ज्ञानी असूनही देवाला भजतो तो खरा भक्त!

संसारात कष्ट करताना दु:खमुक्त व्हावे म्हणून आर्त मला भजतात. माझे ज्ञान व्हावे म्हणून जिज्ञासू मला भजतात. (परम) अर्थाची इच्छा करणारेही मला भजतात. या तीन प्रकारांव्यतिरिक्त जो चौथा प्रकार आहे भजकांचा, त्यांच्याकडे मला भजण्याचे काहीच कारण शिल्लक राहत नाही! पण तरीही ते मला भजतात, माझ्याकडून कोणतीही अपेक्षा न ठेवता. ते खरे ज्ञानी असतात! हे अर्जुना, असा जो ज्ञानी असूनही मला भजतो तो खरा भक्त!

Story: विचारचक्र |
06th May, 06:01 am
ज्ञानी असूनही देवाला भजतो तो खरा भक्त!

मागील लेखात आपण श्रीमद भगवदगीतेच्या ७ व्या अध्यायाच्या १४ व्या श्लोकापर्यंत आलो होतो. "माझ्या त्रिगुणमयी मायेचा हा भवसागर जीवांना तरून जाण्यास अत्यंत दुष्कर आहे, पण जे स्वतःचे समर्पण सर्वतोपरी माझ्यात करतात, ते हा भवसिंधू लिलया तरून जातात खरे, पण असे जीव अगदीच विरळा!" असे त्या श्लोकात भगवंतांनी अर्जुनाला सांगितलेले आपण पाहिले. आता पुढील श्लोकांकडे वळूया.

न मां दुष्कृतिनो मूढा: प्रपद्यन्ते नराधमा:।

माययापहृतज्ञाना आसुरं भावमाश्रिता: ।।१५।।

चतुर्विधा भजन्ते मां जना: सुकृतिनोsर्जुन।

आर्त्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ ।।१६।।

सरळ अर्थ : असा सुगम उपाय असून देखील मायेच्या योगे ज्यांचे ज्ञान हरपले आहे असे व आसुरी स्वभावाला धारण केलेले, मनुष्यामध्ये नीच आणि दुष्कर्म करणारे असे मूढ लोक मला भजत नाहीत. आणि हे पुरुषांमध्ये श्रेष्ठ अशा भरतवंशी अर्जुना, अर्थार्थी (म्हणजे सांसारिक पदार्थांसाठी भजणारा), आर्त (म्हणजे संकटांचे निवारण होण्याकरिता भजणारा), जिज्ञासू (म्हणजे मला यथार्थ रूपाने जाणावे, या इच्छेने भजणारा) आणि ज्ञानी (म्हणजे निष्कामी) असे चार प्रकारांचे पुण्यशील भक्तजन मला भजतात.

विस्तृत विवरण : प्रत्यक्षात भवसागर तरून जाणारे फारच थोडे! जे बाकीचे आहेत त्यांच्यातल्या बहुतेकांना अहंकाराच्या भुताने पछाडलेले असते. त्यायोगे स्व-रूपाचे विस्मरण झालेले असते. त्यामुळे आत्मज्ञान होण्याचा प्रश्नच येत नाही! मग आपोआपच वागण्यातले नियम म्हणून जे काही असतात त्यांचेही त्यांना भान रहात नाही. त्यायोगे त्यांना निर्लज्जपणा प्राप्त होतो. त्यामुळे पुढे जी अधोगती होणार असते तिचेही भान रहात नाही! याचा परिणाम म्हणून ते लोक मनास येईल तसे वागतात आणि जे काही करू नये असे वेदांनी सांगितले आहे तेच नेमके करून बसतात! हे जीव वास्तविक जे करण्यासाठी या देहाच्या गावी आलेले आहेत, ते करणे राहिले बाजूला, पण तो कार्यार्थ सोडून तिथल्या वाटमारी करणाऱ्या कामक्रोधादी घटकांशी हातमिळवणी करून अहंकाराची व ममत्वाची व्यर्थ बडबड इंद्रियग्रामांच्या राजमार्गावर उदंड करत बसतात! विविध दु:खे आणि शोक यांचे अनेकदा आघात होऊन सुध्दा त्याबद्दल त्यांना खंत वाटत नाही! इतके असूनही त्यांच्या मनाला शांती अशी ठाऊकच नाही! याचे खरे कारण म्हणजे ते सगळे जीव मला जाणून घेण्याचा प्रयत्न न करता  मायेच्या जाळ्यांत फसलेले आहेत!

आता ज्यांना माझी पत्रास आहे त्यांची स्थिती सांगतो. ते आत्महिताच्या मार्गावर असलेले माझे भक्त चार प्रकारचे आहेत. त्यांनी कर्णोपकर्णी माझ्याबद्दल काहीतरी ऐकलेले असते. संसारात काही गोष्टी प्राप्त झाल्या तर आपल्या आनंदाचा स्तर उंचावेल असे वाटल्यामुळे त्या गोष्टी आपल्याला मिळाव्यात अशी प्रार्थना माझ्याकडे करणारे काहीजण असतात. ते माझे अर्थार्थी भक्त होत. संकटे तर बहुतेक सगळ्यांच्याच जीवनात येतात. त्या संकटांपासून आपले निवारण करण्याची इच्छा धरून त्यातले काहीजण माझे स्मरण करतात. ते माझे आर्त भक्त होत.

मी म्हणजे नेमका कोण आहे, कसा आहे, यांच्या जीवनात माझी भूमिका काय आहे, इतर बरेचसे लोग एवढे माझ्या नादी का लागलेले आहेत, माझा प्रभाव काय आहे, त्याचा परिणाम काय आहे आणि तो साधण्यासाठी काय करणे आवश्यक आहे इत्यादी गोष्टींची जिज्ञासा मनात असलेले लोक ती पूर्ण करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्नरत असतात. ते माझे जिज्ञासू भक्त होत. क्वचित काही लोक असेही असतात की त्यांना कर्मधर्मसंयोगाने माझ्याबद्दल सगळे काही कळलेले असते. बरेचसे वळलेलेही असते. त्यांचे माझ्याकडे काहीही काम नसते. त्यांचे माझ्याकडे काहीही मागणे नसते. त्यांची माझ्याकडून काहीही अपेक्षा नसते. पण माझ्या स्मरणातच त्यांचे कल्याण आहे हे त्यांना माहीत असल्याने ते सतत माझे स्मरण करतात. ते माझे ज्ञानी भक्त होत.

तेषां ज्ञानी नित्ययुक्त एकभक्तिर्विशिष्यते।

प्रियो हि ज्ञानिनोsत्यर्थमहं स च मम प्रिय: ।।१७।।

सरळ अर्थ : त्यांच्यामध्येही नित्य माझ्या ठिकाणी ऐक्यभावाने स्थित झालेला अनन्य प्रेमभक्तीचा ज्ञानी भक्त अती उत्तम होय कारण तात्विकपणे मला जाणणाऱ्या ज्ञान्याला मी अत्यंत प्रिय आहे; आणि तो ज्ञानी मला अत्यंत प्रिय आहे.

विस्तृत विवेचन : संसारांत कष्ट करताना दु:खमुक्त व्हावे म्हणून आर्त मला भजतात. माझे ज्ञान व्हावे म्हणून जिज्ञासू मला भजतात. (परम) अर्थाची इच्छा करणारेही मला भजतात. या तीन प्रकारांव्यतिरिक्त जो चौथा प्रकार आहे भजकांचा, त्यांच्याकडे मला भजण्याचे काहीच कारण शिल्लक रहात नाही! पण तरीही ते मला भजतात! माझ्याकडून कोणतीही अपेक्षा न ठेवता! ते खरे ज्ञानी असतात! हे अर्जुना, असा जो ज्ञानी असूनही मला भजतो तो खरा भक्त! ज्ञानाचा प्रकाश त्याच्या बुध्दीमध्ये पसरलेला असल्याने त्याच्या मनात भेदाचा अंध:कार नसतो! त्याला  माझ्याशी एकरूपता साधून सायुज्याची प्राप्ती झालेली असते. याच्या परिणामस्वरूप तो मीच होऊन मलाच भजतो. स्फटिकाच्या ठिकाणी जसा पाण्याचा भास होतो तसा (देहाकाराने) तो इतरांना माझा भक्त वाटतो खरा, पण प्रत्यक्षात तो मद्रूपच झालेला असतो. जो ज्ञानी असतो त्याच्या कौतुकाचं वर्णन शब्दांमधे करता येत नाही! जसा वायू आकाशात विलीन झाल्यावर वायुपण वेगळे उरत नाही, तद्वतच तो माझ्या रूपाशी पूर्णपणे एकरूप झाल्याने त्याचे भक्तपणही दिसेनासे होते (कारण तो मीच होऊन जातो!)  वायूची हालचाल प्रत्ययास आली तरच तो आकाशाहून वेगळा आहे हे जाणवते. एरवी तो पूर्णतः गगन-स्वरूपच असतो! तसेच जो ज्ञानी असतो तो जेव्हा शारीरिक कर्म करतो तेव्हाच तो भक्त असल्याचे इतरांना जाणवते. पण एरव्ही स्वानुभूतीच्या योगाने (म्हणजे आत्मरूपाच्या अनुभवाच्या योगाने) तो स्वतःच्या शरीरासकट माझ्यात पूर्णपणे विलीन असतो. त्याचा ज्ञानोदय झालेला असल्याने तो मला आपला आत्मा मानतो. म्हणून मग प्रेमभराने मी ही उचंबळून तो माझाच आत्मा आहे असे म्हणतो!

अर्जुना, आपल्या जीवापलिकडे जी स्वरूपाची खूण आहे, तिला सर्वांगाने व्यवस्थितपणे आकळून घेऊन जो व्यवहार करतो तो देहधारी जरी असला तरी माझ्याहून भिन्न असतो का?


मिलिंद कारखानीस

(लेखक राज्याचे निवृत्त उपवनपाल असून ते विविध विषयांवर लेखन करतात.)

मो. ९४२३८८९७६३