंदाज पहिल्या चेंडूपासून आक्रमणाला सुरुवात करत आहेत. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात हैदराबादने पॉवरप्लेच्या केवळ ६ षटकांत १२५ धावा केल्या. अशा स्थितीत कौशल्याचा खेळ संपतो. फलंदाज एका हाताने षटकार मारत आहे. वरून दव आल्यावर गोलंदाजी करणे अवघड होते. 

आजच्या काळात लोकांची विचारसरणीही बदलली आहे. जर खेळपट्टी गोलंदाजांसाठी उपयुक्त असेल, तर तिला वाईट म्हटले जाते. त्याच्यावर टीका होऊ लागते. पण जेव्हा फलंदाज सहजतेने षटकार आणि चौकार मारतो तेव्हा, त्या खेळपट्टीवर एकही प्रश्न उपस्थित होत नाही. भारतीय संघाला पुढील महिन्यात टी-२० विश्वचषक खेळावयाचा आहे. आताची परिस्थिती पाहता फलंदाज येथे अगदी सहजतेने षटकार, चौकारांचा पाऊस पाडत आहेत. तीच मानसिकता विश्वचषकात राहिली तर भारतीय फलंदाज टिकाव धरू शकणार नाहीत. सध्या सपाटून मार खाणारे मिचेल स्टार्क, कमिन्ससारखे गोलंदाज विश्वचषकात आपले खरे रूप दाखवणार आहेत आणि हे भारतीय संघाला नक्कीच महागात पडणार आहे. आयपीएलमध्ये केवळ मनोरंजन आणि पैशासाठी क्रिकेटचा मात्र बळी दिला जात आहे एवढे निश्चित!


- प्रवीण साठे, (लेखक दै. ‘गाेवन वार्ता’चे उपसंपादक आहेत.)