बाणावलीत आयपीएल बेटींगचा पर्दाफाश, आठजण अटकेत

कोलवा पोलिसांची कारवाई; १८ लाखांचा मुद्देमाल जप्त

Story: प्रतिनिधी| गोवन वार्ता |
05th May, 01:55 pm
बाणावलीत आयपीएल बेटींगचा पर्दाफाश, आठजण अटकेत

मडगाव : कोलवा पोलिसांकडून बाणावलीत सुरु असलेल्या आयपीएल बेटींगचा पर्दाङ्गाश केला. याप्रकरणी कर्नाटकातील आठजणांना अटक करण्यात आलेली आहे. याशिवाय मोबाइल, बेटींग साहित्य व वाहने असा १८ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. 

कोलवा पोलिसांना बाणावलीत आयपीएल बेटींग रॅकेटची माहिती मिळालेली होती. त्यानुसार तपास करत शनिवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास वासवाडो वाडी बाणावली येथील जॅक कॉर्नरनजीक  ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत संशयित भूषण पुजारी, ऋषिकेश कृष्णाजी पाटील, कपिल सावंत, ओंकार प्रमोद पाटील, आङ्ग्रीद नदुबिंल, तोहील बिडीकर, शुभम मनोहर पाटील, सय्यद रमजान बागवान अली या आठजणांना ताब्यात घेत रितसर अटक केली. हे सर्व कर्नाटक राज्यातील खानापूर, बेळगाव येथील रहिवासी आहेत. या टोळीकडून आयपीएलच्या रॉयल चॅलेंजर्स विरुध्द गुजरात टायटन्स या सामन्यावर बेटींग केली जात होती. 

या सर्वांना एका बंदीस्त केलेल्या जागेत आयपीएलच्या सामन्यांवर बेटींग करतेवेळी पोलिसांनी रंगेहात पकडले. कोलवा पोलिसांनी या छाप्यात मोबाइल, बेटींगचे साहित्य व वाहने असा एकूण १८ लाखांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. दुसर्‍या राज्यातून आलेल्या नागरिकांकडून भाडेतत्वावर जागा किंवा बंगला घेत त्याठिकाणी बेटींग केली जात आहे. त्यामुळे कोलवा पोलिसांकडून आणखीही आयपीएल बेटींग टोळी कार्यरत आहेत का याचा शोध घेत आहेत. कोलवा पोलिस निरीक्षक सुनील पडवळकर यांच्या मार्गदर्शनाखाली यापुढील कारवाई सुरू आहे. 

हेही वाचा