ज्योतिबांवर केलेल्या हल्ल्याचा निषेध

महात्मा ज्योतिबा फुले यांना कुठल्या एका जाती किंवा जमातीच्या मागे उभे करणे हा त्यांच्या कार्याचा व विचारांचा अपमान होईल. कारण ते समस्त वंचित, पीडित, गरीब, बहुजनांसाठी लढले. त्यांच्या कामाच्या महात्म्यामुळेच आज लिहिणारे हात लिहीत आहेत, बोलणारे लोक बोलत आहेत. विद्येचा हात धरून त्यांनी दलदलीत घुसमटणाऱ्या समाजाला बाहेर काढले. गुलाम म्हणून जगणाऱ्याला गुलामीची जाणीव करून देऊन त्याला क्रांतीसाठी प्रवृत्त करणारे ज्योतिबा होते.

Story: विचारचक्र |
26th April, 11:31 pm
ज्योतिबांवर केलेल्या हल्ल्याचा निषेध

महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्याच्या मध्यभागी असलेल्या आझाद मैदानातील महात्मा फुले चौकात असलेल्या महात्मा ज्योतिबा फुलेंच्या अर्धाकृती पुतळ्याची विटंबना केली गेली. या घटनेची एक स्त्री म्हणून, माणूस म्हणून मी निषेध करते. काळी शाई टाकून पुतळ्याची विटंबना करणारा कुणी समाजकंटक असणार. हा समाजकंटक पेरलेला की स्वयंप्रेरित हे अजून कळायचे आहे. पण शाई टाकणाऱ्या माणसाने ती महात्मा फुलेंच्या सदऱ्यावर मागून टाकलेली आहे. आजही महात्म्यांच्या विचारसरणीला समोर येऊन भिडण्याची ताकद सामाजिक तेढ निर्माण करू पाहणाऱ्यांमध्ये नाही. त्याचबरोबर पाठीमागून निंदा नालस्ती करणारे, सुरा खुपसणारे कायम जिवंत आहेत. समोरासमोर नजरेला नजर भिडवत एखाद्याला जाब विचारता न येणे, त्याला प्रत्युत्तर देता न येणे, मुद्द्याचे काही बोलता न आल्याने मुद्दा सोडून गुद्द्यावर येणे ही परंपरा जोपासणारी जमात आणि त्यांची लोकसंख्या वाढत चालली आहे. आपण माणसांच्या समाजात राहतो की जनावरांच्या कळपात? असे म्हणणे म्हणजे जनावरांचाच अपमान असे म्हणण्याची परिस्थिती आलेली आहे काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

देशभरात लोकसभा निवडणुका सुरू आहेत अन् एकमेकांवर चिखलफेक सध्या सुरू आहे. त्यात कोण कुणाला न जुमानता, कसलीही माणुसकीची तमा न बाळगता लोक एकमेकांवर तुटून पडत आहेत. साम, दाम, दंड, भेद अशा सगळ्या अस्त्रांचा वापर होत आहे. त्यात आपला इतिहासही नेत्यांनी सोडला नाही. त्याचाही आपल्याला हवा तसा दुमडून, उलटून, चोळामोळा करून जनतेचा स्मृतिभ्रंश करीत त्यांच्या डोक्यात जुमला तयार करण्यास वापर करीत आहेत. या कारस्थानाच्या सफलतेसाठी इतिहासातील व्यक्ती आपली आहुती पुन्हा पुन्हा देत आहेत. पण जेव्हा थोर व्यक्तींना तुम्ही कितीही मारा ते मरत नाहीत, तेव्हा मग मुद्दा सोडून गुद्द्यावर येत हे असे विटंबना करण्याचे प्रकार घडत आहेत. 

निवडणूक आली की बहुजन समाज, स्त्री, शूद्र, अती शूद्र यांना चांगले दिवस येतात. त्यांना आपल्या स्वार्थी राजकारणासाठी कसे वापरून घेता येईल, याकडे नेत्यांचे लक्ष लागलेले असते. जेव्हा पोटापाण्याचे प्रश्न गहन होत असतात आणि त्यांची उत्तरे द्यायला ते असमर्थ ठरतात, तेव्हा लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी अनेक क्लुप्त्या योजिल्या जातात. त्यातलेच एक, हे तुमच्या आराध्य दैवतांना, समाजपुरुषांना अपशब्द द्या, म्हणजे लोक आपोआप त्याकडे वळतील.

 तरी महात्मा ज्योतिबा फुले यांना कुठल्या एका जाती किंवा जमातीच्या मागे उभे करणे हा त्यांच्या कार्याचा व विचारांचा अपमान होईल. कारण ते समस्त वंचित, पीडित, गरीब, बहुजनांसाठी लढले. त्यांच्या कामाच्या महात्म्यामुळेच आज लिहिणारे हात लिहीत आहेत, बोलणारे लोक बोलत आहेत. विद्येचा हात धरून त्यांनी दलदलीत घुसमटणाऱ्या समाजाला बाहेर काढले. गुलाम म्हणून जगणाऱ्याला गुलामीची जाणीव करून देऊन त्याला क्रांतीसाठी प्रवृत्त करणारे ज्योतिबा होते. ज्यांच्या सात पिढ्या शिकल्या नाहीत, त्यांना शिक्षणाचा हक्क मिळवून दिला. शेतकऱ्याचा आसूड ओढत शेतकऱ्याला कायदेशीर ताकद दिली. अबला, माता भगिनींना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या समाजाच्या जोखडातून मुक्त करून नवीन जीवन दिले. अशी एक ना अनेक कार्ये त्यांनी केली. क्रांतीची, बदलाची सुरुवात ही आपल्यापासून करून आपल्या घरात क्रांतीची ज्योत पेटविली. 

छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी रायगडावर झाडाझुडपांनी वेढलेली होती. ती साफ करून तिचा जीर्णोद्धार केला. परत येऊन त्यांनी शिवजयंती महोत्सव मंडळाचा विचार मांडला. रयतेच्या राजाच्या कार्याची ओळख करून देण्यास त्यांनी महाराजांवर पोवाडा लिहिला. त्यानंतर १८६७ साली जयंती उत्सवाला मूर्त स्वरूप दिले. तेव्हापासून शिवजयंती साजरी होऊ लागली. त्याचे आज मोठ्या प्रमाणात सोहळे साजरे होताना दिसतात. शिवाजी महाराजांचे मावळे म्हणवून घेणारे नाक्यानाक्यांवर अनेक आहेत. त्यांना महात्मा फुलेंच्या पुतळ्याची विटंबना केलेली पाहून काय वाटले आहे, ते माहीत नाही.

गेल्या ११ एप्रिल रोजी महात्मा फुले यांची जयंती देशभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. लोकसभा निवडणुका आणि फुलेंच्या विचारांची पाठराखण या दोन्ही कारणास्तव राजकारण, समाजकारण करणाऱ्या सगळ्या मंडळींनी या जयंती उत्सवाला चांगलीच उपस्थिती लावली होती. त्या सगळ्या नेत्यांनी निषेध करून या घटनेची चौकशी तत्काळ करायला हवी. वेगवेगळ्या सामाजिक संस्थांनी आपला निषेध व्यक्त केलेला आहे. असे प्रकार घडणे हे दुर्दैव आहे. भविष्यात असे प्रकार होऊ नयेत यासाठी आता घडलेला प्रकार गांभीर्याने घेऊन तत्काळ त्याचा छडा लावला पाहिजे. त्यासाठी लोकांनी दबाव गट तयार केले पाहिजेत. 

इंग्रज भारतातून गेले, पण तोडा आणि राज्य करा ही वृत्ती भारतातून गेली नाही. त्यामुळे जो निषेध व्यक्त करायचा तो संयमाने केला पाहिजे. निवडणुका अंगावर आल्या असल्याने समाजातील मूळ आणि अती महत्वाचे मुद्दे बाजूला ढकलले जाऊ नयेत, हेही बघणे महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजाच्या कार्यकर्त्यांचे कर्तव्य आहे. 

असे अनेक हल्ले जिवंत माणसांवर होतात. त्यांचे खून पाडले जातात. त्यांच्या विचारांचा सामना करता येत नसल्याने वैफल्यग्रस्त होऊन असे प्रकार केले जातात. जिवंत नाही तर मृत चालतील, असा विचार करून त्यांचे चारित्र्य हनन केले जाते किंवा मग पुतळ्यांची विटंबना केली जाते. त्यातून दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होऊ शकतो, किंबहुना ते व्हावे या हेतूनेच असे प्रकार घडतात, ही शक्यता नाकारता येत नाही. शांतताप्रिय समाजाला असंतोषाच्या आगीत ढकलल्यानंतर आपण आपले राजकारण साध्य करू शकतो, म्हणून तर निवडणूक जवळ आहे अन् हे असे प्रकार घडतात त्याचे विश्लेषण मतदारांनी करावे.

दीनदुबळ्यांच्या सेनेच्या सामर्थ्याचे महत्व पाच वर्षांनी एकदाच कळते अन् ते राजकारण्यांना कळते. त्या दुबळ्या सेनेला नाही. या आपल्या मताचे महत्व जाणून प्रत्येकाने विवेकाने मतदान केले पाहीजे. ज्या समाजकंटकांनी समाजातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यांच्या कारस्थानाला भीक न घालता आपला एकोपा अन् मूळ प्रश्न यापासून तसूभर डळमळू नये. सोबतच त्या समाजकंटकाना पकडून शिक्षा होईल, हेही पाहावे. 


नमन सावंत (धावस्कर)  

(लेखिका सामाजिक कार्यकर्त्या व साहित्यिक आहेत.)