मुलांच्या इलेक्ट्रॉनिक गॅझेट वापरावर पालकांनी लक्ष द्यावे

गोवा

Story: अंतरंग |
06th May, 06:05 am
मुलांच्या इलेक्ट्रॉनिक गॅझेट वापरावर पालकांनी लक्ष द्यावे

यंदा बारावीचा निकाल ८४.९९ टक्के लागला. नेहमीप्रमाणे यंदाही मुलींनी बाजी मारली. मुलींचा निकाल ८८.०६ टक्के तर मुलांचा निकाल ८१.५९ टक्के लागला. असे असले तरी मागील वर्षीच्या तुलनेत यंदा विद्यार्थी उत्तीर्ण होण्याचे प्रमाण १०.४६ टक्क्यांनी घटले आहे. केवळ मागच्या वर्षी नव्हे तर गेल्या दहा वर्षांच्या तुलनेत यंदाचा निकाल कमी लागला. गोवा शालान्त मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये यांनी निकाल कमी लागण्यामागची विविध कारणे सांगितली होती. त्यात मुलांकडून 'इलेक्ट्रॉनिक गॅझेट'च्या वाढलेल्या वापरामुळे निकाल कमी लागल्याच्या शक्यतेवर त्यांनी भर दिला होता. 

राज्यातील शिक्षक चांगले काम करत आहेत. मात्र विद्यार्थी कष्ट करण्यात कमी पडत आहेत. विद्यार्थ्यांचा इलेक्ट्रॉनिक गॅझेट वापर वाढल्याच्या अनेक तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत. यामुळे देखील विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करता येत नाही. विज्ञान आणि व्यावसायिक अभ्यासक्रमात उत्तीर्ण होण्याचे प्रमाण कमी झाल्याचे भगीरथ शेट्ये यांनी सांगितले होते. अर्थात मुलांना ही सवय का? आणि कुणी लावली? अशा सवयी लागत असताना पालकांनी काय केले? निकाल कमी लागला, यासाठी केवळ विद्यार्थी आणि त्यांची 'इलेक्ट्रॉनिक गॅझेट'च कारणीभूत आहेत का? या प्रश्नांची उत्तरे मिळणे आवश्यक आहे.

सध्याचे युग हे डिजिटल माध्यमांचे युग आहे. माहिती, संदेश यांची देवाण-घेवाण करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक गॅझेटचा वापर वाढला आहे. त्यामुळे केवळ विद्यार्थीच नव्हे तर पालकांकडे देखील इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स असणे आवश्यक बनले आहे. बारावीच्या बहुतेक मुलांकडे मोबाईल आहेत. सरकारने माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांना लॅपटॉपही दिले होते. कोविड महामारीच्या काळात ऑनलाईन वर्ग भरत होते. यामुळे मोबाईल किंवा लॅपटॉप या गोष्टी आवश्यक बनल्या. या काळात इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सने केवळ विद्यार्थ्यांना नव्हे तर वर्क फ्रॉम होम करणाऱ्या अनेकांना मदत केली होती. अर्थात तंत्रज्ञानाच्या जशा चांगल्या बाजू आहेत, तशा वाईटही बाजू आहेत.

कोविड काळात विद्यार्थ्यांना लागलेली इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सची सवय आजही गेलेली नाही, असे म्हणता येईल. उलट त्या सवयीचे रूपांतर व्यसनात झाले. मोबाईल, लॅपटॉप यांच्यासह इंटरनेटचा खजानाच मुलांपुढे खुला झाला. या खजान्यात आवश्यक ज्ञानासह मुलांना बिघडवणाऱ्या अनावश्यक अशा अनेक गोष्टी आहेत. यात फेसबुक, इन्स्टाग्राम सारख्या सोशल मीडियापासून, गेमिंग, व्हिडिओ आणि अगदी टोकाचे उदाहरण म्हणजे पॉर्न सारख्या गोष्टींचा समावेश आहे. सतरा, अठरा वय असणाऱ्या किशोरवयीन मुलांना अशा गोष्टींची भुल पडणे साहजिकच आहे. यावेळी पालकांची आणि शिक्षकांची भूमिका महत्त्वाची ठरते. 

किशोरवयीन मुलांचा पालकांचे ऐकण्यापेक्षा मित्र-मैत्रिणींचे ऐकण्याकडे जास्त कल असतो. अर्थात दरवेळेस मित्र-मैत्रिणी चुकीचा सल्ला देतील असे नाही. विद्यार्थ्यांचा बराच वेळ शाळा, महाविद्यालयात जातो. अशावेळी शिक्षकांनी योग्य ती शिस्त लावणे अपेक्षित आहे. एखादा विद्यार्थी सतत मोबाईलमध्ये असेल, अभ्यासात कमी पडत असेल तर त्याला समजावून सांगणे हे शिक्षकांचे कर्तव्य आहे. सरकारने काही महिन्यांपूर्वी विद्या समीक्षा केंद्राचे अनावरण केले होते. याद्वारे राज्यातील सुमारे २ लाख मुलांच्या तसेच सर्व शिक्षकांच्या कामगिरीवर लक्ष ठेवले जात आहे.

अभ्यासक्रमातील एखादा विषय विद्यार्थ्यांना समजला आहे का नाही? किती विद्यार्थ्यांना समजला? त्यांना कोणता विषय अवघड जात आहे? शिक्षक शिकवण्यात कमी पडत आहेत, का विद्यार्थी समजून घेण्यास कमी पडत आहेत या सर्व प्रश्नांची उत्तरे या केंद्राद्वारे मिळणार आहेत. या समीक्षा केंद्राद्वारे बारावीच्या निकालाचे विश्लेषण करणे आवश्यक आहे. अर्थात शिक्षण खाते ते करत असेल, अशी अपेक्षा आहे. सर्वात शेवटी आणि महत्त्वाचे म्हणजे मुलांच्या इलेक्ट्रॉनिक गॅझेटच्या वापराबाबत पालकांनी लक्ष देणे देखील आवश्यक आहे. त्यांनी आपल्या मुलांच्या मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप अशी इलेक्ट्रॉनिक गॅझेट वस्तूंच्या वापरावर मर्यादा घातल्या पाहिजेत. मुले इंटरनेट वापरताना काही संकेतस्थळे ब्लॉक केली पाहिजेत. इलेक्ट्रॉनिक गॅझेट केवळ गरजेपुरती दिली तर निकालात नक्कीच फरक पडेल.

केवळ इलेक्ट्रॉनिक गॅझेटला दोष देण्यापेक्षा शिक्षण खाते, शिक्षक, पालक, विद्यार्थ्यांसह ही संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी आहे, हे देखील लक्षात घेतले पाहिजे.

पिनाक कल्लोळी, दै. गोवन वार्ताचे प्रतिनिधी आहेत.