काँग्रेस नेते भूपेश बघेलांसाठी अस्तित्वाची लढत

Story: राज्यरंग |
03rd May, 12:21 am
काँग्रेस नेते भूपेश बघेलांसाठी अस्तित्वाची लढत

देशभरात लोकसभा निवडणुका सात टप्प्यांत होत आहेत. यातील पहिला टप्पा १९ एप्रिल रोजी, तर दुसरा २६ एप्रिल रोजी पूर्ण झाला. निवडणुकांचा निकाल ४ जून रोजी जाहीर होणार आहे. छत्तीसगडमध्ये ११ जागांसाठी तीन टप्प्यांत मतदान होत आहे. १९ रोजी फक्त बस्तर मतदारसंघात मतदान पार पडले. २६ एप्रिलला राजनांदगाव, महासमुंद आणि कांकेर या तीन मतदारसंघांत मतदान घेण्यात आले. ७ मे रोजी उर्वरित सात मतदारसंघांत म्हणजेच सरगुजा, रायगड, जांजगीर-चंपा, कोरबा, बिलासपूर, दुर्ग आणि रायपूर येथे मतदान होणार आहे.

मागील वर्षी ७ आणि १७ नोव्हेंबर अशा दोन टप्प्यांत विधानसभा निवडणुका घेण्यात आल्या होत्या. या निवडणुकीचा निकाल ३ डिसेंबर रोजी जाहीर झाला होता. जनतेने काँग्रेसच्या हाती असलेली सत्ता मतपेटीद्वारे भाजपच्या हाती सुपूर्द केली होती. या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागलेले छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते भूपेश बघेल आता पुन्हा नव्या दमाने लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. राजनांदगाव या मतदारसंघातून ते नशीब आजमावत आहेत. या निवडणुकीत त्यांनी विजय नोंदवल्यास त्यांचे राज्यातील, तसेच दिल्लीच्या राजकारणातसुद्धा वजन वाढण्यास मदत होणार आहे.

राजनांदगाव मतदारसंघ कवर्धा व राजनांदगाव अशा दोन जिल्ह्यांमध्ये पसरलेला आहे. विशेष म्हणजे मतदारसंघातील ८५ टक्के भाग ग्रामीण आहे. त्यामुळे शेतकरी व शेतमजुरांची मते निर्णायक ठरतात. या मतदारसंघाने नेहमी एकाच पक्षाला साथ दिलेली नाही. त्यामुळे राज्यातील प्रमुख राजकीय पक्ष असलेल्या भाजप व काँग्रेसला या मतदारसंघात एकहाती वर्चस्व राखता आलेले नाही. असे असले तरी भाजपसाठी जमेची बाजू म्हणजे गेल्या तीन निवडणुकांमध्ये भाजपने या मतदारसंघात विजय संपादन केला आहे. यावर्षी प्रथमच भाजपने संतोष पांडे या विद्यमान खासदारालाच पुन्हा उमेदवारी दिली आहे.

गेल्या १५ वर्षांपासून भाजपने हा मतदारसंघ आपल्याकडे ठेवण्यात यश मिळवले असले तरी मागील विधानसभा निवडणुकीत भाजपला येथे फारसे यश मिळू शकलेले नाही, ही भाजपसाठी चिंतेची बाब ठरू शकते. या मतदारसंघात एकूण आठ विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी केवळ तीन मतदारसंघांत भाजपचे उमेदवार विजयी झाले, तर उर्वरित पाच मतदारसंघांमध्ये काँग्रेसने बाजी मारली होती. यामुळे काँग्रेसला जनाधार नाही, असे म्हणता येणार नाही. गेल्या तीन निवडणुकांच्या निकालातील मतांचे अंतरही फार नाही. थोड्या मतांची फेरफारही विरोधी पक्षाच्या उमेदवाराला आस्मान दाखवू शकते. म्हणूनच बघेल यांनी काँग्रेससाठी काहीसा सकारात्मक असलेला हा मतदारसंघ लोकसभेत प्रवेश करण्यासाठी निवडला आहे.

भाजपने संतोष पांडे यांना सलग दुसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. मागील निवडणुकीत त्यांनी विजय संपादन केल्यामुळे त्यांचा विश्वास दुणावला असणार हे निश्चित. हा मतदारसंघ माजी मुख्यमंत्री डॉ. रमण सिंह यांचा आहे. राजनांदगाव या विधानसभा मतदारसंघातूनच ते निवडून गेले आहेत. याचा फायदाही भाजपच्या उमेदवाराला मिळू शकतो. ही निवडणूक भाजपचे उमेदवार संतोष पांडे यांच्यापेक्षा भूपेश बघेल आणि काँग्रेससाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे. त्यामुळे या मतदारसंघाच्या निकालाकडे राज्यासह देशभराचे लक्ष लागले आहे.


प्रदीप जोशी, 

(लेखक दै. ‘गाेवन वार्ता’चे उप वृत्तसंपादक आहेत)