काँग्रेसचा पाय खोलात

ज्या काँग्रेसने गोव्यात आणि केंद्रात इतकी वर्षे राज्य केले, त्या काँग्रेसने गोव्यावर संविधान लादल्याचे कधीच म्हटलेले नाही. त्यामुळे आज अचानक एका उमेदवाराने ती गोव्यावर लादली म्हणणे, यात उमेदवाराचेही अज्ञान आले आणि काँग्रेसलाही तोंडघशी पडावे लागले.

Story: संपादकीय |
26th April, 12:40 am
काँग्रेसचा पाय खोलात

काँग्रेसचे दक्षिण गोव्यातील उमेदवार विरियातो फर्नांडिस यांनी राज्य घटनेवर केलेल्या वक्तव्यामुळे सध्या भाजपने काँग्रेसला घेरले आहे. काँग्रेसही आपल्यापरीने प्रत्युत्तर देते. पण विरियातो यांचे विधानच असे होते की, त्यावर खुलासे करायला गेल्यामुळे काँग्रेसचा पाय आणखी खोलाय जातोय. गोव्यातील निवडणुकीत हा मुद्दा किती कोणाला फायद्याचा ठरेल हे काही निश्चित सांगता येणार नाही, पण राजकारण मात्र सध्या याच मुद्द्यावरून सुरू आहे. गेले तीन चार दिवस याच मुद्द्याभोवती दोन्ही पक्ष एकमेकाला भिडत आहेत. दोन्ही पक्षांचे नेते पुन्हा पुन्हा एकमेकाला आव्हान देत असल्यामुळे हा विषय निवडणुकीच्या प्रचारात मुख्य मुद्दा ठरला आहे. विशेषतः दक्षिण गोव्यात या मुद्द्यावरून भाजपने काँग्रेसला अडचणीत आणण्यासाठी प्रयत्न केले आहेत. देशभर अनेक ठिकाणी भाजपने काँग्रेसच्या या विधानाचा वापर प्रचाराच्या मुद्द्यासाठी सुरू केला. हा व्हिडिओ सासष्टीतल्या एका सभेतील आहे. संविधान गोव्यावर लादले असे त्यांनी राहुल गांधी यांना सांगितले होते. त्याची माहिती देताना विरियातोंनी 'लादले' असा जो शब्दप्रयोग केला, त्यावरून वाद पेटला. त्या सभेनंतर बऱ्याच वेळाने काहीजणांच्या लक्षात ही बाब आली. त्यानंतर तेवढ्याच भाषणाचा व्हिडिओ सार्वजनिक झाला. 

गोवा मुक्तीपूर्वी राज्य घटना मार्गी लागली होती, पण राज्य घटनेतील तरतुदी गोव्यासाठीही लागू आहेत. त्यामुळे घटना लादली, असा अर्थ काढणे चुकीचेच. घटनेतील तरतुदींनुसारच राज्याचा कारभार सुरू आहे. ज्या काँग्रेसने गोव्यात आणि केंद्रात इतकी वर्षे राज्य केले, त्या काँग्रेसने गोव्यावर संविधान लादल्याचे कधीच म्हटलेले नाही. त्यामुळे आज अचानक एका उमेदवाराने ती गोव्यावर लादली म्हणणे, यात उमेदवाराचेही अज्ञान आले आणि काँग्रेसलाही तोंडघशी पडावे लागले. निश्चितच इतर राजकीय पक्षांपेक्षा काँग्रेस राज्य घटनेला जास्त महत्त्व देते. कारण काँग्रेसच्या काळात संविधान लागू झाले. ते कायम रहावे अशी काँग्रेसची भूमिका असते. गोव्यात एखाद्या गोष्टीचा जर संविधानावेळी विचार झाला नाही किंवा संविधानाच्या उलट एखादी तरतूद आहे तर त्यासाठी दुरुस्ती, तरतूद करण्याची गरज आहे असे म्हणण्यापर्यंत ठीक आहे. गोव्यासाठी संविधानातील तरतूद वापरून विशेष दर्जा द्या अशी मागणी करणेही योग्य आहे, पण घटना गोव्यावर 'लादली' असे म्हणणे हे अयोग्यच आहे. तेही काँग्रेसच्या उमेदवाराने म्हणणे म्हणजे अजून चुकीचे आहे. काँग्रेसने विरियातो यांच्या या विधानाचे समर्थन करण्यापेक्षा त्यांच्या बोलण्याचा अर्थ तसा नव्हता किंवा तसे त्यांना म्हणायचे नव्हते ते अनवधनाने आले, असे सांगायला हवे. सध्या निवडणुकीत गोव्यातील इतर समस्यांकडे दुर्लक्ष होऊन संविधानाचाच मुद्दा लावून धरला जात आहे. 

घटना गोव्यावर लादली, असे विधान करणारे विरियातो यांनी आपले विधान खरोखरच चुकले का, त्याविषयी आत्मचिंतन करावे. ज्या काँग्रेसच्या काळात देशाला घटना मिळाली, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेला हा मौल्यवान दस्तावेज गोव्यासाठीही तेवढाच महत्त्वाचा आहे. घटनेनंतर काही वर्षांनी गोवा मुक्ता झाला, त्यामुळे गोव्याच्या दुहेरी नागरिकत्वाचा मुद्दा हा राज्य घटनेनंतर निर्माण झालेला प्रश्न आहे. त्यामुळे, त्यावर इतक्या वर्षांमध्ये तोडगा निघायला हवा होता. काँग्रेसकडे इतकी वर्षे सत्ता होती, पण त्या विषयावर तोडगा निघाला नाही. त्यामुळे या विषयावर कशा पद्धतीने तोडगा काढता येईल, त्यावर आता सर्वपक्षीय बैठकीत चर्चा व्हायला हवी. गोव्यातील सर्व पक्षांनी हा मुद्दा केंद्र सरकारसमोर मांडायला हवा. दुहेरी नागरिकत्वावर तोडगा निघाला नसल्यामुळे आज हजारो लोक गोवा सोडून इतर देशांचे नागरिकत्व घेत आहेत. गेल्या तीन महिन्यांतच ४२६ गोमंतकीयांनी गोवा सोडून इतर देशांचे नागरिकत्व स्वीकारले आहे. दुहेरी नागरिकत्वावरून निर्माण झालेला वाद हा प्राचाराचा मुद्दा ठरतो, पण गोवा सोडून जाणाऱ्यांविषयी कोणी काही बोलत नाही. हा विषय प्रचाराचा मुद्दा ठरत नाही, हेही एक आश्चर्य आहे. खरे म्हणजे या विषयावर सर्व पक्षांनी एकत्र येऊन गोव्यातील दुहेरी नागरिकत्व कसे महत्त्वाचे आहे ते केंद्र सरकारला पटवून द्यायला हवे. दुहेरी नागरिकत्वावर काय उपाय आहेत त्याचा विचार करण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्रपणे विचारविनिमय करायला हवा. तो मुद्दा तिथेच सोडून विरियातोंनी काय म्हटले आणि भाजपला काय वाटते, यातच राजकीय पक्ष गुंतले आहेत.