पारा चढला!... पणजी @ ३४.४ अंश सेल्सिअस

उद्याही वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता; पुढील सात दिवसांत हिट वेवचा धोका नाही

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
30th April, 02:10 pm
पारा चढला!... पणजी @ ३४.४ अंश सेल्सिअस

पणजी : गोव्यासह देशभरात उन्हाचा तडाखा वाढत आहे. गोव्यात गेले दोन दिवस असलेल्या ढगाळ वातावरणामुळे उष्मा असह्य झाला आहे. मंगळवारी पणजीत कमाल ३४.४ अंश तर मुरगाव येथे ३४.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हवामान खात्याने आज आणि उद्या वातावरण उष्ण आणि दमट राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे. सोमवारी राज्यातील विविध भागात ३३ ते ३५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.

खात्याने पुढील सात दिवस कमाल तापमान ३३ ते ३५ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता वर्तवली आहे. आज राजधानी पणजीसह राज्यातील काही भागांत ढगाळ वातावरण होते. मात्र, दुपारनंतर लख्ख ऊन पडले. यामुळे उष्णतेचा त्रास वाढला होता. हवामान खात्याने उद्यादेखील ढगाळ वातावरणाची शक्यता वर्तवली आहे. पुढील दोन दिवस कमाल तापमानात मोठा बदल होण्याची शक्यता नसल्याचे खात्याने स्पष्ट केले आहे.

याशिवाय खात्याने ३० एप्रिल ते ६ मे दरम्यान सापेक्ष आर्द्रता ८० ते ९० टक्क्यांपर्यंत राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे. याकाळात वातावरण कोरडे राहण्याची शक्यता आहे. तर पुढील सात दिवसात हिट इंडेक्स म्हणजे जाणवणारे तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा कमी राहण्याची शक्यता खात्याने व्यक्त केली आहे. गेल्या चोवीस तासात पणजीत किमान तापमान देखील वाढले आहे. पणजीत किमान तापमानात १ अंशाने वाढून २७.४ अंश सेल्सिअस झाले होते. तर मुरगाव येथे किमान २७.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

हेही वाचा