लोकसभेसाठी राज्यात ७५.२० टक्के मतदान

सुमारे २.९६ लाख मतदारांची दांडी : पर्ये, साखळी, वाळपई, सांगे, सावर्डे, काणकोणात सर्वाधिक मतदान


08th May, 01:13 am
लोकसभेसाठी राज्यात ७५.२० टक्के मतदान

प्रतिनिधी। गोवन वार्ता                  

पणजी : लोकसभेच्या राज्यातील दोन्ही जागांसाठी मंगळवारी ७५.२० टक्के मतदान​ झाले. उत्तर गोव्यात ७६.५४, तर दक्षिण गोव्यात ७३.९० टक्के मतदान झाले. उत्तर गोव्यात सर्वाधिक मतदान पर्ये (८७.११ टक्के), साखळी (८६.५ टक्के), वाळपई (८२.९७ टक्के) आणि डिचोली (८२ टक्के) येथे झाले. तर, दक्षिण गोव्यात सांगे (८२.२२), सावर्डे (७९.९८), काणकोण (७८.५२) आणि केपेत (७८) झाले. 

लाेकसभा निवडणुकीसाठी  राज्यात ११,७९,६४४ मतदारांची नाेंद झाली हाेती. त्यातील सुमारे २५ टक्के म्हणजेच २.९६ लाख मतदारांनी मतदानास दांडी मारल्याचे आकडेवारीतून समाेर आले आहे. दोन्ही मतदारसंघांतील सोळा उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंदिस्त झाले असून, निकाल ४ जून रोजी लागणार आहे.              

लोकसभा निवडणुकीत उत्तर गोव्यातून भाजपचे श्रीपाद नाईक, काँग्रेसचे अॅड. रमाकांत खलप, रिव्हॉल्युशनरी गोवन्सचे (आरजीपी) मनोज परब, अखिल भारतीय परिवार पार्टीचे सखाराम नाईक, बसपच्या मीलन वायंगणकर, तसेच थॉमस फर्नांडिस, विशाल नाईक आणि शकील शेख हे आठ, तर दक्षिण गोव्यातून भाजपच्या पल्लवी धेंपो, काँग्रेसचे कॅ. विरियातो फर्नांडिस, आरजीपीचे रुबर्ट परेरा, बसपच्या डॉ. श्वेता गावकर आणि दीपकुमार मापारी, हरिश्चंद्र नाईक, अॅलेक्सी फर्नांडिस व डॉ. कालिदास वायंगणकर हे आठ, असे एकूण १६ उमेदवार रिंगणात होते. सर्वांनीच जोरदार प्रचार केला होता. त्यात त्यांना किती यश मिळाले, हे निकालानंतरच समजणार आहे.             

दरम्यान, सर्वच मतदान केंद्रांवर शांततेत मतदान पार पडले. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने सर्व मतदान केंद्रांवर मतदारांसाठी कुलर, शीतपेये तसेच थंड पाण्याची व्यवस्था केली होती. शिवाय वृद्ध मतदारांसाठी वैद्यकीय सुविधा आणि दिव्यांग मतदारांसाठीही आवश्यक त्या सर्व सुविधा करण्यात आल्या होत्या. 

साळजिणी (सांगे) बूथवर १०० टक्के मतदान

लोकसभा निवडणुकीसाठी सांगे विधानसभा मतदारसंघातील दुर्गम आणि डोंगराळ भागातील नेत्रावळी ग्रामपंचायत क्षेत्रातील साळजिणी मतदान केंद्र क्रमांक ४३ वर १०० टक्के मतदान झाले. त्याचबरोबर मानगाळ-कावरे पिर्ला येथील मतदान केंद्र क्रमांक ४५ वरही १०० टक्के मतदान झाल्याची माहिती मंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिली. सर्व मतदारांनी मतदान केल्याने मंत्री फळदेसाई यांनी मतदारांचे अभिनंदन केले. कावरे पिर्ला ग्रामपंचायतमधील काजूर या बूथवर ९३ टक्के मतदान झाले. काजूकट्टा बूथवर ९७ टक्के मतदान झाले. अपेक्षेप्रमाणे सांगे विधानसभा मतदारसंघात लोकसभेसाठी मतदान झाल्याचे फळदेसाई यांनी सांगितले.

मुख्यमंत्री म्हणाले...            

मतदानाला गोमंतकीय जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, त्याबद्दल त्यांचे आभार.            

विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी तसेच पुन्हा डबल इंजिनचे सरकार आणण्यासाठी झालेले हे मतदान होते.             

निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात इतर राज्यांपेक्षा गोव्यात सर्वाधिक मतदान झाले, याचा आपल्याला अभिमान आहे.             

गोव्यातील मतदार सुशिक्षित आणि लोकशाही मानणारे आहेत, हेच या मतदानातून स्पष्टपणे दिसून आले.            

उन्हाचा तडाखा सहन करूनही गोमंतकीय मतदारांनी मतदान केंद्रांवर रांगा लावून मतदान केले. निवडणूक आयोगानेही त्यांची चांगली व्यवस्था केली.             

राज्यातील विविध भागांत पिंक आणि ग्रीन मिळून सुमारे ७० मतदान केंद्रे उभारण्यात आली होती. मतदारांसाठी ती निश्चित आकर्षक ठरली.            

गोव्यातील मतदारांकडून मिळालेला प्रतिसाद पाहता, दोन्ही जागा भाजपलाच मिळतील याचा आपल्याला ठाम विश्वास आहे.            


हेही वाचा