चीनमधील शहरांना भूस्खलनाचा वाढता धोका!

Story: विश्वरंग |
26th April, 11:33 pm
चीनमधील शहरांना भूस्खलनाचा वाढता धोका!

बदलत्या हवामानामुळे जगभरातील लोकांना नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागत आहे. येत्या काळात जगातील अनेक शहरे पाण्याखाली जातील, असा अंदाज शास्त्रज्ञांनी वर्तवला आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्क, जपानमधील टोकियोत आणि फ्लोरिडातील मियामीसारख्या मोठ्या शहरांना धोका आहे. चीनमधील काही शहरांनाही अशाच गंभीर परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. किनाऱ्यावर वसलेल्या शहरांमध्ये राहणाऱ्या चिनी लोकसंख्येपैकी एक-दशांश लोक समुद्रसपाटीपासून खालच्या भागात राहत आहेत. ही शहरे हळूहळू जलमय होण्याच्या मार्गावर आहेत.

जमिनीतून होणारा पाण्याचा अतिरिक्त उपसा आणि इमारतींच्या वाढत्या वजनांमुळे चीनमधली जवळपास अर्धी प्रमुख शहरे हळूहळू जमिनीखाली खचत (भूस्खलन) चालल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. काही शहरांची उंची तर अशाप्रकारे अत्यंत वेगाने कमी होत चालली आहे. प्रत्येक सहापैकी जवळपास एक शहर दरवर्षी सुमारे १० मिमी एवढे खाली सरकत आहे. तर ४५ टक्के क्षेत्र दरवर्षी तीन मिलिमीटरपेक्षा जास्त वेगाने बुडत आहे. चीनमधील फुझोऊ, हेफेई व शिआन यांसारखी प्रमुख शहरे प्रभावित भागात येतात. राष्ट्रीय राजधानी बीजिंगचाही यात समावेश आहे.

गेल्या काही दशकांमध्ये चीनमध्ये प्रचंड वेगाने शहरीकरण झाले आहे. खडक, पाणी, तेल, खनिज संसाधने किंवा नैसर्गिक वायू मोठ्या प्रमाणात जमिनीतून काढली जात असल्यामुळे जमीन धसत आहे. चीनमध्ये पिण्याच्या पाण्याचा अतिरिक्त वापर केल्यामुळे जमिनीखालचे पाणी उपसले जात आहे. मोठ्या प्रमाणात केले जाणारे उत्खननही जमीन धसण्याच्या मुख्य कारणांपैकी एक आहे. भूस्खलनामुळे चीनला सध्या १.०४ अब्ज डॉलर इतका वार्षिक तोटा सहन करावा लागत आहे.

ही समस्या केवळ चीनमध्ये नाही, तर जगभरातील अनेक शहरांवर याच समस्येच्या संकटाचा घाला पडण्याची भीती आहे. २०४० पर्यंत जगातील लोकसंख्येपैकी अंदाजे एक-पंचमांश लोक राहत असलेली शहरे बुडण्याची दाट शक्यता आहे. विशेषत: आशिया खंडात ही समस्या मोठ्या प्रमाणावर दिसून येते. इंडोनेशियाची राजधानी जकार्ता हे शहर आता जगातील सर्वांत वेगाने पाण्याखाली जाणार्‍या शहरांपैकी एक आहे. जकार्ता शहराचा उत्तर भाग गेल्या १० वर्षात २.५ मीटरने पाण्याखाली गेला आहे. जकार्ता शहर दरवर्षी एक ते दीड सेंटीमीटरने बुडत आहे.

हे संकट टाळता येणे शक्य आहे. टोकियो हे शहर याचे उत्तम उदाहरण आहे. जपानमधील टोकियो शहर १९६०च्या दशकात दरवर्षी २४० मिमी पाण्याखाली जात होते. त्यानंतर सरकारने भूजल उपसण्यावर मर्यादा घालणारे कायदे केले. २०००च्या दशकापर्यंत हे शहर पाण्याखाली जाण्याचे प्रमाण वार्षिक १० मिमीपर्यंत खाली आले होते.

चीनमधील शांघाय शहर देशातील सर्वांत मोठ्या शहरांपैकी एक आहे. १९२१ ते १९६५ दरम्यान हे शहर २.६ मीटर पाण्याखाली गेले. पर्यावरणविषयक नियमावलीचे पालन केल्यानंतर शहर पाण्याखाली जाण्याचे प्रमाण प्रतिवर्षी ५ मिमी दराने कमी झाले. त्यामुळे हे संकट जरी मोठे असले तरी ते काही उपाययोजनांद्वारे टाळता येणे शक्य आहे. त्यासाठी मोठे संकट उद्भवण्यापूर्वी सतर्क होणे अत्यावश्यक आहे.

सुदेश दळवी, 

उपसंपादक, गोवन वार्ता