चांगल्या खेळाची अपेक्षा

ज्या खेळाडूंची निवड झाली आहे, त्यांनी देशासाठी चांगला खेळ करून दाखवणे त्यांची जबाबदारी आहे. आयपीएलच्या कामगिरीचा संघ निवडीवर नक्कीच प्रभाव आहे. पण टी-२० विश्वचषकात भारतीय संघाने दमदार कामगिरी करून दाखवावी, हीच भारतीयांची अपेक्षा आहे.

Story: संपादकीय |
30th April, 10:29 pm
चांगल्या खेळाची अपेक्षा

आयसीसीच्या टी-२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर झाला. देशात आयपीएलचा हंगाम सुरू असताना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय संघाची निवड जाहीर केली. उत्कृष्ट खेळाचे सातत्य ठेवणारा रोहित शर्मा हा संघाचा कर्णधार राहणार आहे. हार्दिक पांड्या उपकर्णधार असेल. १ ते २९ जून दरम्यान होणाऱ्या आयसीसी टी-२० विश्वचषकात भारत यंदा चांगली कामगिरी करून चषकावर आपले नाव कोरेल, अशी अपेक्षा आहे. आयपीएलमध्ये सध्या मैदान गाजवणारे अनेक खेळाडू विश्वचषकासाठी निवडलेल्या संघात निवडले गेले आहेत. शुभमन गिल की यशस्वी जयस्वाल अशी एक चर्चा होती. दोघांनाही संघात स्थान मिळाले आहे, पण गिलचे नाव राखीव खेळाडूंमध्ये आहे.

टी-२० विश्वचषक सुरू झाल्यापासून २००७ मध्ये एकदाच भारताने ही स्पर्धा जिंकली आहे. आतापर्यंत इंग्लंड आणि वेस्ट इंडिज या दोन संघांनी प्रत्येकी दोनवेळा स्पर्धा जिंकली. यंदा रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली निवडलेला संघ हा सध्याच्या चांगल्या दर्जेदार खेळाडूंचा समावेश असलेला आहे. त्यामुळे यावेळी संघाकडून अपेक्षा वाढल्या आहेत. जाणकारांच्या मते रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पांड्या अशा खेळाडूंच्या निवडीमुळे निवड समितीने मोठा विश्वास दाखवला आहे. निश्चितच या संघातील कुठल्याच खेळाडूला निवडून समितीने जोखीम पत्करली आहे, असे म्हणता येणार नाही. सध्या सुरू असलेल्या आयपीएलमध्ये काही खेळाडूंचे प्रदर्शन जरी काही प्रमाणात खराब दिसत असले तरीही सर्वच सामन्यांमध्ये ते खराब नाही किंवा विश्वचषक स्पर्धेत निवडता येणार नाही, एवढे वाईटही नव्हते. काही वरिष्ठ खेळाडूंमुळे नव्या खेळाडूंवर नक्कीच अन्याय झाल्यासारखे दिसत असले तरीही निवड समितीने जयस्वाल, शिवम दुबे, ऋषभ पंत अशा खेळाडूंवर विश्वास दाखवला आहे, हेही महत्त्वाचे आहे. एक दिवसीय विश्वचषकात भारताने सलग विजय मिळवून चांगली दमदार कामगिरी केली होती, पण अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला. तो पराभव भारतीयांच्या जिव्हारी लागलेला आहेच. त्यामुळे टी-२० विश्वचषक स्पर्धेत त्याची भरपाई करण्याची चांगली संधी भारतीय संघाला मिळाली आहे.

भारतीय संघाची निवड ही निर्विवाद आहे. अद्याप तरी मोठा वाद त्यावरून सुरू झालेला नाही. रिंकू सिंग आणि शुभमन गिल हे उदयास येणारे आश्वासक खेळाडू आहेत, चांगले फलंदाज म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांना पहिल्या १५ खेळाडूंमध्ये स्थान मिळण्याची आवश्यकता होती. विराट कोहली अशा काही खेळाडूंना संघात समावून घेण्यासाठी या दोघांना राखीव खेळाडूंमध्ये ठेवले गेले आहे. त्यावरून कदाचित यापुढेही चर्चा होऊ शकते. पण जबाबदारीने खेळणारे अनेक चांगले खेळाडू संघात असल्यामुळे आता राखीव असलेल्यांना पुढे भारतीय संघात महत्त्वाचे स्थानही मिळू शकेल. फलंदाजांसह चांगले गोलंदाजही निवडले आहेत, यात शंका नाही. पहिल्या पंधरामध्ये सुमारे सात ते आठजण चांगले गोलंदाज आहेत. काही अष्टपैलू खेळाडू आहेत. या सगळ्यांचा निश्चितच फायदा होऊ शकतो. के. एल. राहुलसारख्या खेळाडूला वगळले असले तरी त्यावरून वाद होण्याची शक्यता नाही. त्याच्यासोबत श्रेयस अय्यर, इशान किशन या खेळाडूंनाही वगळले आहे. नव्या खेळाडूंना संधी देण्यासाठी काही जुन्या अनुभवी खेळाडूंना विश्रांती द्यावी लागते. जाहीर केलेल्या संघात पुढील काही दिवसांमध्ये बदलही होऊ शकतात. मंगळवारी जाहीर झालेल्या संघानंतर मोठा वादही निर्माण झालेला नाही, त्यामुळे संघात काही बदल होण्याची शक्यता कमी आहे. झालीच तर राखीव खेळाडूंपैकी कोणीही पहिल्या पंधरामध्ये येऊ शकतो. शेवटी खेळात खेळाडूवृत्ती महत्त्वाची असते. बारा तेरा वर्षांपूर्वी विश्वचषक संघातून रोहित शर्मालाही वगळले होते. पण त्याचा परिणाम त्याच्या खेळावर झाला नाही. उलट त्यातून तो तावून सुलाखून निघाला. त्यामुळेच देशाला एक चांगला खेळाडू मिळाला. ज्या खेळाडूंची निवड झालेली नाही, त्यांच्यासाठी पुढे पर्याय आहेत. मात्र त्यांच्याकडून निष्ठेने खेळ करणे अपेक्षित आहे. ज्या खेळाडूंची निवड झाली आहे, त्यांनी देशासाठी चांगला खेळ करून दाखवणे त्यांची जबाबदारी आहे. आयपीएलच्या कामगिरीचा संघ निवडीवर नक्कीच प्रभाव आहे. पण टी-२० विश्वचषकात भारतीय संघाने दमदार कामगिरी करून दाखवावी, हीच भारतीयांची अपेक्षा आहे.